तिसरे इंग्रज-म्हैसूर युद्ध

MPSC TECH
0

तिसरे इंग्रज-म्हैसूर युद्ध

हे युद्ध म्हैसूरच्या राज्याचा शासक टिपू सुलतान आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व त्यांचे मित्रसैन्य (मराठा साम्राज्य आणि हैदराबादचा निजाम) यांच्यामध्ये १७८९ ते १७९२ या कालखंडात झाले.

पार्श्वभूमी

भारतातील मराठे, हैदराबादचा निजाम आणि म्हैसूरचा टिपू सुलतान या प्रमुख सत्ताधीशांना भारतात युरोपियन सत्तांचे वाढते वर्चस्व मान्य नव्हते. त्यामुळे ब्रिटिशांच्या भारतातील साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेच्या मार्गातील हे प्रमुख सत्ताधीश अडथळे बनलेले होते म्हणूनच कॉर्नवॉलिसने त्यांना परस्परांपासून वेगळे ठेवण्याचे धोरण अवलंबिले होते. भारतातील प्रमुख तीनही सत्ताधीशांपैकी हैदराबादचा निजाम आपल्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी ब्रिटिशांच्या मैत्रीचा आधार घेऊ इच्छित होता. कॉर्नवॉलिसने त्यादृष्टीने निजामाशी एक गुप्त करार केला. त्या कराराचा भाग म्हणून निजामाने १७८८ साली गुंटूर जिल्हा कंपनीला दिला. त्याबदल्यात कॉर्नवॉलिसने निजामाला हैदर अलीने त्याचा जिंकलेला प्रदेश परत मिळविण्यासाठी लष्करी मदत देऊ केली. टिपूला हे वृत्त कळाल्यावर टिपूने इंग्रजांवर दगाबाजीचा आरोप केला कारण मार्च, १७८४ च्या मंगलोरच्या तहानुसार हा सर्व भूभाग म्हैसूर राज्याचा कायदेशीर प्रदेश आहे असे कंपनीने मान्य केले होते. कॉर्नवॉलिसचे कृत्य मंगलोर तहाचा भंग करणारे होते त्यामुळे टिपू आक्रमक झाला.

१७८९ मध्ये टिपूने तंजावरवर आक्रमण केले होते. ब्रिटिशांनी तंजावरला संरक्षण प्रदान केले असल्याने कॉर्नवॉलिसने टिपूविरूद्ध जानेवारी, १७९० मध्ये युद्ध पुकारले आणि हैदराबादचा निजाम ब्रिटिशांचा वचनबद्ध मित्र असल्याने ब्रिटिशांच्या वतीने तोही युद्धात सामील झाला.

२९ डिसेंबर, १७८९ रोजी टिपूने कोईंबतूरहून १४,००० सैनिक घेउन नेडुमकोट्टाकडे चाल केली. तेथे झालेल्या लढाईत टिपूचा पराभव झाला. त्याचे सैन्य पळ काढत असताना गव्हर्नर हॉलंडने त्याच्याशी वाटाघाटी सुरू केल्या. याच वेळी हॉलंडने टिपूचा काटा न काढल्यामुळे रागावलेल्या कॉर्नवॉलिसने त्याच्याऐवजी जनरल मेडोझला पाठवले. मेडोझने हॉलंडची हकालपट्टी करून तिरुचिरापल्ली येथे तळ ठोकला आणि टिपूविरुद्ध कारवाया करण्याचा बेत सुरू केला.

टिपूने तंजावर या हिंदू राज्यावर केलेल्या आक्रमणामुळे मराठ्यांचा टिपूवर राग होता. या परिस्थितीचा फायदा घेऊन मराठ्यांना टिपूविरूद्धच्या संघर्षात ओढून त्यांना टिपूकडून जिंकलेल्या प्रदेशात वाटा देण्याच्या हेतूने ब्रिटिश दूताने १ जून, १७९० रोजी मराठ्यांशी एक स्वतंत्र करार केला. या कराराला ५ जुलै, १७९० रोजी गव्हर्नर जनरल इन कौन्सिलने मान्यता दिली. ब्रिटिशांनी निजामाशी केलेल्या करारात मराठ्यांनाही सहभागी करून त्या कराराला त्रिमित्र कराराचे स्वरुप दिले.

टिपूविरूद्धची पहिली मोहीम जनरल मेडोजच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली होती. पण या मोहीमेत जनरल मेडोजला मद्रास प्रेसिडन्सीकडून पुरेशी मदत न मिळाल्याने मेडोजची ही मोहीम अयशस्वी झाली. या युद्धाचा निकाल लवकर लागावा म्हणून कॉर्नवॉलिस स्वतः मद्रास येथे आला व त्याने वैयक्तिकरीत्या सैन्याचे नेतृत्व स्विकारले. मार्च, १७९१ मध्ये कॉर्नवॉलिसने बंगलोरवर आक्रमण करून बंगलोर शहरावर ताबा मिळविला आणि टिपूला श्रीरंगपट्टणमजवळ आरिकेरा येथे कोंडीत पकडले. टिपूच्या ताब्यातील धारवाडचा किल्ला घेण्यासाठी ब्रिटिश, निजाम आणि मराठ्यांच्या संयुक्त फौजांना शर्थीची झुंज द्यावी लागली. या युद्धमोहीमेत धारवाड किल्ला घेण्यासाठी या संयुक्त फौजांना सप्टेंबर, १७९० ते एप्रिल, १७९१ असे सहा महिने युद्ध करावे लागले. एप्रिल, १७९१ मध्ये निजामाची १०,००० ची फौज श्रीरंगपट्टणमच्या वेढ्यात इंग्रजांना येऊन मिळाली. नंतर पावसाळा आणि रसदीचा अल्पपुरवठा यामुळे हा वेढा उठवावा लागला. वेढा उठविल्यानंतर कॉर्नवॉलिस नवीन योजना आखण्यासाठी मद्रासला परत आला. नवीन योजनेनुसार १७९२ च्या सुरुवातीला ब्रिटिश फौजेने श्रीरंगपट्टणमवर दुहेरी हल्ला केला. मराठे व निजामाच्या लष्करानेही म्हैसूर राज्यात धुमाकूळ घालून टिपूचे प्रचंड नुकसान केले. म्हैसूरचे डोंगरी किल्ले एकामागून एक ब्रिटिश फौजेच्या हाती पडू लागले. टिपू सुलतान त्याच्या तटबंदी असलेल्या राजधानीत आश्रयाला गेला होता पण तिथेही त्रिमित्र फौजेने त्याला घेराव घातला. शेवटी त्रस्त झालेल्या टिपू सुलतानाने शांततेसाठी कॉर्नवॉलिसकडे विनवणी केली. कॉर्नवॉलिसनेही स्वतःच्या अटींवर त्याला मान्यता दिली.

टिपू सुलतानने शांततेसाठी केलेल्या विनवणीनुसार कॉर्नवॉलिसने त्याच्याशी मार्च, १७९२ मध्ये एक तह केला. हा तह श्रीरंगपट्टणमचा तह म्हणून ओळखला जातो. या श्रीरंगपट्टणमच्या तहानुसार तिसऱ्या इंग्रज-म्हैसूर युद्धाची समाप्ती झाली. या तहानुसार टिपू सुलतानाने त्याचा अर्धा भूप्रदेश आणि तीन कोटी तीस लाख रूपये युद्धखंडणी (सोने व चांदीच्या रुपात) ब्रिटिशांना देण्याचे मान्य केले. या युद्धखंडणीपैकी अर्धी रक्कम त्वरीत व उरलेली अर्धी रक्कम तीन हप्त्यात द्यावी असे ठरले. या तहानुसार टिपूने सर्व ब्रिटिश युद्धकैद्यांची मुक्तता केली आणि तहाच्या अटींची पूर्तता होईपर्यंत स्वतःच्या दोन अल्पवयीन मुलांना इंग्रजांकडे ओलीस ठेवले.

परिणाम

टिपूने दिलेला प्रदेश आणि रक्कम ब्रिटिश, निजाम आणि मराठे यांच्यात विभागली गेली. यातील मोठा वाटा ब्रिटिशांनी उचलला. त्यांनी घेतलेल्या प्रदेशात बारा महाल आणि दिण्डीगुल या जिल्ह्यांचा समावेश होता. याशिवाय त्यांनी मलबार समुद्रकिनाऱ्या जवळचे कन्नुर आणि कालिकत ही सुप्रसिद्ध बंदरांची शहरेही आपल्या ताब्यात घेतली. श्रीरंगपट्टणमच्या जवळ असलेले कुर्ग हे हिंदू राज्यही ब्रिटिशांनी स्वतःच्या संरक्षणाखाली घेतले. मराठ्यांना त्यांच्या सीमेला लागून असलेला म्हैसूर राज्याच्या वायव्येकडचा प्रदेश देण्यात आला. निजामाला त्याच्या सीमेला लागून असलेला म्हैसूर राज्याच्या ईशान्येकडचा प्रदेश देण्यात आला. टिपूकडून हे प्रदेश काढून घेतल्यामुळे टिपू दक्षिण, पूर्व व पश्चिम या तीनही बाजूंनी ब्रिटिश प्रदेशाने घेरला गेला तसेच त्याची उत्तरेकडची सीमाही मराठे व निजाम यांच्या राज्याला भिडली. या इंग्रज-म्हैसूर तिसऱ्या युद्धाने व श्रीरंगपट्टणमच्या तहाने टिपूला पार दुबळे करून टाकण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)