पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 मे ला संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं आहे. भव्य आणि आकर्षक अशी नवी संसद भारताला मिळाली आहे.
10 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भवनाचे भूमिपूजन केले होते.
नवीन संसद भवनाचे बांधकाम टाटा प्रोजेक्टने केले आहे. तर या इमारतीचे डिझाईन आर्किटेक्ट बिमल पटेल यांनी केले
संसद भवनाच्या उद्घाटनाप्रसंगी मोदींच्या हस्ते ७५ रुपयांचे ‘स्पेशल’ नाणं प्रसिद्ध केले गेले.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटना वेळी ऐतिहासिक राजदंड (सेंगोल) लोकसभाध्यक्षांच्या आसनाशेजारी स्थापित केला गेला.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या संदेशाचे वाचन
उद्घाटन सोहळय़ाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना निमंत्रण दिले गेले नव्हते; पण त्यांच्या अभिनंदनाच्या संदेशाचे वाचन राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी लोकसभेत दुपारी झालेल्या कार्यक्रमात केले.
संसदप्रमुख या नात्याने राष्ट्रपतींना निमंत्रण न दिल्याचा निषेध म्हणून विरोधकांनी सोहळय़ावर बहिष्कार टाकला होता.
नवीन संसदेचं स्वरुप कसे आहे ?
जुनी संसद गोलाकार आहे. नवी संसद त्रिकोणी आकाराची आहे. मात्र, उंची जुन्या संसदेएवढीच आहे. जुन्या लोकसभेची आसन क्षमता जवळपास साडे पाचशे तर राज्यसभेची आसन क्षमता जवळपास अडीचशे आहे. नव्या संसदेतील लोकसभा तिप्पट मोठी आहे.
राज्यसभाही मोठी आहे . जुन्या संसदेतील सध्याचा सेंट्रल हॉल दोन्ही सभागृहांच्या सदस्यांसाठी कमी पडू लागला आहे. त्यामुळे तब्बल 1350 सदस्य बसू शकतील, इतकी आसनक्षमता असणारा नवीन सेंट्रल हॉलही उभारण्यात आला आहे.
नवीन इमारत भारतीय संस्कृती आणि प्रादेशिक कला, हस्तकला, वस्त्रोद्योग आणि वास्तुकलेच्या विविधतेचं समृद्ध मिश्रण दर्शवणारी आहे.
नवीन संसद भवन मध्ये एक संविधान हॉल (सेंट्रल कॉन्स्टिट्युशनल गॅलरी) आहे जी सर्वसामान्यांसाठी खुली असेल. पर्यावरणाला पूरक अशी इमारत बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
दिल्लीत गेल्या काही वर्षात भूकंपाच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यामुळे भविष्यात मोठ्या भूकंपातही इमारतीला नुकसान होणार नाही, अशा पद्धतीने इमारतीचं बांधकाम करण्यात आले आहे.
याशिवाय, खासदारांसाठी लाउंज, एक मोठं ग्रंथालय, वेगवेगळ्या समित्यांसाठी खोल्या, डायनिंग एरिया असे वेगवेगळे भाग आहेत.
सेंट्रल व्हिस्टा पुनर्निमाण प्रकल्प एकूण 20 हजार कोटी रुपयांचा असला तरी यात नव्या संसद भवनासाठी जवळपास 861 कोटी रुपये खर्च आला आहे, असा अंदाज आहे.
या प्रकल्पाची घोषणा झाली त्यावेळी 21 महिन्यात म्हणजे 2022 पर्यंत ही संसद बनून तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होते.
टाटा प्रोजेक्ट कंपनीने संसद भवन उभारण्याचं काम केले आहे.
नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळय़ावर काँग्रेससह २० विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष तसेच, अन्य २५ पक्ष कार्यक्रमात सहभागी झाले.
प्रसिद्ध केले गेलेले ७५ रुपयांचे नाणे कसे आहे ?
संसद भवनाच्या लॉन्चिंगवेळी जारी करण्यात आलेले ७५ रुपयांचे नाणे हे ३५ ग्रॅमचे आहे. त्यात ५० टक्के चांदी आणि ४० टक्के तांबे आहे . तर याव्यतिरिक्त ५ टक्के झिंक आणि निकेल आहे.
जर त्याच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभावरील सिंह आहे. ज्याच्या खाली “सत्यमेव जयते” लिहिलेले आहे. डावीकडे देवनागरी लिपीत ‘भारत’ आणि उजवीकडे इंग्रजीत ‘इंडिया’ लिहिलेलं पाहायला मिळेल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला नवीन संसद भवनाचे डिझाईन बनवले आहे आणि त्याच्या वर आणि खाली संसद परिसर असे लिहिलेले आहे. याबरोबरच नाण्याच्या खालच्या बाजूला २०२३ हे वर्ष छापलेले आहे.
संसद भवनात ठेवण्यात आलेला सेंगोल नक्की काय आहे ?
सेंगोल या शब्दाची व्युत्पत्ती तामिळ भाषेतील सेम्माई / ‘सिनमई’ या शब्दापासून झालेली आहे. तमिळ भाषेत ‘राजदंडा’लाच ‘सेंगोल’ असे म्हटले जाते. उपलब्ध कागदपत्रांनुसार सेंगोल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राजदंडाला ऐतिहासिक महत्त्व आहे. या राजदंडाकडे स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणूनही पाहिले जाते. प्रतीकात्मकदृष्ट्या सत्तेचे हस्तांतर म्हणून ब्रिटिशांनी हा राजदंड पंडित नेहरू यांच्याकडे सोपवला होता, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १४ ऑगस्ट १९४७ रोजी सायंकाळी १०.४५ वाजता हा राजदंड ब्रिटिशांकडून स्वीकारला होता.. सेंगोल (राजदंड) हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो. या सालंकृत सोन्याच्या राजदंडाची तत्कालीन किंमत १५ हजार रुपये इतकी होती. हा राजदंड पाच फूट असून समृद्ध कारागिरीसह भारतीय कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या राजदंडाच्या शीर्षस्थानी शिवाचे वाहन ‘नंदी’ विराजमान आहे. तर राजदंडाच्या घटावर लक्ष्मी विराजमान आहे.
ब्रिटिशांनी नेहरूंना राजदंड (सेंगोल) का दिला?
उपलब्ध कागदपत्रांनुसार भारताला स्वातंत्र्य मिळताना भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी सत्तेचे हस्तांतर दर्शवणारा एखादा प्रतीकात्मक कार्यक्रम असावा का? अशी विचारणा नेहरू यांच्याकडे केली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ब्रिटिशांकडून भारतीयांकडे सत्ता देण्यात आली, तसेच या कार्यक्रमाकडे प्रतीकात्मकतेने सत्ता हस्तांतरण म्हणून पाहिले जावे, असे माऊंटबॅटन यांना वाटत होते. त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंतप्रधानपदी विराजमान होणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सी. राजगोपालचारी यांच्याशी याबाबत बातचीत केली. राजगोपालचारी हे भारताचे शेवटचे जनरल-गव्हर्नर होते. त्यानंतर राजगोपालचारी यांनी दक्षिणेतील चोल साम्राज्याच्या काळातील सत्ता हस्तांतरणाबद्दल सांगितले. त्या काळात चोल साम्राज्याची राजवट एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे हस्तांतरित करायची असेल, तर खास कार्यक्रमाचे आयोजन केले जायचे. या कार्यक्रमात राजवटीच्या हस्तांतरानंतर लोक नव्या राजाला आशीर्वाद द्यायचे.
चोल साम्राज्यात सत्ता एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे सोपवताना राजदंडाचा म्हणजेच सेंगोलचा वापर केला जायचा. या सेंगोलकडे प्रतीकात्मकतेने राजवट आणि सत्ता म्हणून पाहिले जायचे. नव्याने राज्याभिषेक झालेल्या राजाला हा सेंगोल देऊन न्याय्य तसेच पारदर्शक पद्धतीने राज्यकारभार करावा, असे सांगितले जाई.
सेंगोलची निर्मिती कशी करण्यात आली?
राजगोपालचारी यांनी सुचवल्याप्रमाणे राजदंडाच्या माध्यमातून सत्ता हस्तांतरणाचा समारंभ आयोजित करण्यास पंडित नेहरू यांनी सहमती दर्शवली. त्यानंतर रोजगोपालचारी यांच्यावरच सेंगोलची तजवीज करण्याची जबाबदारी देण्यात आली. ठरल्याप्रमाणे त्यांनी तामिळनाडू राज्यातील तंजोर जिल्ह्यामधील ‘थिरुवादुथुराई अथिनाम’ मठात जाऊन याबाबत विचारणा केली. त्यानंतर या मठातील प्रमुखाने एका उच्च प्रतीच्या सेंगोल म्हणजेच राजदंडाची निर्मिती करण्याचे सुचवले. या राजदंडाची निर्मिती करण्याची जबाबदारी ‘वुम्मीदी बंगारू चेट्टी ज्वेलर्स’वर सोपवण्यात आली. वुम्मीदी इथिराजुलू आणि वुम्मीदी सुधाकर या दोन व्यक्तींनी या राजदंडाची निर्मिती केली. या दोन्ही व्यक्ती अजूनही हयात आहेत. त्यांना या राजदंडाच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया आठवते. या राजदंडाची लांबी पाच फूट आहे. तसेच त्यावर एक नंदी आहे. नंदी हे न्यायाचे प्रतीक आहे.
पुजाऱ्यांनी सादर केलेले विशेष गाणे हे ७ व्या शतकातील तिरुग्नाना या संतांनी रचले होते. ते फक्त १६ वर्षे जगले. या कार्यक्रमाला डॉ. राजेंद्र प्रसाद उपस्थित होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लवकरच ते देशाचे पहिले राष्ट्रपती झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या राजदंडावर नंदीसोबत लक्ष्मी कशासाठी?
लक्ष्मी ही समृद्धीची देवता आहे. या देवीचा वास ज्या ठिकाणी असतो, त्याठिकाणी सदैव आनंद व सुख नांदते.
पद्मानने पद्म- ऊरु पद्म संभवे ।
तन्मे भजसि पद्माक्षी, येन सौख्यं लभाम्यहम् ।।१।।
पद्मानने पद्मिनी पद्मपत्रे, पद्मप्रिये पद्मदलायताक्षी ।
विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्व ।।३।।
हे श्रीसूक्तातील श्लोक असून या सूक्ताचा कर्ता कमलमुखी देवीचे आवाहन करत आहे. जगतप्रिया कमलपत्रारूढे, कमलप्रिया, कमलनयन, कमलजा देवीकडे तो सौख्याची मागणी करताना तिची सदैव कृपादृष्टी राहावी यासाठी ‘तुझे चरण कमल माझ्या ठायी ठेव’ अशी आळवणी करत आहे. एकूणच या सूक्ताचा कर्ता श्रीलक्ष्मीची आराधना करत आहे. लक्ष्मी ही समृद्धीची देवता आहे. या देवीचा वास ज्या ठिकाणी असतो, त्याठिकाणी सदैव आनंद व सुख नांदते.
राजदंडाची ऐतिहासिक परंपरा
या राजदंडाला चोल राजवंशाची ऐतिहासिक परंपरा आहे. चोल राजवंश हा दक्षिण भारतातील सर्वात प्राचीन राजवंश असून मौर्य सम्राट अशोकाच्या शिलालेखामध्ये चोल राजवंशाचा प्राचीन संदर्भ सापडतो. ऐतिहासिक पुराव्यांनुसार चोलांचा स्वतंत्र देश अस्तित्त्वात होता. या राजवंशाने प्रदीर्घ काळासाठी दक्षिण भारत व आग्नेय आशियावर राज्य केले होते. चोलांनी कला, स्थापत्य, साहित्य अशा सर्वच क्षेत्रात आपली अद्वितीय छाप सोडली. चोल राजे हे शिवोपासक होते. त्यांच्या काळात अनेक शिवालये बांधण्यात आली. अशा या समृद्ध राजवंशाचा ऱ्हास चौदाव्या शतकात झाला. याच राजवंशात राजसत्तेचे हस्तांतरण होत असताना राजदंड विधिविधानासह वर्तमानातील राजाकडून भविष्यातील राजाकडे सुपूर्त करण्याची परंपरा होती. त्याच ऐतिहासिक परंपरेचा दाखला सेंगोल या राजदंडाच्या प्रतिष्ठापन संदर्भात देण्यात येत आहे.
सेंगोलवरील समृद्धदायिनी लक्ष्मी
सेंगोलवर असणारी लक्ष्मी कमलारूढ आहे. कमला हे लक्ष्मीचेच एक नाव आहे. कमल आणि कमला यांचा चिरंतन संबंध असल्याचे दाखले वैदिक वाङ्मयात सापडतात. लक्ष्मी ही पृथ्वीचेच प्रतीक मानले जाते. पृथ्वी आणि कमळ यांच्यातील निकटचा संबंध ऋग्वेदातील खिलसूक्त असलेल्या श्रीसूक्तात पाहायला मिळतो. श्रीसूक्तातील ‘श्री’ देवी ही लक्ष्मीच आहे. कमळ हे सर्जनाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे, तसेच ते लक्ष्मीरुपाचेही आहे. दीपावलीच्या काळात लक्ष्मीला कुबेराची सहचारिणी म्हणून पुजण्यात येते. कुबेर हा नवनिधींचा प्रमुख आहे. त्याची शक्ती लक्ष्मी आहे. ‘महापद्म’ हे कुबेराच्या अनेक नावांपैकी एक नाव. लक्ष्मीचे एक नाव ‘महापद्मा किंवा महापद्मजा’ आहे. म्हणजेच खुद्द ‘पद्म’ हे लक्ष्मीचेच रूप मानले जाते.
सर्जनाची परिणिती
लक्ष्मी म्हणजे समृद्धी, समृद्धी ही सर्जनाची परिणिती आहे. वैदिक परंपरेनुसार पृथ्वी ही साऱ्या विश्वाची जननी आहे. पृथ्वीचे वर्णन महीपद्मा असे वैदिक परंपरेत करण्यात येते. एकूणच लक्ष्मी ही पृथा आहे. तीच या विश्वाची जननी आहे. म्हणूच या महीपद्मेची उपासना सृजनता व समृद्धी आणण्यासाठी करतात. तसेच भारतीय संकल्पनेनुसार राजा हा भूमीचा स्वामी असतो. या भूमीत महीपद्मेचा वास आहे. ज्या राज्यात ही लक्ष्मी नांदते त्या राज्यात सुख समृद्धी नांदते. म्हणूनच अनेक पौराणिक कथांमध्ये लक्ष्मी सोडून जाता क्षणी त्या राज्यावर दुर्दैवाचे संकट कोसळल्याचे दाखले देण्यात आले आहे. यावरूनच लक्ष्मीची ‘सेंगोल’वरची उपस्थिती काय सांगू पहाते याची प्रचिती येते.
सेंगोलवरील नंदी
नंदी म्हणजे वृषभ, पौराणिक संदर्भानुसार वृषभ हा शिवाचे वाहन आहे. परंतु वैदिक उल्लेखांनुसार रुद्र शिव हा वृषभरूपी होता. नंतरच्या काळात वृषभ व शिव यांचे वेगळे अस्तित्त्व निर्माण झाले. वृष या संस्कृत शब्दाची व्युत्पत्ती ‘वृष्’ या धातूपासून झाली आहे. वृष् म्हणजे सिंचन करणे. वृषभ हा पौरुषाचे प्रतीक मानला जातो. प्रसिद्ध अभ्यासक डॉ. रामचन्द्र चिंतामण ढेरे यांनी नमूद केल्याप्रमाणे ‘द्यावा पृथ्वीच्या संबंधात वृषभ हा दयुलोकाचे प्रतिनिधित्त्व करतो आणि जलवृष्टीच्या द्वारा पृथ्वीला सुफलित करतो. म्हणजे समष्टीच्या संदर्भात तो जलवृष्टी करणारा द्यौ आहे , तर व्यष्टीच्या संदर्भामध्ये तो वीर्यवृष्टी करणारा पुरुष आहे. जल हे पृथ्वीला सुफलित करणारे पुरुषाचे वीर्य आहे. अशी धारणा प्रचलित असल्याचे दिसते.”
नंदी म्हणजे आनंदी
डॉ. वासुदेवशरण अग्रवाल यांनी आपल्या “शिव महादेव” या पुस्तकात नंदी अथवा वृषभरुप शिव हाच ‘महानग्न’ असल्याचे सूचित केले आहे. नंदी म्हणजे आनंदी-आनंददायी. निर्मितीप्रक्रियेत स्त्रीतत्त्वाबरोबर रत होताना त्याचे हे ‘नंदी’ रूप प्रकट होते. या रुपाला डॉ. वासुदेवशरण अग्रवाल यांनी ‘ आनंददायी सर्जनक्षम बीज’ असे म्हटले आहे. एकूणच पृथ्वीच्या सर्जनाच्या प्रक्रियेत नंदी म्हणजेच वृषभ मोलाची भूमिका पार पडतो. या आधी नमूद केल्याप्रमाणे समृद्धी ही सर्जनाची परिणिती आहे. म्हणूनच या विश्वाच्या सर्जनाची प्रक्रिया निरंतर , निर्विघ्न असली तरच समृद्धता अनुभवास मिळते. म्हणूच वृषभ हा राजदंडावर विराजमान होवून पौरुषत्त्व , सृजनता यांचे प्रतिनिधित्त्व करत आहे.
लक्ष्मी आणि नंदी
सर्वसाधारण लक्ष्मीचा संबंध विष्णूशी जोडण्यात येतो. परंतु येथे लक्षात घेण्याचा मुद्दा असा की लक्ष्मी ही भूमीचे – स्त्री शक्तीचे प्रतीक आहे. भारतीय इतिहासात प्राचीन काळापासून सर्व धर्म- संप्रदायांमध्ये लक्ष्मीची उपासना करण्याची परंपरा आहे. बौद्ध, जैन, हिंदू या तीनही धर्मात लक्ष्मी पूजनीय आहे. विशेष म्हणजे लक्ष्मी -भू देवी या तीनही धर्मात सृजनाचेच प्रतीक म्हणूनच सन्मानित आहे. प्रारंभिक काळात ती आपले स्वतंत्र अस्तित्त्व टिकवून होती. परंतु नंतरच्या काळात तिचा संबंध वैष्णव पंथाशी जोडला गेला. तरीही तिचे शक्ती म्हणून इतर देवतांशी आलेले संबंध ऐतिहासिक पुराव्यांच्या माध्यमातून ठळकपणे दिसणारे आहेत. नंदी व लक्ष्मी यांच्या साहचर्यातून शिव व शक्ती यांचे अस्तित्त्व तसेच सर्जन व समृद्धी व्यक्त होणारी आहे. म्हणूनच राजदंडावर या दोन्हींचे एकत्रित स्थान राज्यात सुख व समृद्धी अबाधित राहावी याचेच प्रतीक आहे.
विरोधी पक्षा कडून झालेली टीका
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
आधुनिक भारताची संकल्पना जवाहरलाल नेहरूंनी मांडली. मात्र, देश काही वर्षे मागे जातो की काय, अशी चिंता वाटत आहे. विज्ञानाशी तडजोड करता येत नाही, मात्र आज संसदेत जे काही घडले ते एकदम उलट होते. संसदेच्या उद्घाटन सोहळय़ाला उपस्थित नव्हतो ते बरे झाले.
राहुल गांधी, नेते, काँग्रेस
राज्याभिषेक पूर्ण झाला. अहंकारी राजा रस्त्यावर जनतेचा अवाज दडपून टाकत आहे. संसद हा जनतेचा आवाज असतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र उद्घाटन सोहळय़ाला स्वत:चा राज्याभिषेक मानत आहेत.
नवीन संसद भवनाची ‘राजद’कडून शवपेटीशी तुलना
राष्ट्रीय जनता दलाने (राजद) नवीन संसद भवनाच्या त्रिकोणी आकाराची शवपेटीशी तुलना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवीन संसदभवनाचे उद्घाटन होताच बिहारमध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या राजदने केलेल्या ‘ट्वीट’मध्ये नवीन संसद भवनाची इमारत आणि शेजारी एक शवपेटीचे चित्र प्रसृत करत ‘हे काय आहे?’ असा सवाल केला.
सीताराम येचुरी - सरचिटणीस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय-एम)
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय-एम) सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी ‘ट्वीट’ केले, की हा उद्घाटन सोहळा ‘नव्या भारता’ची घोषणा देत चुकीच्या प्रचाराचा जोरदार हंगामा करून आयोजित केला होता.
विनय विश्वम : खासदार (सीपीआय)
विनय विश्वम म्हणाले, की संसदभवनात काय होणार आहे, हे पहिल्यापासून माहित होते. निर्दयी फॅसिस्ट हुकूमशाही निरंकुश मार्गाने चालली आहे. पंतप्रधान सावरकरांपुढे नतमस्तक झाले तेव्हा देशाला सावरकरांनी ब्रिटिशांकडे केलेल्या दयेच्या अर्जाची आठवण झाली. मोदी नवीन संसदेचा वापर अदानी आणि थेट विदेशी गुंतवुणुकीसाठी करतील.
दीपंकर भट्टाचार्य : सरचिटणीस कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी)
एकीककडे दिल्लीतील महिला सन्मान पंचायतीत जमलेल्या महिला कुस्तीपटू आणि इतर नागरिकांना क्रूर वागणूक दिली जात आहे. तर दुसरीकडे नवीन संसद भवनाचे उद्घाटन हे एखाद्या राजाच्या राज्याभिषेकाप्रमाणे होत आहे. एकीकडे लोकशाहीवर क्रूर हल्ला होत आहे, तर दुसरीकडे घटनात्मक भावना आणि दृष्टिकोनावर गप्पा मारल्या जात आहेत.
डेरेक ओब्रायन : खासदार तृणमूल काँग्रेस
पंतप्रधान मोदी स्वप्रतिमेच्या प्रेमात हरवून आत्मसंतुष्ट झाले आहेत. मोदींच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी संसदेची व सांसदीय कामकाजाची खिल्ली उडवून, अपमान केला.
संजय सिंह :आम आदमी पक्षाचे (आप) ज्येष्ठ नेते
राष्ट्रपतींना आमंत्रण नव्हते. भाजपची मानसिकता नेहमीच दलित आणि आदिवासीविरोधी असते. राष्ट्रीय जनता दलाचे (राजद खासदार मनोज झा उपहासाने म्हणाले, की या विशाल देशाला पुन्हा लोकशाहीकडून राजेशाहीकडे नेण्याचे आपले स्वप्न आज पूर्ण झाले, अशा भावननेने पंतप्रधानांना समाधान वाटत असेल.