राज्यातील मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू, महाराष्ट्र मंदिर महासंघाचा निर्णय
महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये वस्त्र संहिता (ड्रेस कोड) लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतला आहे. नागपुरातील मंदिरात याची सुरुवात करण्यात आली, जळगाव येथे फेब्रुवारी महिन्यात तीनशेहून अधिक मंदिर पदाधिकाऱ्यांचा सहभाग असलेल्या महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेची बैठक झाली. यामध्ये मंदिराचा निधी, शासनाकडे मंदिरे स्वाधीन करणे आदी विषयांवर चर्चा झाली.
जळगाव जिल्ह्यातील (ता. अमळनेर) श्री मंगळग्रह मंदिरामध्ये पहिला निर्णय घेण्यात आला. नागपूरमध्ये सुद्धा गेल्यावर्षी बैठक झाली आणि या उपक्रमाला सक्रिय सुरवात झाली. मंदिराचे पावित्र्य टिकविले गेले पाहिजे. ही भूमिका डोळ्यासमोर ठेऊन वस्त्र संहिता लागू करण्यात आली. देशातील अनेक मंदिरांमध्ये पूर्वी पासूनच वस्त्र संहिता लागू आहे. तामिळनाडूमध्ये उच्च न्यायालयाने वस्त्र संहिता लागू करण्याचे आदेश दिले होते.
मंदिराबाहेर फलक लागणार
काही जण अज्ञानापोटी तोकडे कपडे घालतात. मात्र, मंदिरात प्रवेश करताना अशा स्त्री पुरुषांना ओढणी, रुमाल आदी कापड अंगावर घेऊनच प्रवेश करण्याचा आग्रह मंदिर संस्थांकडून करण्यात येणार आहे. मंदिराबाहेर तसा फलकही लागणार आहे.