एकत्रित प्रयत्नांतून गोवर नियंत्रण
राज्यात गेल्या वर्षी सुरू झालेली गोवरची साथ आता आटोक्यात आली असली तरी त्यामागे राज्य सरकार आणि स्वयंसेवी संस्थांचे एकत्रित प्रयत्न आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये मुंबईपाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्ये गोवरच्या साथीचा उद्रेक झाला. भवानीनगरमधील उद्रेक सर्वात मोठा होता. तेथील आरोग्य केंद्राच्या प्रमुख परिचारिका समिना शेख सांगतात, ‘‘पहिला रुग्ण आढळल्यापासून आजपर्यंत भवानीनगर भागात गोवरचे ५९ रुग्ण आढळले. नोव्हेंबर २२ ते एप्रिल २३ या काळात नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील ८७४ मुलांना म्हणजे १०० टक्के मुलांना गोवर-रुबेलाची लस देण्याचे लक्ष्य आमच्या टीमने पूर्ण केले आहे. गेल्या महिन्याभरात एकही रुग्ण न आल्याने इथली साथ संपली आहे.’’
काय केल्या उपाययोजना ?
‘‘घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. संजयनगरमध्ये सर्वाधिक मुले लसीकरणापासून वंचित होती,’’ यासाठी मग या कक्षाने सूक्ष्म नियोजन केले. आशा आणि युनिसेफ कक्षाच्या प्रतिनिधींनी जी मुले केंद्रावर येत नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचून लसीकरण पूर्ण केले.
‘‘लसीकरण न झालेल्या मुलांसाठी विशेष लसीकरण सत्रे आयोजित केली गेली. नकार देणाऱ्या पालकांचे आरोग्य विभागाच्या टीमने समुपदेशन केले. काही ठिकाणी स्थानिक खासगी डॉक्टर आणि मौलवींचा प्रभाव आहे. तिथे युनिसेफ कक्ष प्रतिनिधींनी त्यांना लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले,’’ विलगीकरण, लसीकरणातून साथ आटोक्यात आणण्यात यश आले. ‘‘शहरात ३७९ सत्रांत ८००३ मुलांना अतिरिक्त मात्रा देण्यात आल्या आहेत. १५ पैकी आठ ठिकाणची साथ संपली असून उरलेल्या सात ठिकाणी तुरळक आढळणारे रुग्णांचे प्रमाणही लवकरच शून्यावर येईल,’’असा विश्वास डॉक्टरांनीव्यक्त केला आहे.
‘‘साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी टास्क फोर्सच्या बैठका घेण्यात आल्या. वैद्यकीय संस्था, बालरोगतज्ज्ञ, सामाजिक संस्था यांचे प्रतिनिधी आणि धार्मिक नेते बैठकांना उपस्थित राहात. शाळांच्या मुख्याध्यापकांनाही माहिती कळवण्यास सांगितले होते.
लसीकरण तुमच्या दारी..
नवजात बालकांसाठी गंभीर ठरू शकतील अशा अनेक आजारांवरच्या लशी सरकार मोफत देते. वयाच्या पाच वर्षांपर्यंत या सात लशी दिल्यास क्षयरोग, पोलिओ, कावीळ, धनुर्वात, हगवण, न्यूमोनिया, मेंदुज्वर, गोवर आदींपासून संरक्षण मिळते. पालकांना पुरेशी माहिती नसणे, स्थलांतर, वेळेचा अभाव, भीती, गैरसमज अशा अनेक कारणांमुळे बहुसंख्य मुले लसीकरणापासून वंचित राहतात. अशा मुलांना आणि त्यांच्यामुळे इतर मुलांनाही सहज टाळता येतील असे संसर्ग होतात. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांचे लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी वंचित राहिलेल्या, लसीकरण अर्धवट सोडलेल्या किंवा नकार देणाऱ्या पालकांपर्यंत पोहोचणे गरजेचे ठरते. वारंवार सांगूनही पालक मुलांचे लसीकरण करत नसतील तर परिचारिका युनिसेफच्या क्षेत्र प्रतिनिधींची मदत घेतात.
भटक्या जाती-जमाती, बांधकाम मजूर हे एका ठिकाणी राहात नाहीत. ते जितके दिवस शहरात असतात तोवर त्यांच्यापर्यंत लस पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. लशींच्या बाटल्यांची, त्यांच्या तापमानाची काळजी घ्यावी लागते. परिचारिकेला एकटीने लसीकरण करणे सोपे जावे यासाठी युनिसेफ टीमने एक खास बॅग तयार केली. त्यात प्रत्येत साहित्यासाठी एक विशिष्ट जागा आहे. दोन्ही बाजूंनी ती पूर्ण उघडत असल्याने तिचा टेबलासारखा उपयोग करता येतो. प्रत्येक लशीची बाटली ठेवण्यासाठी विशिष्ट जागा आणि तिथे नाव लिहिलेले असल्याने चूक वा गोंधळ होत नाही. लसीकरण वेगाने होईल अशी ही रचना केली आहे. अशा सोयी असलेली ही बॅग एकटीला सहज खांद्यावर नेता येते हे विशेष. कोविडपाठोपाठ आलेल्या गोवरच्या साथीवर विविध संबंधित घटकांच्या एकत्रित प्रयत्नांतून मात करणे शक्य झाले आहे.