निवृत्तीबाबत इतक्यात निर्णय नाही – धोनी
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटचा सराव आणि सामन्यांमध्ये खेळल्यामुळे शरीरावर ताण पडत असला, तरी निवृत्तीबाबतचा निर्णय आपण इतक्यातच घेणार नसून विचार करण्यासाठी आठ-नऊ महिन्यांचा कालावधी असल्याचे चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी म्हणाला.
‘‘या स्पर्धेत खेळल्याने माझ्या शरीरावर नक्कीच ताण पडतो आहे. मी चार महिने घरापासून दूर आहे. त्यामुळे भविष्यात मी इतका वेळ घराबाहेर राहणे पसंत करेन का, हे आताच सांगणे अवघड आहे,’’ असे धोनी म्हणाला.
‘‘मी ३१ जानेवारीला घराबाहेर पडलो, माझे दुसरे काम संपवले आणि २ किंवा ३ मार्चपासून सरावाला सुरुवात केली. ‘आयपीएल’सारख्या स्पर्धेची तयारी करताना खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे पुढे काय होईल हे आता सांगू शकत नाही. (निवृत्तीबाबत) निर्णय घेण्यासाठी माझ्याकडे आठ-नऊ महिन्यांचा कालावधी आहे. मी आताच याचा ताण घेणार नाही. पुढील हंगामासाठीची खेळाडू लिलावप्रक्रिया डिसेंबरमध्ये पार पडेल. तोपर्यंत विचार करण्यासाठी माझ्याकडे वेळ आहे,’’ असे ४१ वर्षीय धोनीने सांगितले. यंदाच्या स्पर्धेत खेळताना धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाली. मात्र, त्यानंतरही तो एकाही सामन्याला मुकलेला नाही. ‘‘चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी मी कायम उपलब्ध असेन, मग ते खेळाडू म्हणून असो किंवा अन्य एखाद्या भूमिकेत. मी आता काहीही स्पष्टपणे सांगू शकत नाही,’’ असे धोनी म्हणाला.