चंद्रपूर जिल्हा कारागृहामध्ये तृतीयपंथी कैद्यांकरीता स्वतंत्र व्यवस्था
चंद्रपूर जिल्हा कारागृहामध्ये तृतीयपंथी कैद्यांकरिता स्वतंत्र बॅरेक तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी कारागृह प्रशासनाने बॅरेकचे बांधकाम करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करून निधी मंजुरीकरीता पाठविण्याचे निर्देश कारागृह प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे लवकरच चंद्रपूरच्या कारागृहात तृतीयपंथी कैद्यांकरिता स्वतंत्र बॅरेक उपलब्ध होणार आहे.
जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी कारागृहात अभिविक्षक मंडळाची त्रैमासिक बैठक घेतल्यानंतर त्यांनी कारागृहाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी कारागृह प्रशासनाला तृतीयपंथी कैद्यांकरिता स्वतंत्र बॅरेक तयार करण्याचे निर्देश दिले. त्यासोबतच कारागृह सुरक्षा व सुविधेकरीता कारागृहामध्ये मल्टीपर्पज हॉल, वॉच टॉवर, अतिसुरक्षा कक्षाचे बांधकाम करण्याच्या सूचना दिल्या. कारागृह सुरक्षेकरीता कारागृहामध्ये जास्त प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, वाकी टॉकीज यंत्रणा बसविणे, तसेच मोबाईल जॅमर बसविण्याकरीता वरिष्ठ कार्यालयाशी सातत्याने पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या.