अफूची युद्धे

MPSC TECH
0

 


एकोणिसाव्या शतकात इंग्लंड व चीन यांच्यामध्ये झालेली दोन युद्धे. अफूच्या व्यापारावरील चिनी निर्बंध हे या युद्धांचे तात्कालिक कारण असल्यामुळे यांना अफूची युद्धे म्हणतात; पण मूलत: चीनची हुकमी बाजारपेठ काबीज करण्यासाठी साम्राज्यवादी ब्रिटिशांनी केलेले प्रयत्न व त्यांना थोपविण्यासाठी चीनने योजलेले उपाय यांतून ही युद्धे उद्भवली.

सतराव्या शतकाच्या मध्यास इंग्लंडादी पाश्चात्त्य देशांचा चीनशी व्यापार सुरू झालेला होता. हा व्यापार ‘कोहाँगʼ पद्धतीने म्हणजे चिनी व्यापाऱ्यांच्या श्रेणीमार्फत चाले. शासनाचे प्रतिनिधी म्हणून कोहाँगने पाश्चात्त्यांच्या व्यापारावर अनेक निर्बंध घातल्याने पाश्चात्त्य व्यापारी असंतुष्ट होते. यूरोपातील औद्योगिक क्रांतीतून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे चीनची बाजारपेठ मिळविण्याची इंग्लंडादी देशांची धडपड होती. परंतु चिनी शासनाने पाश्चात्त्यांचा संपर्क टाळला होता. पाश्चात्त्य व्यापारावरील निर्बंधांवरून व विशेषत: अफूच्या व्यापारावरून ब्रिटिशांचे चिनी शासनाशी वारंवार खटके उडू लागले व लहानसहान कुरबुरींचे कालांतराने प्रत्यक्ष युद्धात पर्यवसान झाले.

ब्रिटिशांच्या चीनशी चालणाऱ्या व्यापारात अफूला प्राधान्य होते. चीनमधील अफूच्या वाढत्या व्यसनामुळे १७९५ ते १८३५ च्या दरम्यान हा व्यापार पाचपट वाढला होता. तेव्हा या व्यसनाचे निर्मूलन करण्यासाठी चिनी शासनाने अफूच्या व्यापारावर कडक नियंत्रणे घातली. पण अफूबाजांची वाढती संख्या, या व्यापारातील प्रचंड नफा, चोरट्या व्यापारामुळे लाचखाऊ अधिकाऱ्यांना होणारी मोठी मिळकत इत्यादींमुळे बहुतेक नियंत्रणे निष्फळ ठरली.

ईस्ट इंडिया कंपनीची चिनी व्यापाराची मक्तेदारी संपून १८३४ मध्ये तो सर्व ब्रिटिशांना खुला झाला, तेव्हा ब्रिटिश व्यापाऱ्यांच्या वतीने चीनशी बोलणी करण्यासाठी इंग्‍लंडच्या शासनाने लॉर्ड नेपिअर याला पाठविले. वरवर चिन्यांशी गोडीगुलाबीचे संबंध ठेवावयाचे, परंतु चिनी कायदेकानूंकडे दुर्लक्ष करून ब्रिटिशांचे बस्तान मात्र पक्के बसवावयाचे व अफूच्या व्यापाराचे फायदे मिळवावयाचे, हे नेपिअरचे धोरण होते. चिन्यांच्या हे लक्षात येऊन कँटनच्या चिनी अधिकाऱ्याने नेपिअरला हद्दपार केले. तेव्हा ब्रिटिश शासनानेच चीनवर दडपण आणल्यास चीनशी चालणाऱ्या खुल्या व्यापाराचा फायदा व अफूच्या चोरट्या व्यापाराचा लाभ दोन्हीही मिळतील, असे वाटून इंग्रज व्यापाऱ्यांनी त्या दिशेने हालचालींस प्रारंभ केला. उलट, अफूच्या व्यापारामुळे चीनमधून चांदीची प्रचंड निर्यात होऊन चांदीचे भाव भरमसाट वाढले, त्यामुळे नियमानुसार चांदीच्या रूपाने कर भरणे व्यापारी, शेतकरी आदींना जमेनासे झाले. पाश्चात्त्यांची कायदेशीर व्यापारात गुंतलेली जहाजेच अफूची चोरटी आयातही करतात, शिवाय त्यांवरील अधिकारी चीनच्या किनाऱ्याचे चोरून नकाशेही काढतात, हे पाहून यापुढे पाश्चात्त्यांची गय करावयाची नाही, असे ठरवून चीनच्या शासनाने १८३८ मध्ये लिनद्झी श्यू याची कँटनचा आयुक्त म्हणून नेमणूक केली. ‘ब्रिटिश व्यापाऱ्यांनी अफूचे साठे तीन दिवसांत आपल्या स्वाधीन करून पुन्हा अफू न आणण्याचे आश्वासन न दिल्यास ब्रिटिशांचा सर्व व्यापार बंद होईलʼ, असा हुकूम निघाला. तो धुडकावला जाताच लिनद्झी श्यूने ब्रिटिशांना कँटनमध्ये अडकवून ठेवले व ब्रिटिश वखारींचा अन्नपाणीपुरवठा तोडला. याच सुमारास नेपिअरच्या जागी कॅप्टन एलियट आला. त्याने ब्रिटिश सरकार नुकसानभरपाई देईल, असे व्यापाऱ्यांना आश्वासन देऊन सर्व अफू लिनद्झी श्यूच्या स्वाधीन केली व ब्रिटिश व्यापाऱ्यांना सुरक्षिततेसाठी हाँगकाँगला हलविले. चीनशी किफायतशीर करार झाल्यास अफूचा व्यापार थांबविण्याची इंग्‍लंडची तयारी होती. चिनी शासक त्यांना सवलती देण्यास तयार नव्हते. तेव्हा प्रत्यक्ष युद्ध करूनच हवे ते मिळवावे, असे ब्रिटिशांना वाटू लागले. ह्याच सुमारास हाँगकाँगच्या काही ब्रिटिश खलाशांची चिन्यांशी चकमक होऊन एक चिनी मरण पावला. गुन्हेगारास स्वाधीन करण्याची चिन्यांची मागणी ब्रिटिशांनी फेटाळताच चीनने ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारले. हेच पहिले अफूचे युद्ध (१८३९–४२). ब्रिटिश आरमाराने चिन्यांचा ठिकठिकाणी धुव्वा उडवून कँटन, ॲमॉय, निंगपो, शांघाय, फूजी आदी शहरे झपाट्याने काबीज केली. तेव्हा मांचू सरकारला १८४२ चा नानकिंगचा तह स्वीकारावा लागला. तदनुसार इंग्‍लंडला नुकसानभरपाईदाखल २१० कोटी डॉलर व हाँगकाँग मिळाले. आयात-निर्यात व्यापारावर योग्य नियमानुसार जकात घेण्याचे चिन्यांनी मान्य केले व कँटन, ॲमॉय, फूजो, निंगपो व शांघाय ही बंदरे ब्रिटिश व्यापाराला मोकळी केली. पुढच्याच वर्षीच्या पुरवणी-तहानुसार दोन हक्कही ब्रिटिशांनी मिळविले. पहिल्यानुसार चीनमधील ब्रिटिशांना चिनी कायदेकानू लागू नयेत व दुसऱ्यानुसार इंग्‍लंडला न मिळालेले अधिकार इतर राष्ट्रांना मिळाल्यास ते तत्काळ इंग्‍लंडलाही मिळावेत. यास चिनी शासनाने मान्यता दिली.

तरीही उभयतांत पुन्हा कुरबुरी सुरू झाल्या व त्यांचे पर्यवसान १८५६ मध्ये अफूच्या दुसऱ्या युद्धात झाले. ते तीन वर्ष चालले. या युद्धात फ्रान्सही इंग्‍लंडच्या बाजूला होता. या युद्धातही पराभव होऊन चिन्यांना तिन्‌त्सिन (१८५८) व पीकिंगच्या (१८६०) तहांनी दंडादाखल फार मोठी रक्कम द्यावी लागली. दहा नवी बंदरे पाश्चात्त्य व्यापाराला खुली झाली. कौलूनचा काही भाग इंग्‍लंडला मिळाला. पारपत्रधारक परदेशीयांना चीनमध्ये संचाराचे स्वातंत्र्य व ख्रिस्ती धर्म-प्रचाराची परवानगी मिळाली. इंग्रज व फ्रेंच यांना यांगत्सी नदीवर व्यापारी जहाजे पाठविण्याची सवलत मिळाली. या दोन युद्धांमुळे चिनी जीवनावर दूरगामी परिणाम होऊन चिनी इतिहासातील आधुनिक युगाचा प्रारंभ झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)