(हेरेडिटी). आईबाप व संतती यांचे जवळचे वांशिक संबंध (नाते) सहज ओळखू येण्याइतके साम्य त्या दोघांत असते, ही गोष्ट फार पूर्वीपासून परिचित आहे व यालाच आनुवंशिकता म्हणतात. मराठीतील ‘बाप तसा बेटा’, ‘खाण तशी माती’ अशा वाक्प्रचारांवरून आईबाप व संतती यांच्यामध्ये असलेल्या शारीरिक व मानसिक लक्षणांतील साम्याची कल्पना दिली जाते. इतकेच नव्हे, तर त्या साम्याचे कारणही सूचित केले जाते. मातापितरांची काही लक्षणे संततीत उतरणे ही एक नैसर्गिक घटना असल्याचे या वाक्प्रचारांनी मान्य केले आहे. मातापितरांनी आपली स्थावरादी मालमत्ता संततीला द्यावी तसा हा प्रकार नव्हे कारण शारीरिक व मानसिक लक्षणे ही देण्यासारखी वस्तू नसून ती प्रजोत्पादनात (नवीन संततीच्या निर्मितीत) एका पिढीतून दुसऱ्या पिढीत वंशपरंपरेने उतरतात व हे अटळ असते. सर्व सजीव प्रजोत्पादन करतात म्हणून त्यांच्या जातिविशिष्ट लक्षणांची परंपरा सदैव चालू राहते. सूक्ष्मजंतूपासून ते मनुष्यप्राण्यापर्यंत कोणत्याही सजीवाने (प्राणी किंवा वनस्पती) प्रजोत्पादनाने आपल्यासारखीच संतती निर्माण करावी हा त्यांचा गुणविशेष म्हणजेच आनुवंशिकता असल्याचे आज मान्य झाले आहे. सजीवांच्या या गुणविशेषत्वामुळे भिन्न जाती आपापली प्रमुख लक्षणे पिढ्यानुपिढ्या चालू ठेवतात. ही लक्षणे परंपरेने संततीत उतरण्याच्या प्रक्रियेस अनुहरण म्हणतात
संततीत मातापितरांची लक्षणे उतरण्याची (अनुहरण) पद्धत व यंत्रणा काय आहे यासंबंधीच्या एकोणिसाव्या शतकातल्या जुन्या कल्पना (लामार्क, डार्विन, व्हाइसमान, द व्हरीस इ.) तर्कावर आधारलेल्या असल्याने फार वेळ टिकल्या नाहीत, परंतु मेंडेल यांनी प्रायोगिक पुराव्याने त्यासंबंधी काही निश्चित कल्पना दिल्या त्या आधारावर व पुढे मिळालेल्या शरीरातील कोशिकेच्या (सूक्ष्म घटकांच्या) तपशीलवार माहितीवर आणि प्रायोगिक ज्ञानावर विसाव्या शतकात जनुक-सिद्धांत ( १९१५, टी. एच्. मॉर्गन) प्रस्थापित झाला आहे. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीच्या कोशिकेत आढळणारी, ठराविक स्वरूप व संख्या असणारी रंगसूत्रे → गुणसूत्रे व त्यावरची अतिसूक्ष्म कणांसारखी जनुके (जीन) अनुहरणाबद्दल जबाबदार असतात व परिस्थितिसापेक्ष मातापितरांची लक्षणे संततीत दृष्टोत्पत्तीस येतात, रूपांतरित होतात किंवा नवीनच लक्षणे येतात असे मानले जाते. जीवसृष्टीच्या क्रमविकासामध्ये (उत्क्रांतीमध्ये) म्हणजेच जुन्यापासून नवीन जाती उदयास येण्यामध्ये रंगसूत्रे, जनुके, त्यांचे अनुहरण व परिस्थिती यांचा अत्यंत निकट संबंध आहे. याचा तपशीलवार अभ्यास केल्याने आनुवंशिकी ही नवीन शाखा बनली आहे. त्यातल्या माहितीचा उपयोग करून मनुष्याने आपल्यास पाहिजे असलेल्या काही गुणधर्मयुक्त जाती (पिके, शोभेच्या वनस्पती, पाळीव प्राणी इ.) बनविल्या आहेत.