डॉ. बाबासाहेब आंबेडकर : भाग 1 (जन्म, मृत्य, पुरस्कार )

MPSC TECH
0


 

 जन्म : 14 एप्रिल, 1891

मृत्यू : 6 डिसेंबर, 1956

हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.

सर्वोच्च सन्मान :  इ.स. 1990 मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.

त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.

"द ग्रेटेस्ट इंडियन" म्हणून निवड :  इ.स. 2012 मध्ये, "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे.

मूळ नाव : भीमराव रामजी सकपाळ

(महाराष्ट्रातील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असत व त्यात शेवटी कर शब्द जोडण्याचा प्रघात असे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव "सकपाळ" असतांना त्यांच्या वडिलांनी 7 नोव्हेंबर 1900 रोजी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल) मध्ये "आंबडवेकर" असे आडनाव नोंदवले. साताऱ्याच्या या शाळेत भीमरावांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावांचे आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडनिडे वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमरावांना सुचविले. त्यावर भीमरावांनी होकार दिल्यावर तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव आंबडवेकरचे 'आंबेडकर' असे झाले.)

शिक्षण : नोव्हेंबर, 1896 ते नोव्हेंबर 1923 अशा 27 वर्षांत मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. आंबेडकरांनी या दरम्यान बी.ए., दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट-लॉ, आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. 1950 च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या.

आंबेडकरांनी मांडलेला जातिसंस्था विषयक सिद्धान्त : वर्ग आणि जात तसे मानायचे झाले, तर निकटवर्ती होत. कालांतराने ते अलग होतात. बंदिस्त केलेली, गोठवलेला वर्ग म्हणजे जात’.

अस्पृश्यता निर्मूलन व जातीअंताचा लढा : भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले. त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधली दरी मिटण्यासाठी लग्न, खानपान आणि सांस्कृतिक मिलाप तीन महत्त्वाच्या मार्गांचा उल्लेख केला होता.

साऊथबरो मताधिकार समितीसमोर साक्ष : इंग्रज सरकारकडून भारतातील अस्पृश्य समाजाला राजकीय व सामाजिक स्वरुपाचे हक्क इ.स. 1919 पर्यंत मिळालेले नव्हते. पण ज्यावेळी साउथबरो अध्यक्ष असलेली मताधिकार समिती जेव्हा मुंबई प्रांतात आली, तेव्हा सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यापक असताना आंबेडकरांनी 27 जानेवारी, 1919 रोजी अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 बाबत साऊथबरो मताधिकार समितीसमोर साक्ष दिली व समितीला आपल्या मागण्यांचे पन्नास पृष्ठांचे छापील निवेदनही सादर केले.

निवेदनातील महत्वाच्या मागण्या

अस्पृश्यांना मतदानाचा हक्क पाहिजे.

त्यांना निवडणुकीस उभे राहता पाले पाहिजे.

त्यांच्या मतदारांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेत.

अस्पृश्यांचे अस्पृश्य प्रतिनीधी अस्पृश्य मतदारांनीच निवडले पाहिजेत.

अस्पृश्यांच्या मतदारसंघात अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या पाहिजेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)