अस्पृश्यांच्या परिषदांमधील सहभाग :
महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन : 1920 मध्ये कोल्हापूर जवळील माणगाव आणि नागपूर येथे अस्पृश्यांच्या दोन परिषदा पार पडल्या. कोल्हापूर संस्थानातील माणगाव या गावात 21 मार्च व 22 मार्च 1920 रोजी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष आंबेडकर होते तर शाहू महाराजांची विशेष उपस्थिती होती.
अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदेतील सहभाग : 30 मे ते 1 जून, इ.स. 1920 दरम्यान नागपूर येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद झाली. आंबेडकर आपल्या अनुयायांसह या परिषदेत सहभागी झाले. आंबेडकरांनी या परिषदेमध्ये समाजसेवक विठ्ठल रामजी शिंदे यांचा निषेध करणारा ठराव पास करुन घेतला. अस्पृश्यांना इंग्रज सरकारकडून राजकीय व सामाजिक हक्क कशा स्वरुपात मिळावेत, याविषयी आंबेडकर व शिंदे यांच्यात मतभेद होते. इंग्रज सरकारने अस्पृश्यांना स्पृश्यांच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक हक्क द्यावेत, असे शिंदेंचे मत होते तर त्याच्या उलट इंग्रज सरकारने अस्पृश्यांना अगदी थेट राजकीय व सामाजिक हक्क द्यावेत, असे आंबेडकरांचे मत होते. अस्पृश्यांचे राजकीय व सामाजिक हक्क स्पृश्यांच्या किंवा अन्य कोणाच्याही मर्जीवर अवलंबून असू नयेत, असा आंबेडकरांचा दृष्टीकोन होता.
सातारा जिल्हा महार परिषदेचे अधिवेशन : इ.स. 1926 च्या मे महिन्यात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपुर येथे आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा महार परिषदेचे अधिवेशन झाले. त्यांनी आपल्या भाषणात महार वतनाविषयी सविस्तर माहिती सांगितली. तसेच अस्पृश्य समाजाला ब्राह्मणी विचारसरणीच्या लोकांपासून सावध राहण्यास सांगितले.
शैक्षणिक कार्य
बहिष्कृत हितकारिणी सभा
स्थापना : बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी 9 मार्च 1924 रोजी दामोदर हॉलमध्ये सहकाऱ्यांची बैठक घेऊन 'बहिष्कृत हितकारिणी सभा' नावाची संस्था स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी 20 जुलै 1924 रोजी 'बहिष्कृत हितकारिणी सभा' संस्था स्थापन केली व स्वतः त्या संस्थेचे अध्यक्ष झाले.
बोधवाक्य : संस्थेचे ध्येय व कार्य सूचित करण्यासाठी "शिका, संघटित व्हा व संघर्ष करा" हे क्रियावाचक व आज्ञावाचक शब्द स्वीकारण्यात आले.
ध्येय : भारतीय समाजातील सामाजिक व राजकीयदृष्ट्या तळागाळात असलेल्यांना इतरांच्या बरोबरीस आणणे.
उद्देश : अस्पृश्यांना नसलेल्या नागरी, धार्मिक वा राजकीय हक्कांबद्दल त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे.
आंबेडकरांनी सायमन कमिशनकडे एक पत्र सादर केले व त्यात त्यांनी मागासवर्गीयांसाठी नामनिर्देशन तत्त्वावर जागा आरक्षित ठेवण्यासंबंधी मागणी केली. तसेच भूदल, नौदल व पोलीस खात्यात मागासवर्गीयांची भरती करण्यासंबंधीचीही मागणी केली.
कार्य : सभेमार्फत अस्पृश्यांच्या कल्याणासाठी शाळा, वसतिगृहे व ग्रंथालये सुरू करण्यात आली. बहिष्कृत हितकारणी सभेने अस्पृश्यांमध्ये शिक्षण प्रसार करणे, वाचनालये सुरु करणे, विद्यार्थी वसतीगृहे काढणे इत्यादी कर्तव्ये स्वीकारली.
या संस्थेमार्फत 1925 मध्ये सोलापूर , जळगाव, पनवेल, अहमदाबाद, ठाणे अशा अनेक ठिकाणी वसतीगृहे सुरु करण्यात आली.
बेळगाव येथे मुलांचे वसतीगृह सुरु केले. पुढे इ.स. 1929 मध्ये हे वसतीगृह धारवाडला हलवण्यात आले.
राज्य कायदेमंडळावर नेमणूक : आंबेडकरांनी बहिष्कृत हितकाकारणी सभेतर्फे मुंबई राज्य सरकारकडे मागणी केली होती, की मुंबई राज्य सरकारकतर्फे मुंबई राज्य कायदेमंडळावर (विधिमंडळावर) सदस्य म्हणून अस्पृश्य समाजाचे दोन प्रतिनिधी नेमण्यात यावेत. त्यांची ही मागणी मान्य करुन 1926 च्या डिसेंबर मध्ये मुंबई कायदेमंडळावर आंबेडकर व पुरुषोत्तम सोलंकी यांना नेमण्यात आले.
दलित शिक्षणसंस्थेची स्थापना : 14 जून 1928 रोजी डॉ. आंबेडकर यांनी दलित शिक्षणसंस्थेची स्थापना केली. दलितांच्या माध्यमिक शिक्षणाची सोय करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय होते. माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी पेलण्यास ही संस्था समर्थ नसल्याने दलित विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई सरकारने या संस्थेस मदत करावी असे आवाहन बाबासाहेबांनी केले. त्यामुळे मुंबईच्या गव्हर्नरने 8 ऑक्टोबर, 1928 रोजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 5 वसतिगृहे मंजूर केली. तसेच गव्हर्नरने दरमहा रू. 9000/– चे अनुदानही वसतिगृहांना खर्चासाठी मंजूर केले. जेव्हा ही रक्कम खर्चासाठी अपूरी पडू लागली तेव्हा डॉ. आंबेडकर यांनी मुस्लिम व पारशी समुदायातील धर्मादाय संस्थांकडून व इतर काही देणगीदारांकडून आर्थिक मदत मिळवली.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना : अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 8 जुलै, 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली.आंबेडकरांनी या संस्थेच्यावतीने सन 1946 मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, सन 1950 मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय, सन 1953 मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर सन 1956 मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सर्व समाजांसाठी सुरू केले.