भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अग्रणी भूमिका घेणारे आणि परखड व्यक्तीमत्वाचे थोर भारतीय नेते, भगवद्गीतेचे आधुनिक भाष्यकार व प्राच्यविद्या पंडित.तसेच स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे म्हणून भारतीय समाजात स्वातंत्र्याची ज्योत अखंड पणे तेवत ठेवणारे व अखेरच्या श्वासा पर्यत ब्रिटीश सत्ते विरुद्ध लढा देणारे ज्वलंत व्यक्तीमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.
जन्म : 23 जुलै 1856
मृत्यू : 1 ऑगस्ट 1920
आगरकर आणि टिळक मैत्री : डेक्कन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना टिळक आणि आगरकर यांच्यात मैत्री झाली. पुढे दोघांनी देशकार्याला वाहून घेण्याचा संकल्प केला. याच सुमारास निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचे ठरविले होते तेव्हा टिळक व आगरकर दोघेही त्यांना मिळाले. 1 जानेवारी 1880 रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. टिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा पत्करला.
केसरी व मराठा : टिळक व आगरकर यांनी 1881 मध्ये आर्यभूषण छापखाना काढला आणि केसरी (मराठी) व मराठा (इंग्रजी) ही दोन वृत्तपत्रे सुरू केली. प्रारंभी आगरकर केसरीचे व टिळक मराठ्यांचे संपादक होते. वृत्तपत्रांच्या द्वारे लोकशिक्षण, राजकीय जागृती व शासकीय अन्यायाचा प्रतिकार हे त्यांचे ऐतिहासिक कार्य येथूनच सुरू झाले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना : 1884 मध्ये वेडरबर्न, वर्ड्स्वर्थ, मंडलिक, तेलंग, दांडेकर, य.मो. केळकर, भांडारकर वगैरे प्रभृतींच्या मदतीने टिळक–आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या संस्थेतर्फे 1885 मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.
आगरकर आणि टिळक वाद : राजकीय कार्य आधी की सामाजिक कार्य आधी या विषयावरून टिळक आणि आगरकर यांच्यात वादाला सुरुवात झाला होता. आगरकरांना सामाजिक सुधारणा महत्त्वाच्या वाटत होत्या आणि देश सुधारण्यासाठी किंवा स्वातंत्र्यासाठी ते सामाजिक सुधारणांना प्राधान्य देत. तर स्वतंत्रतेचा किंवा राष्ट्रीयत्वाचा अभिमान म्हणून जो काही जोम आहे, तो जोपर्यंत जाज्वल्य व जागृत आहे तोपर्यंत समाजरचना कशीही असली, तरी त्यातील दोष राष्ट्राच्या उन्नतीस अथवा भरभराटीस आड येत नाहीत, अशी टिळकांची भूमिका होती.
टिळकांचे मत : स्वाभिमान, उत्साह, स्वराज्यनिष्ठा हाच राष्ट्राचा खरा आत्मा किंवा जीव आहे आणि हा जिवंतपणा जेथे वसत आहे, त्या ठिकाणी सुईच्या मागोमाग जसा दोरा तद्वतच सामाजिक सुधारणाही मागोमाग येत असतात, अशी इतिहासाची साक्ष आहे असे ते आग्रहपूर्वक प्रतिपादीत. राष्ट्राची सामाजिक प्रगती होऊ नये, असे त्यांचे म्हणणे नव्हते पण ती राजकीय प्रगतीच्या आणि स्वाभिमानाच्या अनुषंगानेच झाली पाहिजे.
‘आमच्या सुधारणा आम्हीच करू, परकीय सत्तेची ढवळाढवळ आमच्या सामाजिक वा धार्मिक बाबतीत होऊ नये. मात्र लोकमत अनुकूल असेल आणि धर्मवचनांच्या बाबतींत तडजोड होत असेल, तर असा कायदा करण्यास आमची काही हरकत नाही