सार्वजनिक सभा :

MPSC TECH
0

 


सार्वजनिक सभा : न्या. रानडे १८७१ मध्ये पुण्याला बदलून आले आणि पुण्यातील सार्वजनिक सभेची सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली; सार्वजनिक सभेच्या कार्याला राजकीय चळवळीचे स्वरूप दिले. भारतातील प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया प्रथम त्यांनी घातला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक सभेचे चिटणीस गणेश वासुदेव जोशी म्हणजे  सार्वजनिक काका यांनी मोठी कामगिरी केली. महाराष्ट्रात १८७४ ते ७६ या कालखंडात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा सार्वजनिक सभेद्वारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचे सर्वेक्षण केले. त्या सर्वेक्षणात सरकारचे धोरणच शेतकऱ्यांच्या हलाखीस कारण आहे, असे स्पष्ट केले. जनतेला जबाबदार राज्यपद्धती प्राप्त झाल्याशिवाय सामान्य जनतेची आर्थिक स्थिती सुधारणार नाही, असा मुद्दा धरून जबाबदार राज्यपद्धतीच्या मागणीचा अर्ज इंग्लंडच्या पार्लमेंटकडे धाडून दिला. या अर्जावर हजारो लोकांच्या सह्या होत्या. १८७७ मध्ये दिल्ली येथे भरलेल्या दरबारात राणी व्हिक्टोरिया हिला हिंदुस्थानची सम्राज्ञी ही पदवी अर्पण करण्यात आली. त्या प्रसंगी सार्वजनिक सभेतर्फे राणीला एक मानपत्र दिले आणि त्याबरोबर हिंदी जनतेच्या मागण्यांचा अर्जही दिला. रानड्यांच्या या राजकारणाच्या पाठीमागे अखेर बंड उठविण्याचाही उद्देश असावा, अशी त्यावेळी ब्रिटिश सरकारला दाट शंका उत्पन्न झाली. रानड्यांच्या सर्व व्यवहारांवर सरकारने कडक लक्ष ठेवले; परंतु स्पष्ट असा पुरावा उपलब्ध न झाल्यामुळे १८८५ साली रानडे यांना कौन्सिलचे सभासद म्हणून नेमले व फायनान्स कमिटीत घेतले. इ. स. १८९० मध्ये सामाजिक सुधारणेच्या वादाला प्रक्षोभक स्वरूप प्राप्त झाले. रानडे यांनी १८७० मध्ये स्थापलेल्या पुण्यातील सार्वजनिक सभाया संस्थेमध्ये फाटाफूट झाली, दोन गट पडले.  लो. बाळ गंगाधर टिळक व त्यांचे सहकारी यांनी आपले बहुमत स्थापित करून न्यायमूर्ती रानडे आणि त्यांच्या अनुयायांना दूर सारले.

डेक्कन सभा : सार्वजनिक सभेतून बाहेर पडल्यावर रानडे यांनी १८९३ साली पुण्यात डेक्कन सभाही नवी संस्था काढली. त्यावेळी त्यांनी काढलेल्या परिपत्रकात त्यांचे राजकीय तत्त्वज्ञान स्पष्ट झाले आहे. लोकशिक्षण हाच राजकीय चळवळीचा उद्देश त्यांनी त्यात स्पष्ट केला. स्वाभिमान व स्वावलंबन या गुणांनी युक्त नागरिकत्व निर्माण करणे, ही राजकारणाची पहिली पायरी आहे. हे गुण अंगी बाणण्याला दीर्घ कालावधी लागतो. जातिपातीचा दुराभिमान सोडणे हा उदारमतवादाचा महत्त्वाचा भाग आहे, असे त्यांनी दाखवून दिले.

हिंदी अर्थशास्त्राचा पाया : आपल्या देशात औद्योगिक क्रांती व्हावी म्हणून संरक्षक जकातीचे तत्त्व पुरस्कारिले. इंग्रज सरकार भारताच्या आर्थिक विकासाच्या विरूद्ध कसे आहे, ही गोष्ट त्यांनी स्पष्ट केली आणि हिंदी अर्थशास्त्राचा पाया घातला. त्यांनी हिंदी अर्थशास्त्रावर अनेक उद्‌बोधक व्याख्याने दिली.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महत्वाचे योगदान : १८८५ साली काँग्रेसची स्थापना झाली. या स्थापनेच्या कार्यात रानडे यांचा मोठा भाग होता. गोपाळ कृष्ण गोखले यांनी राजकारणात रानडे यांचा ध्येयवाद व धोरण स्वीकारले. गोखले यांनी १९०० साली केलेल्या एक भाषणात म्हटले आहे, की मी रानडे यांच्या पायापाशी शहाणपण शिकलो आहे’.

पहिल्या मराठी ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्ष : मराठी साहित्य संमेलनाची गंगोत्री ठरलेल्या पहिल्या मराठी ग्रंथकार संमेलनाचे (११ मे १८७८) न्यायमूर्ती रानडे हे अध्यक्ष होते.

रानडे यांनी स्थापलेल्या इतर संस्था : सामाजिक परिषद, औद्योगिक परिषद (१८९०)

विवाह : न्या.रानडे यांचे दोन विवाह झाले होते. एक वयाच्या बाराव्या वर्षी आणि प्रथम पत्नी वारल्यावर दुसरा विवाह एकतिसाव्या वर्षी रमाबाईंबरोबर झाला. त्यावेळी ते थोर समाजसुधारक म्हणून नावाजले होते. समाजसुधारणेच्या चळवळी त्यांनी उभारल्या होत्या, तरी वृद्ध वडिलांच्या अत्याग्रहामुळे अकरा वर्षांच्या कुमारिकेबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला. त्यामुळे त्यांच्या समाजसुधारक म्हणून प्राप्त झालेल्या प्रतिष्ठेला धक्का बसला.

लेखन :

राइझ ऑफ द मराठा पॉवर अँड अदर एसेज: साधारणपणे १८९४ पासून पुढील पाच-सहा वर्षे न्या. रानड्यांनी विविध संस्था आणि सभांतून मराठ्यांच्या इतिहासासंबंधी आपले शोधनिबंध वाचले होते. ते पुढे राइझ ऑफ द मराठा पॉवर अँड अदर एसेज(मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष, १९६४) या पुस्तकात संग्रहित करण्यात आले. स्वकीयांच्या दृष्टिकोनातून मराठ्यांच्या इतिहासाची वैशिष्ट्ये निःपक्षपातीपणे सादर करणे व यूरोपीय इतिहासकारांच्या लेखनामुळे त्यासंबंधी निर्माण झालेले गैरसमज दूर करणे, हा या लेखनामागील मुख्य हेतू होता. या लेखनाला जोडूनच मराठी सत्तेचा विस्तार आणि ऱ्हास या संबंधीही पुढील दोन खंड लिहिण्याचा त्यांचा मानस होता; परंतु त्यांच्या निधनामुळे (१९०१) तो पूर्ण होऊ शकला नाही.

न्या रानडे यांच्या निधना नंतर : रमाबाईंनी पतिनिधनानंतर स्त्रियांच्या सेवेस वाहून घेतले. आर्य महिला समाज तसेच लेडी डफरिन फंड कमिटीशी त्यांचा जवळचा संबंध होता. स्त्रियांना व्यावसाय शिक्षण देणारी संस्था स्थापिली. पुण्याच्या प्रख्यात सेवासदनया विविध प्रकारच्या स्त्रीशिक्षणाचे कार्य करणाऱ्या संस्थेच्या त्या प्रमुख प्रेरणास्थान होत्या. शासकीय पाठ्य-पुस्तक समितीवरही चार वेळा त्या होत्या; तसेच महिला संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. भारतीय स्त्रीसाठी केलेले त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण मानले जाते. रानडे यांच्या  निधनांनतर त्यांनी “आमच्या आयुष्यातील काही आठवणी” (१९१०) ही आत्मकथा लिहिली, ती मराठीतील सुंदर साहित्य म्हणून मान्यता पावली. 

 

हे हि वाचा : प्रार्थना समाजाशी संबंधीत महत्वाच्या व्यक्ती 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)