डॉ. बाबासाहेब आंबेडकर : भाग 4 (मंदिर सत्याग्रह)

MPSC TECH
0

 


मंदिर सत्याग्रह

अंबादेवी मंदिर सत्याग्रह :

अमरावती येथील प्राचीन अंबादेवी मंदिरात प्रवेशासाठी अस्पृश्यांनी इ.स. 1925 मध्ये माधोराव गोविंदराव मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनास आंबेडकर, दादासाहेब पाटील, पंजाबराव देशमुख या ब्राह्मणेतर आंदोलनाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता. 26 जुलै, इ.स. 1927 रोजी अमरावती येथे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पंधरा दिवसाच्या आत अंबादेवीच्या पंचसमितीने अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशास संमती दिली नाही, तर अस्पृश्य लोक मंदिरप्रवेशासाठी सत्याग्रह सुरू करतील अशा आशयाचा ठराव समंत करण्यात आला.

कारण : केवळ देवाच्या दर्शनासाठी हा मंदिर सत्याग्रह नव्हता तर हिंदू असूनही हिंदूच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी हा मंदिर प्रवेशाचा संघर्ष होता.

उद्देश : हिंदू दलितांच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर व मंदिरातील मुर्ती अपवित्र वा अशुद्ध होत नाही, हे ही सिद्ध करण्याचा हेतू या चळवळीमागे होता.

परिणाम : मंदिरात प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान कमिटीकडे दोन वेळा अर्ज केला. सुरुवातीला अर्ज फेटाळले गेले नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन दिले.

पर्वती मंदिर सत्याग्रह : पुण्यातील पर्वती टेकडीवरील मंदिर अस्पृश्यांना खुले नव्हते. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर व शिरूभाऊ लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला अर्ज केला. परंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचे सांगून त्यांना प्रवेश देण्याचा किंवा न देण्याचा अधिकार आहे या कारणास्तव हा अर्ज फेटाळला गेला. यानंतर सत्याग्रह मंडळ स्थापन केले गेले. त्यात शिवराम काबंळे (अध्यक्ष), पां.ना. राजभोज (उपाध्यक्ष) व इतर सभासदांचा सहभाग होता. यांनी 13 ऑक्टोबर इ.स. 1929 रोजी पर्वती सत्याग्रह सुरू केला. हा सत्याग्रह आंबेडकरांच्या प्रेरणेने करण्यात आला.

काळाराम मंदिर सत्याग्रह : आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे. काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणजे शोषितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी आंबेडकरांनी स्पृश्य व सवर्णांना केलेले एक आवाहन होते. नाशिकामधील काळाराम मंदिरात हजारो अस्पृश्यांसह प्रवेश करण्याचा निर्धार डॉ. आंबेडकर यांनी केला होता.

उद्देश : फक्त हिंदूंनाच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळच्या दलितांना, शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता.

कालावधी : हा लढा 2 मार्च 1930 ला सुरू झाला आणि पुढील पाच वर्षे चालला.

 

कृषी व शेतकऱ्यांसाठी कार्य

दामोदर खोरे परियोजना : शेतीला पाणी मिळण्या संदर्भात केवळ विचार व्यक्त न करता त्यांनी ब्रिटिश सरकारला, नदीच्या खोर्‍यातील पाण्याच्या नियोजनाची योजना सादर केली. ही योजना दामोदर खोरे परियोजनाम्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र शासनाने 1996 मध्ये कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा अशी खोर्‍यांची विभागणी केली.

शेतीचे राष्ट्रीयकरण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांत महत्त्वाची संकल्पना मांडली ती शेतीचे राष्ट्रीयकरणकरण्याची. शासनाने शेतजमिनी ताब्यात घेऊन, त्या विकसित कराव्यात, अशा विकसित शेतजमिनी शेतकर्‍यांना काही अटींवर कसण्यासाठी द्याव्यात. हा एका अर्थाने सामुदायिक शेतीचाच प्रयोग होता. अशी शेती करण्यासाठी शासनाने अधिनियम बनवावेत. पीकपद्धती, पाणी उपलब्धता, बांधबंदिस्ती, उत्पादकता वाढ, साठवण व्यवस्था, शेतमालाची विक्री, शेतमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम करावेत. यामुळे कोणत्याही एकाच पिकाखाली मोठे क्षेत्र येऊन, शेतमालाच्या उपलब्धतेत विषमता येणार नाही. मागणी व पुरवठा या अर्थशास्त्रीय नियमानुसार, शेतमालाला रास्त भाव मिळतील. त्याचबरोबर अतिरिक्त उत्पादन टळून शेतमालाचे नुकसानही टळेल.

महत्त्वाचे बदल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काही संकल्पनातूनच कमाल जमीनधारणा कायदा, सावकारी व खोती पद्धतींना प्रतिबंध करणारा कायदा, सामूहिक शेतीचे प्रणालीवर आधारित शेती महामंडळ, राज्यातील नद्यांच्या खोर्‍यांची विभागणी व विकास, जलसंवर्धन योजना अमलात आल्या.

शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभाग : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आला होता. हा संप चरी(रायगड जिल्हा) या गावात झाला. हा संप 7 वर्ष सुरु होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खोती पद्धत नष्ट करण्यासाठी संघर्ष केला.  या संबंधी 17 सप्टेंबर 1937 रोजी खोती पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळात मांडले. 10 जानेवारी 1938 रोजी बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली 25,000 शेतकऱ्यांचा मोर्चा विधिमंडळावर काढण्यात आला होता.

पीक विमा योजना व समाजवादाचा सिद्धांत : सप्टेंबर 1918 मध्ये शेतजमिनीच्या समस्येवर आंबेडकर यांनी शोधनिबंध एका प्रसिद्ध मासिकात प्रकाशित केला. या मध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी त्यांनी पीक विमा योजना सुचवली. तसेच शेतीचा विकास करण्यासाठी समाजवादाचा सिद्धांत त्यांनी मांडला.

मतदानाचा अधिकार :  ज्या मतदानाच्या अधिकारासाठी युरोपमधल्या स्त्रियांना संघर्ष करावा लागला तो अधिकार भारतीय स्त्रियांना न मागताच बाबासाहेबांनी  दिला. त्यांनी कुटुंबाचे योग्य नियोजन स्त्रियांशीच निगडित असल्याची स्पष्ट भूमिका घेतलेली दिसते.

चळवलतील स्त्रियांचा सहभाग : बाबासाहेबांनी आपल्या चळवळीत स्त्रियांना आवर्जून सहभागी करून घेतले. 1927 चा महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, 1930 चा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह व 1942 च्या नागपुरातल्या महिला परिषदेत स्त्रिया मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

भारतीय वित्त आयोगाची स्थापना : कायदेमंत्री असताना आंबेडकरांनी इ.स. 1951 मध्ये तात्त्विक आधार त्यांच्या इव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या प्रबंधाचा आधार घेउन भारतीय वित्त आयोगाची स्थापना केली. याला नंतर वित्तच्या ऊर्ध्व आणि क्षैतिज संतुलन समस्येच्या समाधानासाठी संविधानाच्या कलम 280 मध्ये घालण्यात आले.

गोलमेज परिषदांमधील सहभाग : इ.स. 1930, 1931 व 1932 मध्ये इंग्लंडमध्ये तीन गोलमेज परिषदा झाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शोषित व अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून या तिन्हींही गोलमेज परिषदांमध्ये हजर राहिले. अस्पृश्यांना राजकीय हक्क असावेत आणि ब्रिटिशांपासून भारताला स्वातंत्र मिळावे अशा मागण्या त्यांनी गोलमेज परिषदांमध्ये केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)