हडप्पा संस्कृती
इ. स. १९२१ मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन प्रथम सुरू झाले, म्हणून या
संस्कृतीला ‘हडप्पा संस्कृती’ हे नाव मिळाले. या संस्कृतीला ‘सिंधू संस्कृती’ या नावानेही ओळखले जाते. हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे ६५० किलो मीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो येथे
उत्खनन झाले. हडप्पा आणि मोहेंजोदडो या दोन्ही स्थळांच्या उत्खननातून वस्तू आणि वास्तू यांचे जे
अवशेष सापडले, त्यांच्यात कमालीचे साम्य होते.
धोलावीरा, लोथल, कालीबंगन, दायमाबाद इत्यादी ठिकाणीही उत्खननात अशाच प्रकारचे अवशेष सापडले आहेत. हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखीच आढळतात. नगररचना, रस्ते ,घरबांधणी, सांडपाण्या ची व्यवस्था , मुद्रा, भांडी, खेळणी, मृतदेह पुरण्याची पद्धत यांचा त्यांत प्रामुख्याने समावेश होतो.
हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्या ने भाजक्या विटांची होती. काही ठिकाणी कच्च्या विटा आणि दगडांचा वापरही बांधकामासाठी केला जाई. मधोमध चौक आणि त्या भोवती खोल्या अशा प्रकारची घरांची रचना असे. घरांच्या आवारात विहिरी, स्नानगृहे, शौचालये असत. सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था असे. त्यासाठी मातीच्या भाजक्या पन्हाळींचा उपयोग केला जाई. रस्त्या वरील गटारे विटांनी बांधून काढलेली असत. ती झाकलेली असत. रस्ते रुंद असून एकमेकांना काटकोनात छेदतील अशा पद्धतीने बांधलेले असत. त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागेत घरे बांधली जात. नगरांचे दोन किंवा अधिक विभाग केलेले असत आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी केलेली असे.
हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्या ने चौरस आकाराच्या , स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जात. मुद्रांवर विविध प्राण्यांच्या आकृती आहेत. त्यांमध्ये बैल, म्हैस, हत्ती , गेंडा, वाघ यांसारखे खरेखुरे प्राणी आणि एकशृंगासारखे कल्पित प्राणी पाहायला मिळतात. इतर प्राण्यांच्या आकृतींप्रमाणेच मनुष्या कृतीही आढळतात. या मुद्रा ठसा उमटवण्या साठी वापरल्या जात. हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननातून विविध प्रकारची आणि आकारांची भांडी मिळाली आहेत. त्यांमध्ये लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहेत. नक्षीच्या नमुन्यां मध्ये माशांचे खवले, एकमेकांत गुंतलेली वर्तुळे, पिंपळपान यांसारख्या प्रतीकांचा समावेश आहे. हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची भांडी पुरत असत.
मोहेंजोदडो येथे एक प्रशस्त स्नानगृह सापडले आहे. महास्नानगृहातील स्नानकुंड जवळजवळ २.५ मीटर खोल होते. त्याची लांबी सुमारे १२ मीटर आणि रुंदी सुमारे ७ मीटर होती. कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेले होते. त्यात उतरण्यासाठी व्यवस्था होती. तसेच त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय होती.
हडप्पा संस्कृतीचे लोक शेती करत होते. कालीबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे.तेथील लोक विविध पिके घेत असत. त्यांमध्ये गहू, सातू (बार्ली ) ही मुख्य पिके होती. राजस्थानमध्ये सातूचे पीक तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाई. यांखेरीज वाटाणा, तीळ, मसूर इत्यादी पिके काढली जात. हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहीत होता.
उत्खननात मिळालेले पुतळे, मुद्रांवरील चित्रे आणि कापडाचे अवशेष इत्यादी पुराव्यां वरून ते कापड विणत असावेत. स्त्री -पुरुषांच्या पोशाखात गुडघ्या पर्यंतचे वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश होता.विविध प्रकारचे दागिने उत्खननात सापडले आहेत. ते दागिने सोने, तांबे, रत्ने तसेच शिंपले,कवड्या, बिया इत्यादींचे होते. अनेक पदरी माळा,अंगठ्या, बाजूबंद, कंबरपट्टा हे अलंकार स्त्री –पुरुष वापरत. स्त्रिया दंडापर्यंत बांगड्या घालत. हडप्पा कालीन कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे तेथे सापडलेला एक वैशिष्ट्य पूर्ण पुतळा. त्याच्या चेहऱ्याचा प्रत्येक तपशील अत्यंत सुस्पष्ट आहे, एवढेच नव्हे तर त्याने खांद्या वरून घेतलेली शाल आणि त्या शालीवरील त्रिदलाची नक्षीही अत्यंत सुंदर रीतीने दाखवली आहे.
व्यापार
हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेरील देशांशी व्यापार करत असत. सिंधूच्या खोऱ्यात चांगल्या दर्जा चा कापूस होत असे. तो पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या प्रदेशांना निर्यात होत असे. सुती कापड देखील निर्यात होत असे. इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत. काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणि स्तान, बलुचिस्तान येथून चांदी, जस्त, मौल्यवान खडे, माणके, देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात. परदेशांशी चालणारा व्यापार खुश्कीच्या आणि सागरी अशा दोन्ही मार्गांनी होत असे. उत्खननात सापडलेल्या काही मुद्रांवर जहाजांची चित्रे कोरलेली आहेत. लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली आहे. हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्या ने चालत असे.
ऱ्हासाची कारणे
पुन्हा पुन्हा येणारे महापूर, बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे, व्यापारातील घट यांसारख्या गोष्टी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होण्यास कारणीभूत होत्या . त्याचबरोबर पर्जन्यमान कमी होणे, नद्यांची पात्रे कोरडी पडणे, भूकंप, समुद्रपातळीतील बदल यांसारख्या कारणांमुळेही काही स्थळे उजाड झाली. अशा कारणांमुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले आणि हडप्पा संस्कृतीमधील शहरांचा ऱ्हास झाला.