भारतीय उपखंड आणि इतिहास
इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी . स्थल काल व्यक्ती व समाज हे इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत. या चार घटकाशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही.
आपला भारत देश विस्ताराने मोठा आहे त्याच्या उत्तरेला हिमालय पूर्वेला बंगालचा उपसागर पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे भारताची अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळता उरलेला प्रदेश भौगोलिक दृष्ट्या सलग आहे .
प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश हे १९४७ पूर्वी भारताचा भाग होते .
भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता खालील भूप्रदेश महत्वाचे ठरतात.
हिमालय
सिंधू – गंगा – ब्रम्हपुत्रा नद्यांचे मैदानी प्रदेश
थरचे वाळवंट
दक्खन चे पठार
समुद्र किनाऱ्याचे प्रदेश
समुद्रातील बेटे
हिमालय : हिंदुकुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे. या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे मात्र हिंदुकुश पर्वतातील खैबर, बोलन या खिंडीमधून जाणार खुश्कीचा व्यापारी मार्ग आहे. मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला होता. चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशांपर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. कारण या मार्गावरून पश्चिमेकडील देशांत पाठवल्या जाणाऱ्या मालात रेशीम प्रमुख होते. याच खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमकांनी प्राचीन भारतात प्रवेश केला. अनेक परदेशी प्रवासी या मार्गाने भारतात आले.
सिंधू – गंगा – ब्रम्हपुत्रा नद्यांचे मैदानी प्रदेश : सिंधू – गंगा – ब्रम्हपुत्रा या तीन मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्याचा हा प्रदेश आहे. हा प्रदेश पश्चिमेकडे सिंध – पंजाब पासून पूर्वेकडे सध्याच्या बंग्लादेश पर्यंत पसरलेला आहे.
थरचे वाळवंट : थरचे वाळवंट राजस्थान, हरियाना आणि गुजरात या प्रदेशातील काही भागामध्ये पसरलेले आहे. त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानातही आहे. उत्तरेला सतलज नदी पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा, दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी थरच्या वाळवंटात पोचते. पाकिस्तानमध्ये तिला हाकारा या नावाने ओळखतात.
दख्खनचे पठार : एका बाजूस पूर्व किनारा आणि दुसऱ्या पश्चिम किनारा यामध्ये असलेला भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत जातो. त्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र. दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला अरबी बंगालचा उपसागर आहे. तीन बाजुंनी पाण्याने वेढलेला हा भूभाग समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुळक्या सारखा दिसतो. अशा भूप्रदेशाला द्वीपकल्प म्हणतात. भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग दक्खनच्या पठाराने व्यापलेला आहे.
दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वतांच्या रांगा पसरलेल्या आहेत. त्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. त्याला पश्चिम घाट असेही म्हणतात. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबारच्या किनारपट्टी चा प्रदेश आहे. दक्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्व घाट म्हणतात.
समुद्रातील बेटे : अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत. तसेच लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे.
भारतीय उपखंड: पाकिस्तान , नेपाल, भुतान, बांगलादेश, श्रीलंका आणि भारत देश मिळून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो. याच भूभागातील भारताचा विस्तार लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असेही म्हणतात. चीन आणि म्यानमार हे देश मात्र दक्षिण आशियाचा किवां भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत.