राज्यात अवघ्या ३० टक्के शाळा तंबाखूमुक्त.

MPSC TECH
0

राज्यात अवघ्या ३० टक्के शाळा तंबाखूमुक्त.

शाळेतील विद्यार्थी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहावेत आणि एक सुदृढ भावी पीढी निर्माण व्हावी यासाठी आरोग्य विभाग आणि शालेय शिक्षण विभागाने ‘तंबाखूमुक्त शाळा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील ३०.७३ टक्के शाळा तंबाखूमुक्त असल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये गोंदिया, अमरावती, औरंगाबाद, जळगाव आणि कोल्हापूर हे जिल्हे आघाडीवर आहेत. तर रत्नागिरीमध्ये सर्वात कमी शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत.

समाज तंबाखूमुक्त करण्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. त्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करून त्यांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यासाठी आरोग्य विभाग व शालेय शिक्षण विभागाने ‘तंबाखूमुक्त शाळा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील अनुदानित व विनाअनुदानित अशा १ लाख ५ हजार ७५३ शाळांतील विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांसाठी जनजागृती मोहीम राबिवण्यात आली. तसेच शाळेच्या आसपासच्या परिसरातील तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले.

परिणामी, राज्यातील १ लाख ५ हजार ७५३ शाळांपैकी ३२ हजार ४९६ शाळा तंबाखूमुक्त करण्यात आरोग्य आणि शिक्षण विभागाला यश आले आहे. यामध्ये गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक ९७.५६ टक्के शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. त्याखालोखाल अमरावती (९६.३२ टक्के), औरंगाबाद (९५.६६ टक्के), जळगाव (६५.६७ टक्के) आणि कोल्हापूरमधील (५४.३७ टक्के) शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत, सात जिल्ह्यांमधील तंबाखूमुक्त शाळांचे प्रमाण तुरळक

राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक कमी शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. रत्नागिरीमध्ये अवघ्या ३.१७ टक्के शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. तसेच नागपूर (५.०८ टक्के), बीड (५.३० टक्के), पुणे (५.७९ टक्के), भंडारा (८.०७ टक्के), परभणी (८.१८ टक्के) आणि यवतमाळ (९.३६ टक्के) या जिल्ह्यांमध्ये शाळा तंबाखूमुक्त होण्याचे प्रमाण फारच कमी आहे. विशेष म्हणजे शिक्षणाची पंढरी समजली जाणाऱ्या पुण्यातही शाळा तंबाखूमुक्त होण्याचे प्रमाण अल्पच असल्याचे निदर्शनास आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)