प्रज्ञानंदकडून 2700 एलो गुणांचा टप्पा पार
भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने बुद्धिबळाच्या ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये 2700 एलो गुणांचा टप्पा पार केला आहे. प्रज्ञानंदने नुकतेच हंगेरी येथे झालेल्या सुपर ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. 10 खेळाडूंचा समावेश असलेल्या या स्पर्धेत 17 वर्षीय प्रज्ञानंदने 6.5 गुणांसह अव्वल स्थान मिळवले . या कामगिरीच्या आधारे त्याने क्रमवारीत तब्बल 16 स्थानांची बढती मिळवली, शिवाय कारकीर्दीत प्रथमच 2700 एलो गुणांचा टप्पा ओलांडला ..
प्रज्ञानंदची कामगिरी का खास ठरते?
सध्याच्या घडीला भारताच्या केवळ सहा बुद्धिबळपटूंच्या खात्यावर एलो 2700 पेक्षा अधिक गुण आहेत. यामध्ये
पाच वेळा जगज्जेता विश्वनाथन आनंद (नवव्या स्थानी, 2754 गुण),
डी. गुकेश (11व्या स्थानी, 2750 गुण),
विदित गुजराथी (25व्या स्थानी, 2723 गुण),
पी. हरिकृष्णा (28व्या स्थानी, 2711 गुण),
अर्जुन एरिगेसी (29व्या स्थानी, 2710 गुण)
आणि प्रज्ञानंद (31व्या स्थानी, 2707 गुण)
यांचा समावेश आहे. आनंद वगळता भारताच्या या बुद्धिबळपटूंनी क्रमवारीत आगेकूच केली आहे. आजवर भारताच्या केवळ आठ बुद्धिबळपटूंना 2700 एलो गुणांचा टप्पा ओलांडता आला आहे. त्यामुळे प्रज्ञानंदची कामगिरी खास ठरते आहे.