कुस्ती महासंघाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र अपात्र

MPSC TECH
0

 

कुस्ती महासंघाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र अपात्र

कुस्ती महासंघाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र अपात्र

विविध कारणांमुळे लांबणीवर पडलेली भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक 12 ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी एम. एम. कुमार यांनी जाहीर केला. त्याच वेळी महाराष्ट्र राज्याला या निवडणुकीसाठी अपात्र ठरविण्यात आल्याचेही कुमार यांनी स्पष्ट केले.

भारतीय कुस्ती महासंघाने (डब्लूएफआय) महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय सुरुवातीला घेतला होता. महासंघाच्या वतीने हंगामी समितीचीही स्थापना करण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने या निर्णयास न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या बाजूने निर्णय लागला. मात्र, त्यानंतर मुदत संपलेल्या कार्यकारिणीने विशेष अधिकार वापरून राज्य कुस्तीगीर परिषदेची संलग्नता काढून घेत हंगामी समिती कायम ठेवली होती.

डब्लूएफआय’ची निवडणूक जाहीर झाल्यावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि हंगामी समिती या दोघांच्याही वतीने मतदानासाठी हक्क सांगण्यात आला होता. असाच प्रश्न हरियाणा, तेलंगण, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश राज्यांबाबतही होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या सर्वाचे म्हणणेही ऐकून घेतले होते. परंतु आसाम कुस्ती संघटनेने गुवाहाटी न्यायालयात धाव घेतल्याने याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. निवडणूक प्रक्रियेला नव्याने सुरुवात केल्यावर कुमार यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि हंगामी समिती या दोघांनाही निवडणुकीसाठी अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतला.

निवडणुकीत सर्व मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नियमानुसार माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून, ते निवडणुकीसाठी पात्र ठरू शकत नाहीत. अशा वेळी त्यांचा मुलगा करण निवडणूक लढवणार का, याकडे आता नजरा असतील. त्याचबरोबर मध्यंतरी क्रीडा मंत्रालयाने ब्रिजभूषण यांच्या निकटवर्तीयांपैकी कुणालाच निवडणूक लढवता येणार नाही असे म्हटले होते.

न्यायालयात जाण्याची शक्यता

महाराष्ट्र राज्याला या निवडणुकीसाठी अपात्र ठरविण्यात आल्यानंतर या संदर्भात राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्याशी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. परिषदेचे कामकाज पाहणाऱ्या ललित लांडगे यांनीही प्रतिसाद दिला नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निर्णय दुर्दैवी असून, मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी न्यायालयाात जाण्याचा विचार सुरू असल्याचे समजते.

24 राज्यांना मतदानाचा अधिकार

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या संदर्भात घोषणा करताना 24 राज्यांना मतदानाचा अधिकार असल्याचे जाहीर केले. यानुसार आता महासंघाच्या निवडणुकीत प्रत्येक राज्याचे दोन याप्रमाणे 48 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. निवडणुकीसाठी 1 ऑगस्ट रोजी अर्ज भरले जातील. त्यानंतर या अर्जाची छाननी होऊन 7 ऑगस्टला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. यानंतर जर निवडणूक गरजेची असेल, तर 12 ऑगस्ट रोजी मतदानाची प्रक्रिया होईल.

महाराष्ट्र अपात्र का?

महाराष्ट्र राज्याच्या मतदानाचा वाद मिटवण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कुमार यांच्यासमोर झालेल्या चौकशीत राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार आणि सरचिटणीस बाळासाहेब लांडगे दोघेही 70 वर्षे वयाची अट डावलून संघटना चालवत असल्याचे सिद्ध झाले. त्यात भारतीय कुस्ती महासंघाने त्यांची संलग्नता काढून घेतल्यामुळे त्यांना मतदानाच्या अधिकारापासून दूर ठेवले. त्याच वेळी दुसऱ्या बाजूने दावा करणाऱ्या रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखालील संघटनेस महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची मान्यता नसल्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)