सुनील देवधर, सी. टी. रवी यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून उचलबांगडी; विनोद तावडे, पंकजा मुंडे कायम
भाजपने राष्ट्रीय सचिव पदावरून सुनील देवधर व महासचिव पदावरून सी. टी. रवी यांची उचलबांगडी केली आहे. देवधर यांच्याकडील आंध्र प्रदेशचे प्रभारी पद कायम ठेवले आहे. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत सी. टी. रवी पराभूत झाले होते. त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या प्रभारी पदाची जबाबदारीही काढून घेतली जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या नेतृत्वावर नाराज असल्याची सातत्याने चर्चा होत असलेल्या पंकजा मुंडेंना मात्र सचिवपदी कायम ठेवण्यात आले आहे.
नड्डांनी पक्षाध्यक्षपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर, कार्यकारिणीच्या पहिल्या फेरबदलामध्ये विनय सहस्रबुदधे यांना उपाध्यक्ष पदाच्या यादीतून वगळण्यात आले होते. त्यानंतर उपाध्यक्षपदी महाराष्ट्रातून एकाचीही वर्णी लागलेली नाही. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये पुढील चार महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे व छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांना उपाध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे. राजस्थानमध्ये भाजपला विजयाची आशा असून केंद्रीय नेतृत्वाने अखेर वसुंधरा राजेंशी असलेले मतभेद दूर करण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तेलंगणाच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी झालेले संजय बंडी यांचे केंद्रात पुनर्वसन केले जाईल असे सांगितले जात होते, त्यानुसार, त्यांना महासचिव केले आहे.