इराण मध्ये हिजाब परिधान न करणाऱ्या महिलांना मृतदेहांच्या साफसफाईची शिक्षा
इराण सरकार हिजाब परिधान करण्यावरून आक्रमक झाले आहे. त्यामुळे महिलांवर प्रतिबंध घालण्यात येत असून हिजाब परिधान न करणाऱ्या महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा सुनावण्यात येत आहे. ज्या महिला हिजाबबाबतचे नियमांचं उल्लंघन करेल, त्या महिलांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.
इराण सरकार हिजाब न घालणाऱ्या महिलांना मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचारासाठी पाठवत आहे. रिपोर्ट्सनुसार, महिला जितक्या जास्त नियमांचे उल्लंघन करतील तितकीच सरकार त्यांच्यावर कठोर कारवाई करत आहे. इराणची अभिनेत्री अफसाना बेयेगन हिलाही दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच दर आठवड्याला समुपदेशनासाठी मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अभिनेत्रीने यापूर्वी हिजाब न घालता तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते
याआधी तेहरानच्या कोर्टाने हिजाब नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका महिलेला शवागारातील मृतदेह स्वच्छ करण्याची शिक्षा सुनावली होती. पीडित महिला हिजाब परिधान न करता कार चालवताना पकडली गेली होती.
अलीकडेच आणखी एक इराणी अभिनेत्री अजदेह समदी हिने एका अंत्ययात्रेदरम्यान हिजाबऐवजी डोक्यावर टोपी घातली होती. यामुळे इराणच्या न्यायालयाने अभिनेत्रीला मानसिक रोगी म्हणत, दर आठवड्याला मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचारासाठी जाण्याचे निर्देश दिले होते.
पोलिसांच्या छळामुळे महसा अमिनी नावाच्या तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये देशव्यापी निदर्शने झाली होती. या दरम्यान मोठ्या संख्येने महिलांनी हिजाबविरोधात निदर्शने केली होती. महसा हिच्या मृत्यूनंतर निषेध म्हणून मोठ्या संख्येने महिलांनी हिजाब घालणे बंद केले आहे. त्यामुळेच इराण सरकार याविरोधात कठोर भूमिका घेत आहे.