चीनच्या अर्थव्यवस्थेवर ‘डिफ्लेशन’चा धोका कायम
भारतासह जगातील बहुतांश देश सध्या महागाईशी झुंज देत आहेत, तर जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये नवी समस्या निर्माण झाली आहे. देशातील महागाई कमी झाल्यानंतर सर्वसामान्यांना कुठे दिलासा मिळाला असला तरी देशाच्या अर्थव्यवस्थेवर ‘डिफ्लेशन’चे संकट ओढावले आहे. जुलैमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आणि उत्पादक किंमत निर्देशांक (PPI) मध्ये मोठी घसरण झाल्याचे चीनने जारी केलेल्या महागाईच्या आकडेवारीवरून दिसून आले. तेव्हापासून देशात ‘डिफ्लेशन’चा धोका वाढला आहे. गेल्या 2 वर्षांत पहिल्यांदाच चीनमध्ये वस्तू आणि सेवांच्या किमतीत इतकी मोठी घट नोंदवली गेली आहे .
जुलैमध्ये घाऊक आणि किरकोळ महागाई कमी झाली
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, चीनच्या नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स (NBS) ने नुकतीच जुलै 2023 साठी महागाईची आकडेवारी जाहीर केली आहे. जुलैमध्ये चीनमधील ग्राहक किंमत निर्देशांकात मागील वर्षाच्या तुलनेत 0.3 टक्क्यांची मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. ब्लूमबर्गच्या पोलने चीनचा सीपीआय 0.4 टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज व्यक्त केला असला तरी फेब्रुवारी 2021 नंतर प्रथमच सीपीआयमध्ये घट दिसून येत आहे.घाऊक महागाई दर म्हणजेच उत्पादक किंमत निर्देशांक (PPI) बद्दल बोलायचे झाल्यास सलग 10 व्या महिन्यात घसरण सुरू आहे. गेल्या वर्षीच्या जुलैच्या तुलनेत 4.4 टक्क्यांनी घट नोंदवली गेली असली तरी ती अपेक्षेपेक्षा थोडी कमी आहे. नोव्हेंबर 2020 नंतर प्रथमच CPI आणि PPI मध्ये घसरण झाली आहे.
इतर महत्वाची माहिती
डिफ्लेशन’चा धोका कसा वाढला?
चीनमध्ये कोरोनाचा कडक लॉकडाऊन संपल्यानंतर काही काळ व्यवसाय आणि ग्राहकांच्या मागणीत तेजी आली होती, मात्र तेव्हापासून बाजारात मंदीचे सावट आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशाच्या व्यापार आणि निर्यातीत घट झाली आहे. यानंतर चीनचे लोक वस्तूंवर कमी पैसे खर्च करीत आहेत, त्यामुळे मागणी झपाट्याने कमी झाली आहे. म्हणूनच देशावर ‘डिफ्लेशन’चा धोका वाढला आहे. चीनच्या निर्यातीत घट झाल्यामुळे देशातील महागाईत मोठी घट झाल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.
‘डिफ्लेशन’ म्हणजे काय?
वस्तू आणि सेवांच्या किमतीत झपाट्याने होणाऱ्या घसरणीला ‘डिफ्लेशन’ म्हणतात. वस्तू आणि सेवांच्या किमती कमी झाल्यानंतर ग्राहक स्वस्तात खरेदी करू शकतात, परंतु याचा व्यवसायावर खूप वाईट परिणाम होतो आणि कंपन्यांच्या नफ्याचे प्रमाण कमी होते. ‘डिफ्लेशन’ चे मुख्य कारण म्हणजे बाजारात उत्पादनांचे जास्त प्रमाण आणि खरेदीदारांची कमी संख्या आहे. अशा मागणी आणि पुरवठ्यात तफावत असल्याने ‘डिफ्लेशन’ची परिस्थिती निर्माण होते.
चीनमधील गुंतवणुकीवर अमेरिकेची बंधने
अमेरिकास्थित उच्च तंत्रज्ञान कंपन्यांकडून चीनमध्ये होणारी गुंतवणूक रोखण्याच्या किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी कार्यकारी आदेश जारी केला आहे. हा आदेश केवळ चीनपुरताच मर्यादित आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढत्या स्पर्धेचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
बायडेन यांच्या आदेशानुसार, अत्याधुनिक संगणक चिप, मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स, क्वांटम तंत्रज्ञनासंबंधी माहिती आणि कृत्रिम बुद्धीमत्ता या क्षेत्रांशी संबंधित कंपन्यांना चीनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सरकारच्या निर्बंधांचा सामना करावा लागणार आहे.
चीनमध्येही प्रचंड वेगाने तंत्रज्ञानविकास होत असल्याने अमेरिकेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अमेरिकेने मात्र कारण देताना, आर्थिक हित जपण्यापेक्षा राष्ट्रीय सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असल्याचा दावा केला आहे.
चीनबरोबर तीव्र स्पर्धा !
व्यापार क्षेत्रात चीनला एकटे पाडण्याचा किंवा त्यांच्याशी व्यापारी संबंध तोडण्याचा कोणताही विचार नाही, असे अमेरिकेने वारंवार सांगितले असले तरीही, बायडेन प्रशासनाने आतापर्यंत दिलेले आदेश हे चीनबरोबरील व्यापाराला मर्यादित ठेवणारे आहेत.