सात्त्विक-चिरागचा जेतेपदाचा चौकार; कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्य
बॅडमिंटन विश्वातील आपला दबदबा कायम राखताना भारताच्या सात्त्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने रविवारी यंदाच्या हंगामातील चौथे विजेतेपद मिळवले. सात्त्विक-चिराग जोडीने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या फजर अल्फिआन आणि मोहम्मद रियान आर्डिआन्तो या मलेशियन जोडीचा 17-21, 21-13, 21-14 असा पराभव करत कोरिया खुली स्पर्धा जिंकली.
सात्त्विक-चिरागने यंदा कामगिरीत कमालीचे सातत्य राखले. यंदाच्या हंगामात त्यांनी सलग 10 सामने जिंकण्याची कामगिरी करून दाखवली आहे. त्याचबरोबर स्वीस, आशियाई अजिंक्यपद आणि इंडोनेशिया खुल्या स्पर्धेच्या विजेतेपदानंतर आता कोरिया खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावरही मोहोर उमटवली.
सात्त्विक-चिरागचा दबदबा
दुहेरीत आपला ठसा ठसठशीत उमटविणाऱ्या सात्त्विक-चिराग जोडीने राष्ट्रकुल विजेतेपद, थॉमस करंडक विजेतेपद, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक, सय्यद मोदी, स्वीस खुल्या स्पर्धेतील विजेतेपद, थायलंड, भारत खुल्या स्पर्धेत विजेते, फ्रेंच आणि इंडोनेशिया स्पर्धेतही अजिंक्य अशी विजेतेपदाची मालिका राखली आहे.