महाराष्ट्राच्या आतिशकडून रवी दहिया चीतपट; फ्री-स्टाईल विभागातही नवोदित खेळाडूंची चमक
महाराष्ट्राच्या आतिश तोडकरने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत फ्री-स्टाईल प्रकारातील 57 किलो वजन गटात सनसनाटी निकालाची नोंद केली. त्याने साखळी फेरीत ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या रवी दहियाला चीतपट केले. मात्र, आतिशला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. निवड चाचणीच्या दुसऱ्या दिवशी रवी आणि आतिश यांच्यातील लढतीचा निकाल सर्वात लक्षवेधी ठरला. पुढे उपांत्य फेरीत दिल्लीच्या राहुलकडून पराभूत झाल्याने आतिशचीही घोडदौड थांबली.
गुडघ्याच्या दुखापतीनंतर प्रथमच मॅटवर उतरलेल्या रवीला आतिशच्या आव्हानाचा सामना करता आला नाही. त्याच्या हालचालीही मंदावलेल्या दिसल्या. याचा फायदा घेत आतिशने सगळी ताकद पणाला लावून 20-8 अशी आघाडी मिळवली होती. त्याच क्षणी डावावर मिळवलेली पकड घट्ट करत आतिशने रवीला खाली घेतले आणि त्याच स्थितीत त्याचा खांदा मॅटला टेकवत त्याला चीतपट केले.
या वजन गटाचे वैशिष्टय़ म्हणजे यातून महाराष्ट्राचा राहुल आवारेही आपले कसब पणाला लावत होता. मात्र, पहिल्याच फेरीत राहुलला नवोदित खेळाडू अमनकडून पराभव पत्करावा लागला. महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज पाटील हे मल्लही आपापल्या वजनी गटात उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे पुरुष विभागातूनही महाराष्ट्राचा एकही मल्ल भारतीय संघात स्थान मिळवू शकला नाही. दोन दिवस झालेल्या निवड चाचणीनंतर सहाही वजन गटातील विजेते मल्ल आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जातील. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे खेळाडू राखीव असतील.