भारत, न्यूझीलंडदरम्यान व्यवसाय सुलभतेसाठी ‘यूपीआय’ वापरावर चर्चा
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान व्यवसाय सुलभतेला चालना देण्यासाठी भारताची ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’ अर्थात ‘यूपीआय’ प्रणालीच्या वापराबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. या माध्यमातून देशांमधील व्यापार आणि पर्यटनाला अधिक चालना मिळेल, असे वाणिज्य मंत्रालयाने नुकतेच सूचित केले.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार आणि निर्यातवाढ मंत्री डॅमियन ओ’कॉनर यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत न्यूझीलंडच्या मंत्र्यांनी यूपीआय प्रणालीच्या वापराबाबत सहमती दर्शवली आहे. भारताने अलीकडेच न्यूझीलंडला आंब्याची निर्यातदेखील सुरू केली आहे.
यूपीआय प्रणालीची प्रवर्तक नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) आणि फ्रान्सची जलद आणि सुरक्षित ऑनलाइन देयक प्रणाली लारा यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरीदेखील झाली. तसेच सध्या भारताबाहेर, सिंगापूरमध्ये यूपीआय प्रणालीचा वापर सुरू आहे. चालू वर्षातच एनपीसीआय आणि सिंगापूरमधील पेनाऊ यांनी करारावर स्वाक्षरी केली. यामुळे यूपीआयचा वापर सिंगापूरमध्ये आणि पेनाऊचा वापर भारतामध्ये करणे शक्य झाले. संयुक्त अरब अमिराती, भूतान आणि नेपाळने आधीच यूपीआय देयक प्रणाली स्वीकारली आहे.
एनपीसीआयने ‘यूपीआय’ प्रणाली विकसित केली आहे, तिच्यावर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण आहे आणि सध्या देशातील सुमारे 400 बँका आणि बँकेतर वित्तीय कंपन्या या प्रणालीशी जोडल्या गेल्या आहेत.
चालू घडामोडी च्या सखोल अभ्यासासाठी आजच वाचा : Bullet Point (E-Book)