जीवनसत्त्वे ( कार्य, आमापन व मानक )

MPSC TECH
0


 

जीवनसत्त्वे  कार्य, आमापन व मानक : इतर अन्नघटकांप्रमाणे जीवनसत्त्वांचे जठरांत्र मार्गात अवशोषण होते व ती जरूर त्या शरीर भागात रक्तप्रवाहातून नेली जातात. काही जीवनसत्त्वांच्या, विशेषेकरून मेदविद्राव्य जीवनसत्त्वांच्या, अवशोषणाकरिता पित्तरसाची जरूरी असते. अन्नमार्ग निरोगी असल्यास जलविद्राव्य जीवनसत्त्वांचे अवशोषण सहज होते. शरीरातील काही भागांत काही जीवनसत्त्वे साठविली जातात. अ आणि ड जीवनसत्त्वे यकृतात साठविली जातात. १,५०० ग्रॅम वजनाच्या यकृतात अ जीवनसत्त्व ५,००,००० आंतरराष्ट्रीय एकक एवढे साठविलेले असते. दैनंदिन गरज २,५०० एकक मानल्यास हा साठा २०० दिवस पुरतो. जलविद्राव्य जीवनसत्त्वे मूत्रातून उत्सर्जित होत असल्यामुळे त्यांचा शरीरात साठा होत नाही.

जीवनसत्त्वे को-एंझाइमांप्रमाणे कार्य करतात. ती एंझाइम संस्थांचा क्रियाशील भाग आहेत. जीवमात्रांचा आवश्यक अशी ऊर्जा उत्पन्न होण्याकरिता ज्या शारीरिक घडामोडी (चयापचयात्मक क्रिया) होतात त्यांमधील उत्प्रेरकांचे (विक्रियेत भाग न घेता विक्रियेची गती वाढविणाऱ्या पदार्थांचे) कार्य जीवनसत्त्वे करतात. उदा., कार्बोहायड्रेट चयापचयात थायामीन  हे जीवनसत्त्व को-एंझाइमाप्रमाणे कार्य करते. त्याचा अभाव असल्यास कार्बोहायड्रेट चयापचयातील मध्यस्थ पदार्थ लॅक्टिक अम्ल आणि पायरूव्हिक अम्ल शरीरात सांद्रित होतात (साठतात) सर्व तंत्रिका (मज्जा) ऊतकांच्या पोषणाकरिता कार्बोहायड्रेट चयापचय फार जरूरीचा असतो, मात्र तो सदोष असल्यास तंत्रिकांचा ऱ्हास होतो.

जीवनसत्त्वांचे आमापन (क्रियाशीलता ठरविण्यासाठी करण्यात येणारे पृथक्करण) करण्याच्या साधारण तीन पद्धती आहेत : (१) रासायनिक अगर भौतिक-रासायनिक,

(२) जैव व

(३) सूक्ष्मजैव.

अन्नपदार्थांतील जीवनसत्त्वांचे प्रमाण तसेच मानवाची दैनंदिन गरज निरनिराळ्या प्रकारांनी उल्लेखितात. आंतरराष्ट्रीय एकक जैव आमापनाने ठरविले आहे. अमेरिकेन औषधिकोशात या एककाशी जुळणारे परंतु स्वतंत्र एकक वापरले आहे. जीवनसत्त्वांचे मापन मिलिग्रॅममध्येही करतात. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आरोग्य संघटनेने पुरस्कृत केलेली जीवनसत्त्व मानके जगभर उपयोगात आहेत

प्रतिजीवनसत्त्वे : जीवनसत्त्वांच्या विशिष्ट सक्रियतेस प्रतिरोध करणाऱ्या पदार्थांना प्रतिजीवनसत्त्वे म्हणतात. हे पदार्थ जीवनसत्त्वांचे

(१) निष्क्रियीकरण किंवा रासायनिक नाश

(२) चयापचयापासून मिळणारे पदार्थ तयार होण्यास विरोध अगर

(३) स्पर्धाजन्य विरोध यांपैकी कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आणतात.

निसर्गामध्ये असे पदार्थ पुष्कळ आहेत त्यांपैकी काहींचे संश्लेषण करण्यात आले आहे. मानवांत किंवा जनावरांत फारच थोडी प्रतिजीवनसत्त्वे प्रभावकारी ठरली आहेत. प्रतिजीवनसत्त्वे वापरून प्रायोगिक त्रुटिजन्य रोग निर्माण करता येतात. पँटोथिनिक अम्ल  जीवनसत्त्व ब६ यांच्या त्रुटीमुळे होणाऱ्या रोगांचा अभ्यास प्रतिजीवनसत्त्वे वापरून करण्यात आला. प्रतिजीवनसत्त्वांची प्रमुख उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

(१) अंड्याच्या पांढऱ्या बलकात असणारे अव्हिडीन हे प्रथिन बायोटीन  या जीवनसत्त्वास अशोषणीय बनविते. (२) मिरिथायामीन व ऑक्सीथायामीन ही थायामीन  या जीवनसत्त्वाची प्रतिजीवनसत्त्वे आहेत. (३) डिक्युमारॉल हे जीवनसत्त्व के  चे प्रतिजीवनसत्त्व आहे. (४) माशांमध्ये थायामिनेज हे थायामिनाचे प्रतिजीवनसत्त्व असते शिजवण्याने ते नाश पावते. (५) ॲमिनोप्टेरीन व मिथोट्रेलेट ही फॉलिक अम्ल  या जीवनसत्त्वाची प्रतिजीवनसत्त्वे आहेत. (६) पॅरा-ॲमिनो बेंझॉइक अम्ल हा पदार्थ जीवनसत्त्व असल्याचे अजून अनिश्चित आहे. हा पदार्थ वनस्पती व प्राणी यांमध्ये आढळतो. या पदार्थाचे प्रतिजीवनसत्त्व असल्याचा गुण सल्फोनामाइड औषधांत आढळून आला आणि ती औषधे काही सूक्ष्मजंतूंमुळे उद्‌भवणाऱ्या रोगांवर गुणकारी ठरली आहेत.

इ. स. १९४० नंतर अनेक प्रतिजीवनसत्त्व रासायनिक चिकित्सेत फार उपयुक्त असल्याचे आढळले आहे.

पशूंतील जीवनसत्त्वन्यूनता : वर उल्लेख केलेली सर्व जीवनसत्त्वे पशूंच्या आणि कोंबड्यांच्या शरीरपोषणाकरिता व तसेच त्यांच्या शरीरक्रिया व्यवस्थित चालण्यासाठी अल्पप्रमाणात आवश्यक आहेत. जीवनसत्त्वांचे कार्य मानवात होणाऱ्या कार्याप्रमाणेच आहे. नैसर्गिक आहारावर पोसलेल्या जनावरांमध्ये जीवनसत्त्वन्यूनता (आहारातील जीवनसत्त्वांची उणीव) सहसा संभवत नाही. पशूंच्या निरनिराळ्या जातींची त्या त्या जीवनसत्त्वाची गरज कमीजास्त असते. काही जीवनसत्त्वांचे संश्लेषण पशू आपल्या शरीरात करू शकतात. घोडे आतड्यात व गाई-गुरे रोमंथिकेत (पोटातील पहिल्या कप्यात) ब जीवनसत्त्वांचे, त्याचप्रमाणे सर्व पशू सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने कातडीमध्ये ड जीवनसत्त्वाचे संश्लेषण करतात. क जीवनसत्त्वाचे (ॲस्कॉर्बिक अम्लाचे) संश्लेषण पशूंच्या आतड्याचे होते. जीवनसत्त्वांची  अल्प गरज सुद्धा ज्या वेळी पशूंच्या खाद्यातून भागत नाही किंवा त्यांच्या पचन तंत्रात बिघाड होतो, धातुजन्य विषबाधा होते अथवा जीवनसत्त्वांचा जास्त प्रमाणात वापर ज्यांत होतो असे संक्रामक (संपर्काने होणारे) रोग होतात त्या वेळी पशूंमध्ये जीवनसत्त्वन्यूनतेमुळे होणाऱ्या विकारांची लक्षणे दिसतात.

अ जीवनसत्त्वन्यूनता : यामध्ये सर्वसाधारणपणे डोळ्यांचे विकार होणे व त्याचप्रमाणे पशूंच्या वाढीवर विपरीत परिणाम होणे, ही लक्षणे दिसतात. घोड्यांमध्ये रातांधळेपणा, डोळ्यांतून पाणी गळणे, खूर वेडेवाकडे वाढणे, श्वसन तंत्राचे विकार व प्रजननक्षमतेत बिघाड उत्पन्न होणे ही लक्षणे दिसतात. गाई-म्हशीत दुधातून अ जीवनसत्त्व शरीराबाहेर पडत असते व त्यांना ते हिरव्या चाऱ्यातून मिळत असते. ते न मिळाल्यास गर्भपात होतो किंवा अशक्त, आंधळी, अतिसाराचा विकार जडलेली अशी रोगट वासरे जन्मतात व क्वचित झटके येऊन ती मृत्युमुखी पडतात. मोठ्या जनावरांत डोळ्यांचे विकार म्हणजे क्वचित अंधत्व संभवते. शेळ्यामेंढ्यांत हा विकार संभवत नाही पण जेव्हा उद्‌भवतो तेव्हा गायीसारखीच लक्षणे दिसतात. कोंबड्यांच्या पिलांमध्ये अशक्तता, अपूर्ण वाढ, रोगट प्रवृत्ती, डोळ्यांवाटे पाणी येणे, तर वयस्क कोंबड्यांमध्ये अशक्तपणा, नाकाडोळ्यांतून चिकट पांढरा घट्ट स्त्राव येणे व घशामध्ये पिवळट पापुद्रे इ. लक्षणे आढळतात. डुकरांमध्ये पिलांची वाढ खुरटते व मोठ्या डुकरांत वांझपणा दिसून येतो. मांजरांच्या पिलांना अतिसार, तर कुत्र्यामांजरांत स्वच्छमंडलाचे विकार उद्‌भवून क्वचित अंधत्व येते.

{श्लेष्मकला- श्वासनाल, आतडी इ. नलिकाकार पोकळ्यांच्या आतील पृष्ठभागावरील बुळबुळीत ऊतकाचे अस्तर अस्थिमार्दव-हाडे मृदू होणे प्रोथ्राँबीन- रक्त गोठण्यात उपयुक्त असणाऱ्या थ्राँबीन या पदार्थाचापूर्वगामी पदार्थ अरिबोफ्लाविनोसीस-मुखाच्या कोनात, ओठांवर, नाकाच्या व डोळ्यांच्या आसपास जखमा होणे आणि तेलकट खपल्या पडणारी त्वचा ही लक्षणे असणारा रोग स्वच्छमंडल-बुबुळाच्या पुढचा पारदर्शक भाग अधिवृक्क ग्रंथी- प्रत्येक वृक्काच्या वरच्या बाजूला असणारी वाहिनीविहीन ग्रंथी [ अधिवृक्क ग्रंथि] प्लीहा-पानथरी मेरुरज्जू-मेंदूच्या मागील भागातून निघणारा व पाठीच्या कण्यातून जाणारा तंत्रिकांचा दोरीसारखा जुडगा अग्निपिंड-जठराच्या मागील बाजूस असणारी मोठी, लांबट व द्राक्षाच्या घडासारखी ग्रंथी [ अग्निपिंड] }.

 

ब जीवनसत्त्वन्यूनता : घोडे व गाई-गुरे व समूहातील जीवनसत्त्वांचे शरीरात संश्लेषण करू शकतात, त्यामुळे ब जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होणारे विकार त्यांच्यात सहसा उद्‌भवत नाहीत. कोंबड्या स्वतःचीच विष्ठा खाऊन हे जीवनसत्त्व मिळवितात. कोंबड्यांच्या आतड्याच्या शेवटच्या भागात हे जीवनसत्त्व संश्लेषित केले जाते पण ते त्यांच्या शरीराला उपयोगी पडत नाही. पायांतील अधूपणा, नखे आतल्या बाजूस वळलेली दिसणे, अंडी कमी देणे त्याचप्रमाणे उबविण्याकरिता ठेवलेल्या अंड्यांमध्ये १९ ते २१ दिवसांच्या दरम्यान पिले आतल्याआत मरणे व त्यामुळे साहाजिकत बाहेर पडणाऱ्या पिलांचे प्रमाण कमी होणे इ. लक्षणे दिसतात. डुकरांमध्ये आतड्याचा शोथ (दाहयुक्त सूज) व खुरटलेली वाढ ही लक्षणे दिसतात. कुत्र्यामांजरांत थकवा, वल्कचर्म (मुख्यत्वे कातडीचा विकार व त्याबरोबर तंत्रिका तंत्राची अकार्यक्षमता) व डोळ्यांचे विकार उद्‌भवतात.

क जीवनसत्त्वन्यूनता : घोड्यामध्ये व गाई-म्हशींमध्ये वंध्यत्व संभवते.

ड जीवनसत्त्वन्यूनता : घोड्यांच्या स्प्लिंटस (पुढील पायाच्या विशिष्ट हाडाचा विकार), स्पॅव्हिन (मागील पायाच्या विशिष्ट हाडाचा विकार) व रिंगबोन (खुरामधील सर्वांत वरच्या हाडाचा विकार) ह्या विकारांचा [ घोडा] ड जीवनसत्त्व कमी पडत असण्याशी संबंध असावा, असे मानतात. कोंबड्यांच्या पिलांमध्ये पायाची हाडे व चोच ठिसूळ होणे व मुडदूस ही लक्षणे दिसतात. पातळ कवचाची किंवा कवचहीन अंडी देणे, अंड्यांतून बाहेर पडणाऱ्या पिलांचे प्रमाण कमी होणे व अंडी दिल्यानंतर दिसणारा तात्पुरता पक्षाघात ही लक्षणे कोंबड्यांत दिसतात तसेच मोठ्या जातीच्या कुत्र्यांना मुडदूस होतो.

ई जीवनसत्त्वन्यूनता : गाई-गुरांत स्नायूंच्या पोषणात बिघाड होऊन कुपोषण होते. उबविण्याकरिता ठेवलेल्या अंड्यांतून पिले बाहेर येण्याचे विवक्षित प्रमाण असते हे प्रमाण ई जीवनसत्त्वाच्या न्यूनतेमध्ये पुष्कळच कमी होते.

के जीवनसत्त्वन्यूनता : यामुळे कोंबड्यांमध्ये रक्तक्षय होतो. सर्व पशूंमध्ये प्रोथ्राँबिनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे रक्त गोठण्यास विलंब लागतो. यकृताच्या विकारांत के जीवनसत्त्वन्यूनता उद्‌भवण्याचा संभव असतो.

जीवनसत्त्वाच्या न्यूनतेमुळे होणारे विकार त्या त्या जीवनसत्त्वाचा पुरवठा शरीराला सुरू केल्यावर बहुतांशी बरे होतात.मात्र रोगाच्या प्रथमावस्थेत उपचार सुरू केले, तर जास्त गुणकारी ठरतात. पशूंच्या शरीराची जीवनसत्त्वांची गरज अत्यल्प असते. उपचाराच्या वेळी ही गोष्ट लक्षात घेतली गेली नाही व मात्रा जास्त प्रमाणात दिली गेल्यास विपरित परिणाम होतात उदा., ब जीवनसत्त्व (यीस्टच्या स्वरूपात) डुकरांना जास्त दिल्यास मुडदूस होतो.

दीक्षित, श्री. गं.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)