राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या लोगोत आता राष्ट्रीय चिन्हाएवजी ‘धन्वंतरी’
दी नॅशनल मेडिकल कमिशन अर्थात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने आपल्या लोगोमध्ये बदल केला आहे.या लोगोमध्ये पूर्वी राष्ट्रीय चिन्ह आणि इंडिया असे शब्द होते. त्याएवजी आता आयुर्वेदाची देवता असलेल्या धन्वंतरीचे चित्र वापरले आहे,तर ‘इंडिया ‘ऐवजी ‘भारत’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
‘धन्वंतरी’हा भगवान विष्णूचा अवतार असून पुराणात त्याला आयुर्वेदाचा देव मानले जाते.आयोगाच्या अधिकार्यांनी सांगितले की,वास्तविक ‘धन्वंतरी’ लोगो जवळपास वर्षभरापासून वापरात आहे, पण तो काळ्या आणि पांढर्या रंगाचा असल्याने स्पष्ट दिसत नव्हता.आम्ही लोगोच्या मध्यभागी आता फक्त रंगीत चित्र वापरले आहे.आणखी एका अधिकाऱ्याने म्हटले की, जागतिक आरोग्य संघटने (डब्ल्यूएचओ)च्या चिन्हातदेखील संयुक्त राष्ट्राचे चिन्ह आहे,त्यात त्यांच्या एका कर्मचार्यांच्या चित्र असून त्याभोवती सापाचे वेटोळे आहे. कर्मचारी आणि साप हे फार पूर्वीपासून औषध आणि वैद्यकीय व्यवसायाचे प्रतीक आहेत. डब्ल्यूएचओ म्हणते की, हे एस्क्लेपियसच्या कथेतून आले आहे,ज्याला प्राचीन ग्रीक लोक उपचाराचा देव मानत होते आणि ज्यांच्या पंथात सापांचा वापर होता.त्याचप्रमाणे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या लोगोमध्ये ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ हा शब्द वापरला आहे. विशेष म्हणजे लोगो बदलण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
लोगोमधील बदलावर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या केरळ विभागाने टीका केली होती. आयोगाच्या लोगोमध्ये नुकताच केलेला बदल आधुनिक वैद्यकीय समुदायाला मान्य नाही. नवीन लोगोमुळे चुकीचा संदेश जाईल आणि आयोगाच्या वैज्ञानिक आणि धर्मनिरपेक्ष स्वरूपाला हानी पोहोचवेल. हा निर्णय मागे घ्यावा,असे केरळ विभागाने निवेदनात म्हटले आहे.