खगोलशास्त्रज्ञांनी शोधली नवी परिपूर्ण सूर्यमाला
खगोलशास्त्रज्ञांनी एक नवी सूर्यमाला शोधली आहे. पृथ्वीपासून १०० प्रकाशवर्ष अंतरावर असलेल्या सहा ग्रहांच्या या मालेतील सर्व ग्रह अगदी एकसारख्याच आकाराचे आहेत. इतकेच नव्हे तर त्यांचे कक्षेतील भ्रमणही विशिष्ट लयबद्ध आहे, म्हणून या सूर्यमालेला परिपूर्ण असे संबोधले जात आहे. १२ अब्ज वर्षांपूर्वी या सहा ग्रहांची निर्मिती झाली व तेव्हापासून त्यांच्या आकारात अगदी किरकोळ बदल घडले आहेत.
ही सूर्यमाला खगोलशास्त्रज्ञांच्या कुतुहलाचा आणि संशोधनाचा विषय बनली आहे. अशी सौरमालिका कशा पद्धतीने बनते व त्यामधील ग्रहांवर जीवसृष्टी शक्य असते का, याचा आता शोध सुरु आहे. ‘नेचर’ या वैज्ञानिक नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. या मालिकेतील ग्रह एका विशिष्ट पद्धतीने आपल्या तार्याभोवती फिरतात. ज्या काळात सर्वात बाहेरच्या कक्षेतील ग्रह तार्याभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करतो त्याच काळात सर्वात आतल्या कक्षेतील ग्रह ६ प्रदक्षिणा पूर्ण करतो. अमेरिकेतील शिकागो युनिव्हर्सिटीतील डॉ. राफेल ल्यूक यांच्या नेतृत्वाखाली याचे संशोधन झाले. त्यांनीच या सूर्यमालेचे वर्णन ‘द परफेक्ट सोलर सिस्टम’ असे केले आहे.
(MPSC Study, MPSC Notes, MPSC Syllabus, Current Affairs, UPSC, chalu ghadamodi)