देशातील पहिले महिला खुले कारागृह येरवड्यात
देशातील पहिले महिला खुले कारागृह येरवडा येथे होणार आहे. राज्य सरकारने महिला खुल्या कारागृहासाठी ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, कारागृहाची क्षमता १०० असणार आहे. नवीन कारागृह सार्वजानिक बांधकाम विभागाकडून बांधून न घेता पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडून बांधले जाणार आहे.
पुरुषांच्या खुल्या कारागृहाच्या धर्तीवर राज्यात महिलांसाठी खुल्या कारागृहाची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी १५ ऑगस्ट २०१० रोजी येरवड्यात महिला खुल्या कारागृहाचे भूमिपूजन केले होते. खुले कारागृह निर्माण झाल्यावर जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या महिला कैद्यांना कारागृहातील बंदिस्त भिंतीमध्ये शिक्षा भोगण्याऐवजी खुल्या वातावरणात राहता येणार होते. मात्र, नंतरहा विषय बारगळला.
आता १३ वर्षांनंतर राज्य सरकारने देशातील पहिले महिला खुले कारागृह साकारण्यासाठी पावले उचलली आहेत. कारागृह उभारण्यासाठी सरकारने १० कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे देशातील पहिले महिला खुले कारागृह निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १७ एकर जागेत खुले कारागृह बांधले जाणार असून, येथे १०० महिला कैदी ठेवण्याची क्षमता आहे. याशिवाय स्वतंत्र प्रशासकीय इमारत, कैद्यांसाठी बराकीची सुविधा असणार आहे.
(MPSC Study, Current Affairs, UPSC, Study,)