१८५७ च्या उठावातील काही महत्वाच्या व्यक्ती

MPSC TECH
0




मंगल पांडे


जन्म:   जुलै १९, १८२७ नगवा,
फैजाबाद जिल्हा, उत्तर प्रदेश


मृत्यू:   एप्रिल ८, १८५७,
बराकपूर, कलकत्ता, पश्चिम
बंगाल


मंगल पांडे यांचा
जन्म उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील नगवा या गावात १९ जुलै १८२७ रोजी एका
ब्राम्हण परिवारात झाला. त्यांना लहानपणापासूनच धाडसी कृत्यांची आवड होती. नेमबाजी
, तलवारयुध्द इत्यादी कलांमध्ये ते पारंगत होते. ज्या वेळी १८४९ साली,
त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात नोकरीस सुरुवात केली,
त्यावेळी ते २२ वर्षाचे होते. पांडे हे बराकपूर सैन्यदलामधील बंगालच्या
३४ व्या बी. एन. आय तुकडीच्या ५ व्या कंपनीत काम करत होते. कोलकात्याजवळील बराकपूर
येथील १९ व्या पलटणीला दिलेली काडतुसे गाय वा डुक्कर यांची चरबी लावलेली आहेत असा
समज सैन्यात पसरला होता. ही काडतुसे बंदुकीत भरण्यापूर्वी त्यांना लावलेले आवरण
दातांनी तोडावे लागे.


अशा वेळी या आवरणाला लावलेली गाईची वा डुकराची चरबी तोंडात
जाऊ शकेल या भीतीने या पलटणीतील शिपायांनी ती काडतुसे स्वीकारण्याचे नाकारले.
इतकेच नव्हे
, तर प्रतिकारार्थ त्यांनी शस्त्र उपसले. त्या
दिवशी ब्रिटिश अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने ब्रिटिशांनी तो अपमान मुकाट्याने
गिळला. त्यांनी ब्रह्मदेश (म्यानमार)हून गोऱ्या 
सैनिकांची कुमक मागवून या पलटणीला निःशस्त्र करून अपमानित अवस्थेत हाकलून
द्यायचे ठरवले. याची अंमलबजावणी बराकपूरला करण्याचे ठरले. या अपमानास्पद कारवाईमुळे
मंगल पांडेने आपल्या सहकाऱ्यांना ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन केले.


३१ मे रोजी एकदम
सर्वत्र क्रांतियुद्धाला प्रारंभ करण्याची श्रीमंत नानासाहेब पेशवे आदींची योजना
होती. मात्र १९ व्या पलटणीतील स्वदेशबंधूंचा आपल्यादेखत अपमान व्हावा
, ही गोष्ट मंगल पांडे यांना आवडली नाही. मार्च २९, १८५७
रोजी कवायतीच्या मैदानावर मंगल पांडे बराकपूर छावणीत ब्रिटिश करत असलेल्या
अन्यायाविरुद्ध देशी सैनिकांना उत्तेजित करू लागले. "मर्दहो
, उठा !" अशी गर्जना करून ते सैनिकांना म्हणाले, "आता माघार घेऊ नका. बंधूंनो, चला तुटून पडा !
तुम्हाला तुमच्या धर्माची शपथ आहे !! चला
, आपल्या
स्वातंत्र्यासाठी शत्रूचा निःपात करा!!!"


हे पहाताच सार्जंट
मेजर ह्यूसन याने त्यांना पकडण्याची आज्ञा केली
; पण
एकही सैनिक जागचा हालला नाही. उलट मंगल पांडे यांची गोळी लागून ह्यूसन जखमी झाला.
हे पहाताच लेफ्टनंट बॉ घोडा नाचवत मंगलवर चाल करून आला. एवढ्यात मंगलच्या
बंदुकीतून सुटलेली गोळी घोड्याच्या पोटात शिरली. घोडा लेफ्टनंटसह भूमीवर आडवा
झाला. मंगल पांडे यांना पुन्हा बंदुकीत गोळया भरायचा अवसर मिळण्याआधीच लेफ्टनंट बॉ
आपले पिस्तुल काढून उभा राहिला. मंगल पांडे यांनी तिळमात्रही न डगमगता आपली तलवार
उपसली. बॉने पिस्तुल झाडले
; पण मंगल पांडे यांनी त्याचा नेम
चुकवला. आपल्या तलवारीने मंगल पांडे यांनी त्यालाही लोळवले. ह्यूसन व बॉ आपल्या
निवासस्थानांकडे पळून गेले.


एवढ्यात शेख पालटू
नावाचा शिपाई मंगलच्या दिशेने जाऊ लागला. तो आपल्या पलटणीतील असल्यामुळे आपल्याला
मदत करायला येत असावा
, असे मंगल पांडे यांना वाटले;
पण तसे घडले नाही. शेख पालटूने मंगल पांडे यांना पाठीमागून विळखा
घातला. पांडे यांनी त्याचा विळखा सोडवला. देशी शिपाईही शेखच्या रोखाने दगड व जोडे
फेकू लागले. जिवाच्या भीतीने शेख पालटू पळून गेला. थोड्याच वेळात कर्नल व्हीलर
त्या स्थानी आला. त्याने सैनिकांना मंगल पांडे यांना पकडण्याची आज्ञा केली. कर्नल
व्हीलरला सैनिकांनी निक्षून सांगितले
, ``आम्ही या पवित्र
ब्राह्मणाच्या केसालासुद्धा हात लावणार नाही. हिंदुस्थानच्या भूमीवरून वाहाणारे
गोऱ्या  अधिकाऱ्यांचे रक्त आणि समोरचे धर्माभिमानी
शिपाई पाहून कर्नल व्हीलर त्याच्या बंगल्याकडे पळून गेला. नंतर जनरल हिअर्स
पुष्कळसे युरोपियन शिपाई घेऊन मंगल पांडे यांच्यावर चालून गेला. तोपर्यंत दुपार
झाली होती. मंगल पांडे थकले होते. आपण फिरंग्यांच्या हातात सापडणार
, हे पहाताच त्यांनी बंदूक आपल्या छातीकडे रोखली व स्वत:वर गोळी झाडून
घेतली. मंगल पांडे धरणीवर कोसळले. त्यांची शुद्ध हरपली. नंतरच ब्रिटिश त्यांना
पकडू शकले.  जखमी झालेल्या मंगल पांडे
यांना सैनिकी रुग्णालयात नेण्यात आले. आठवडाभरातच त्यांच्यावर सैनिकी न्यायालयात
अभियोग चालवण्यात आला. स्वधर्मावर प्राणापलीकडे निष्ठा ठेवणाऱ्या  या तरण्याबांड क्षात्रवीराला न्यायालयाने इतर
कटवाल्यांची नावे विचारली
; परंतु मंगल पांडे यांच्या मुखातून
कोणाचेही नाव बाहेर पडले नाही. पांडे यांना सैनिक न्यायालयात फाशीची शिक्षा
सुनावण्यात आली. आपल्या देशबांधवांच्या अपमानासाठी स्वतःचे प्राण देणाऱ्या  या क्रांतीच्या अग्रदूताविषयी लोकांत इतकी
विलक्षण श्रद्धा निर्माण झाली होती की
, साऱ्या  बराकपूरमध्ये त्यांना फाशी देण्यास एकही मांग
मिळेना. शेवटी या कामासाठी कोलकात्याहून चार माणसे मागवण्यात आली. मंगल पांडे ज्या
तुकडीचे सैनिक होते
, तिच्या सुभेदाराला इंग्रजांनी ठार
मारले. १९ आणि ३४ या दोन्ही पलटणी त्यांनी निःशस्त्र करून खालसा केल्या. याचा
परिणाम उलटाच झाला. शिपायांना धाक वाटण्याऐवजी शेकडो शिपायांनी आपणहून गुलामीचे
चिन्ह असलेले त्यांचे सैनिकी गणवेश फाडून टाकले.


हाच १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा
प्रारंभ मानला जातो. त्यांच्या नावाचा प्रभाव एवढा विलक्षण होता की
, या क्रांतियुद्धातील सर्व सैनिकांना इंग्रज `पांडे'
याच नावाने संबोधू लागले.


तात्या टोपे


तात्या टोपे यांचा
जन्म १८१४ मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग त्र्यंबक भट. त्यांचे
घराणे मूळचे येवल्याचे. तात्यांचे वडील बाजीराव पेशवे यांच्या धर्मदाय विभागाचे
प्रमुख होते. पांडुरंगरावांची विद्वत्ता आणि कर्तव्यदक्षता या गुणांवर मोहित होऊन
बाजीरावांनी भर राजसभेत अतीमौल्यवान नवरत्नजडित टोपी देऊन त्यांचा सन्मान केला.
तेव्हापासून त्यांचे आडनाव
`टोपे  झाले.


पेशवाईच्या
समाप्तीनंतर बाजीराव ब्रह्मावर्तास गेले. तेथे तात्यांनी पेशव्यांच्या राजसभेत
स्थान पटकावले. सत्तावन्नचा क्रांतीकाल जसजसा जवळ येऊ लागला
, तसतसे ते नानासाहेब पेशव्यांचे प्रमुख सल्लागारही बनले. सत्तावन्नच्या
क्रांतीयुद्धात इंग्रजांना एकाकी
; पण सर्वांत परिणामकारक
झुंज दिली
, ती तात्यांनीच !


झाशीहून निसटून
आलेल्या राणी लक्ष्मीबाइंनी पेशव्यांना ग्वाल्हेर जिंकायचा सल्ला दिला.
तात्यांनाही तो पटला. ग्वाल्हेरचे शिंदे क्रांतीपक्षाला येऊन मिळण्यात उदासीन
होते. त्यांनी क्रांतीकारकां  समवेतच युद्ध
चालू केले
; पण तात्यांना समोर पहाताच शिंद्यांचे सारे
सैन्य तात्यांना येऊन मिळाले. तात्यांनी मग रावसाहेब पेशव्यांच्या आधिपत्याखाली
ग्वाल्हेरला एक स्वतंत्र राज्यच प्रस्थापित केले. ३ जून १८५८ या दिवशी रावसाहेब
पेशव्यांनी भर राजसभेत एक रत्नजडित तलवार देऊन तात्यांना सेनापतीपदाचा मान दिला.


१८ जून या दिवशी राणी
लक्ष्मीबाई धारातीर्थी पडल्या आणि ग्वाल्हेरही इंग्रजांच्या नियंत्रणात गेले.
यानंतर तात्यांनी गनिमी पद्धतीने झुंजण्याची रणनीती आखली. तात्यांना नामोहरम
करण्यासाठी मग ब्रिटिशांनी त्यांचे वडील
, पत्नी आणि
मुले यांना अटकेत टाकले. तात्यांना पकडण्यासाठी ६ इंग्रज सेनानी तीन दिशांनी
प्रयत्न करत होते
; पण तात्या त्यांच्या जाळयात येत नव्हते.
यातील तीन सेनानींना हुलकावणी देऊन आणि पाठलागावर असणाऱ्या इंग्रज सैन्याची
दाणादाण उडवून २६ ऑक्टोबर १८५८ या दिवशी तात्या नर्मदा नदी ओलांडून दक्षिणेत
उतरले. या घटनेला इंग्लंडमधीलच नव्हे
, तर युरोपातील
वर्तमानपत्रांनीही प्रमुख स्थान दिले. ही बातमी तात्यांच्या रणकुशलतेचे श्रेष्ठत्व
पटवून देणारी होती.


सहस्रोच्या इंग्रज
सैन्यावर हा वीर मूठभर सैन्यानिशीच आक्रमण चढवायचा. अत्यंत अवघड असलेला आणि
तुटपुंजे सैन्यबळ असतांना तात्यांनी काल्पीचा किल्ला जिंकून इंग्रजांना आपल्या
पराक्रमाची चुणूक दाखवली. इतकेच नव्हे
, तर
तात्यांनी इंग्रज सैन्यात सर्वश्रेष्ठ असलेल्या जनरल विंडहॅम या सेनापतीचा आणि
त्याच्या सैन्याचा धुव्वा उडवला.


सतत १० महिने
एकट्याने इंग्रजांच्या नाकीनऊ आणणाऱ्या तात्यांना पकडण्यासाठी शेवटी इंग्रजांना
फितुरीचा आश्रय घ्यावा लागला. ग्वाल्हेरच्या राजाविरुद्ध अयशस्वी बंड केलेल्या
मानसिंगच्या करवी ७ एप्रिल १८५९ या दिवशी तात्यांना परोणच्या अरण्यात झोपेत
असतांना पकडण्यात आले. १५ एप्रिल या दिवशी तात्यांचा अभियोग सैनिकी न्यायालयासमोर
शिप्री येथे चालू करून त्याच दिवशी घाईने पूर्ण करण्यात आला. या न्यायालयाचा निकाल
ठरलेला होता.


१८ एप्रिल १८५९ या
दिवशी सायंकाळी ग्वाल्हेरजवळील शिप्रीच्या किल्ल्याजवळील पटांगणात तात्यांना जाहीर
फाशी देण्यात आले.


झाशीची राणी लक्ष्मीबाई


जन्म:   नोव्हेंबर १९, इ.स.
१८३५ काशी
, भारत


मृत्यू:   जून १८, इ.स. १८५८
ग्वालियर
, मध्य प्रदेश


लक्ष्मीबाईंचे मूळ
नाव मनिकर्णिका होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या
आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील धावडशी गावचे होते.
लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला
होता. धोरणी
, चतुर, युद्धशास्त्रनिपुण,
शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः
कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या
,
वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणाऱ्या
लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात
श्रीमंत धोंडोपंत बाजीराव पेशवे व नानासाहेब पेशवे आणि जयाजी शिंदे व लक्ष्मीबाई
या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातही प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या
पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत
पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची
एकाग्रता
, विलक्षण चपळता, शरीराचा तोल
सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य
, काटकपणा आणि चतुरस्र भान
वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज
झाल्या.लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या समाजाने एका
विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोषाखात
वावरण्याचे ठरवले.


इ.स. १८४२मध्ये
त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेव्हा
त्यांचे नाव बदलून लक्ष्मी असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांत
राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले.


दरबाराचे कामकाज
राणीने पाहणे गंगाधररावांस पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईंनी
स्वत्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम
, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी
नियमित सुरू ठेवली.


गंगाधरराव नेवाळकर व
लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला परंतु तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला.
मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दुःखी
झाले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे
नाव ठेवले. इ.स. १८५३मध्ये गंगाधररावांचे निधन झाले.


ईस्ट इंडिया
कंपनीद्वारे ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे पूर्वीपासून
झाशीच्या ब्रिटिशांशी असणाऱ्या मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना वाटत
होते. त्यासाठी लक्ष्मीबाई स्वतः ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या
पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय
, बेकायदेशीरपणा
आणि खोडसाळपणा उघड केला. एका पत्रात त्यांनी झाशी संस्थान खालसा केले
, तर पूर्ण हिंदुस्थानातील लोकांना हळहळ वाटेल. परिणामी हिंदुस्थानातील
लोकांना ब्रिटिशांबद्दल भरवसा
, विश्वास वाटेल का?, अशी शंका व्यक्त करून कंपनीला एक प्रकारचे आव्हान दिले. कंपनी सरकारच्या
बेजबाबदार अनैतिक कृत्यांनी व कंपनीच्या अधिकाराला आव्हान देण्याचे धारिष्ट्य
करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या काही व्यक्तींमधील एक होत्या.परंतु
हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतलेलाच
असल्याने झाशी संस्थानही खालसा करण्यात आले. १३ मार्च
, इ.स.
१८५४ रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. त्यानुसार दत्तक
विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारांत विलीन करण्यात आले. त्या वेळीच
स्वाभिमानी राणीने माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार काढले.


झाशी खालसा झाल्यावर
लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. राणी
लक्ष्मीबाईंना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले होते.


इ.स. १८५७ चा उठाव हा
पूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणे ५ जून
, १८५७ ला
झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या
परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर
राहण्यास गेल्या. पुढे २२ जुलै
, इ.स. १८५७ ला ब्रिटिशांनी
राणींना झाशीची अधिकारसूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या
झाल्या होत्या
, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती
राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात
असुरक्षित भविष्याबद्दल भीती होती. परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने
परिस्थिती हाताळली. जुन्या विश्र्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही
अधिकाराची पदे दिली. दिवाण लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री
, तर
प्रत्यक्ष वडिलांना  मारोपंत
तांब्यांना  खजिनदार केले. लक्ष्मणरावांचा
भाऊ
, मुलगा तसेच मुन्सफ, भोलानाथ,
आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या
जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकुरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळविले
; राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी
केलेल्या २२ तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मितीही सुरू केली.
इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून
घेतले. परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करीत असतानाच राणींनी प्रजेचा स्वाभिमान
,
निष्ठा वाढवण्याचा व आनंद जपण्याचा प्रयत्न केला. दानशूर, श्रद्धाळू व दयाळू लक्ष्मीबाईंनी थंडीत कुडकुडणाऱ्या हजार-दीड हजार
गरिबांना
, साधू-संन्याशांना उबदार कपड्यांचे वाटप केले.
स्वतःबरोबर प्रजेच्या श्रद्धा जपणाऱ्या राणीने गोवध बंदी केली. त्यांनी किल्ल्यावर
रंगपंचमीसारखा सण साजरा करून स्त्रियांसाठी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम केले.


अशा प्रकारे प्रशासन, सैन्य व कल्याणकारी कामे यांची चोख व्यवस्था लावून स्वराज्य असल्याचा
विश्र्वास राणी लक्ष्मीबाईंनी जनतेत निर्माण केला. प्रजेला मुक्त मनाने आपल्या
आवडीच्या गोष्टी करण्यासाठी
, त्यांच्या कलेची जोपासना
करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी झाशीमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग घडवून
आणले. मराठी भाषिकांसाठी रासक्रीडा
, चित्रलेखा, बाणासूर इ. नाटके योजली. स्वतःही नाटकांचा आनंद घेतला. एक स्थिर, सुरक्षित, समृद्ध व सुसंस्कृत राज्य घडवण्याचा
प्रयत्न राणी लक्ष्मीबाईंनी केला. यामुळे राणी आणि झाशीतील प्रजा यांच्यातील नाते
दृढ झाले.


दरम्यान २१ मार्च, इ.स. १८५८ ला सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणीस
नि:शस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. ब्रिटिशांनी केलेल्या
विश्र्वासघातामुळे
, अन्यायामुळे भारतात
विदेशी शासन नकोच
अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे
नाकारले. त्याच वेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर
हल्ला करण्यास सुचविले.


उत्तम प्रतीचा सेनानी
आणि कर्तबगार राजकारणी असणाऱ्याया ह्यू रोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी
आजुबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळविला. त्या टेकड्यांवर तोफा चढवल्या. २-३ दिवस
झाशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज भवानीशंकर
, कडक बिजली
या तोफा आपल्या नावाप्रमाणे कार्यरत होत्या. घौसखान याने तर तोफेमधून असा मारा
केला
, की त्यामुळे दोन शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही
झाशीतील लोक त्याला धन्यवाद देतात. युद्धाच्या ९ व्या दिवशी इंग्रजांनी
पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पाडली. ही खिंडारे
बुजवण्यासाठी रातोरात काम केले गेले. शेवटी ब्रिटिशांना फितुरांनीच साथ दिली.
झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहिरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा व्हायचा
,
ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा, तो
कारखाना
, ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. अशा
स्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणाऱ्या मदतीवर होती. त्याप्रमाणे ३१ मार्चला
तात्या टोपेंचे सैन्य आले. परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.


राणी लक्ष्मीबाईंनी
सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावरच लढण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर
रणांगणात तुम्हाला मृत्यू आला, तर तुमच्या
विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन असे आश्र्वासन दिले. राणीचे डावे-उजवे हात
असणारे खुदाबक्ष आणि घौसखान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यावर मात्र
बिकट परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत
,
सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी
प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय अंमलात आणला. संतापलेल्या राणीची तलवार अशी
तळपत होती
, की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता.
त्यांचे धैर्य
, शौर्य, आवेश पाहून ह्यू
रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन लक्ष्मीबाईंना परत
किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकाऱ्यांशी लक्ष्मीबाईंनी चर्चा केली आणि
निर्णयानुसार रातोरात त्यांनी झाशी सोडले. सतत ११ दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत
ठेवले. लढाईचा साक्षीदार ह्यूज रोजनेही म्हटले की
राणी
लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.


या पराभवानंतर राणी
पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेली. तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या
सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैन्यांमध्ये फिरून
, सैनिकांची चौकशी करीत, इंग्रजांना रोखण्यासाठी कशा
प्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली. याच वेळी १८ जून इ.स.
१८५८ रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ येऊन
पोहोचला. त्याने त्वरित हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली.
लक्ष्मीबाई तलवारीचे सपसप वार करीत समोर येणाऱ्या ब्रिटिश सैन्याला कापून काढत
होत्या. आवेगाने
, विजेसारख्या तळपणाऱ्या राणींकडे पाहून
त्यांचे सैन्यही त्वेषाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणारच होते
,
त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली.
दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या
काही स्वारांनिशी बाहेर पडल्या. थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला.
नेहमीचा घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता. काही केल्या घोडा ओढा ओलांडत
नव्हता. तिथे इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्तबंबाळ होऊन घोड्यावरून
खाली कोसळल्या. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली
, परंतु
पुरुषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाहीत. ते पुढे
निघून गेले. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या सेवकाने एका मठात
आणले. परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती. आपला देह क्रूर इंग्रजांच्या
हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्या सेवकाने त्यांना मुखाग्नी दिला.
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी मरण स्वीकारले आणि
अशाप्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)