
जालियनवाला
बाग हत्याकांड
(१९१९)
सरकारने स्थानिक नेते डॉ. सफुद्दीन किचलू व सत्यपाल या
दोन नेत्यांना अटक केल्यामुळे पंजाबमधील अमृतसर शहरात
एक निषेध सभा बोलाविण्यात आली. लोक संतापलेले होते. लोकांमधील असंतोष लक्षात घेऊन सरकारने जमावबंदी व सभाबंदी आदेश
लागू केला, परंतु सरकारी आदेशाला न जुमानता स्थानिक
लोकांनी १३ एप्रिल १९१९ रोजी जालियनवाला बागेत निषेध सभा बोलाविली. या सभेला मोठय़ा संख्येने लोक जमले. सरकारच्या आदेशाविरुद्ध इतक्या मोठय़ा संख्येने लोक एकत्र आल्याचे पाहिल्यावर तेथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेला जनरल डायर हा इंग्रज अधिकारी संतप्त झाला. त्याने नि:शस्त्र लोकांना चहूबाजूंनी घेरले आणि जमावाला कोणतीही पूर्वसूचना न देता गोळीबार
करण्याचा आदेश आपल्या सनिकांना दिला.
सरकारच्या अंदाजानुसार मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या सुमारे चारशे इतकी होती, परंतु प्रत्यक्षात ती संख्या त्यापेक्षाही मोठी होती. याखेरीज गोळीबारात हजारो जायबंदी झाले होते. जालियनवाला बाग हत्याकांडावेळी पंजाबचा गव्हर्नर मायकेल ओडवायर हा होता. जालियनवाला बाग हत्याकांड चौकशीसाठी सरकारने हंटर कमिटी १ ऑक्टोबर १९१९
रोजी नेमली. या घटनेच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोरांनी सर व गांधीजींनी कैसर-ए-हिंद या पदव्यांचा त्याग केला.