प्लासी चे युद्ध
बंगालचा नबाब सिराजउद्दौला व ईस्ट इंडिया कंपनी यांत दि. २३ जून १७५७ रोजी बंगालमधील हुगळी (भागीरथी) नदीकाठी प्लासी (पलास) या गावाजवळ झालेली ऐतिहासिक महत्त्वाची लढाई. इंग्रजांना बंगालमध्ये फ्रेंचांचे वर्चस्व नष्ट करून आपली सत्ता प्रस्थापित करायची होती. त्यात सिराजउद्दौला हा मोठा अडसर होता. म्हणून त्यांनी काहीतरी निमित्त शोधून सिराजउद्दौलावर हे युद्ध लादले.
या युद्धाने ईस्ट इंडिया कंपनीला भारतीय बंगाल मध्ये पर्यायाने भारतीय राजकारणात प्रवेश करण्याची संधी मिळाली
पार्श्वभूमी
औरंगजेबाच्या मृत्यू नंतर पूर्वी बिहारचा नायब नवाब अलिवर्दी खान याने राजकीय परिस्थितीचा फायदा उचलून आपली शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढवली त्याने बंगालच्या तत्कालीन नवाब सरफराज खानला युद्धात पराभूत करून ठार केले आणि तो स्वत: नवाब झाला.
९ एप्रिल रोजी अलिवर्दी खान यांचे निधन झाले. अलिवर्दी खान यांना स्वतःची मुले नव्हती, परंतु मृत्यू पूर्वीचा अलीवर्दी यांनी आपल्या सर्वात लहान मुलीचा मुलगा सिराजउद्दौला याला वारस म्हणून नेमले होते. त्यामुळे त्याच्या मृत्यू नंतर. सिराजउद्दौला बंगालचा नवाब बनला. सिराजउद्दौला (कालावधी १० एप्रिल १७५६ ते २३ जून १७५७) हा अलीवर्दीखान याचा नातू (मुलीचा मुलगा) वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी तो बंगालचा (ओरिसा, बंगाल व बिहारचा सुभेदार) नबाब झाला. या सुमारास इंग्रजांनी कलकत्त्यातील फोर्ट सेंट विल्यम किल्ल्याची डागडुजी विनापरवाना सुरू केली, म्हणून त्याने कलकत्त्यावर स्वारी करून तो किल्ला काबीज केला. कलकत्त्यावर इंग्रजांचा पुन्हा हल्ला होईल याची सिराजला कल्पना नव्हती. रॉबर्ट क्लाइव्ह व ॲडमिरल चार्ल्स वॉट्सन यांनी २ जानेवारी १७५७ रोजी कलकत्त्यावर स्वारी करून कलकत्ता काबीज केले. तेव्हा ९ फेब्रुवारी १७५७ रोजी सिराजने ईस्ट इंडिया कंपनीबरोबर अलीनगर येथे शांततेचा तह केला या तहानुसार सिराजने कंपनीला अनेक सवलती दिल्या. बंगालची शांतता भंग होईल असे कोणतेही वर्तन उभयपक्षांकडून होणार नाही, अशी महत्त्वाची अट या तहात होती. यानंतर काही दिवसांतच यूरोपमध्ये इंग्लंड व फ्रान्स यांत युद्ध सुरू झाले. सिराजची सहानुभूती फ्रेंचांकडे होती आणि गुप्तपणे त्यांची मदतही तो घेत असे त्यांच्या व्यापारी वखारींना सवलती देई. या गोष्टी इंग्रजांना माहीत होत्या. इंग्रजांना सिराजविरुद्ध युद्ध करण्यास हे निमित्त पुरेसे होते. शिवाय फ्रेंचांचे बंगालमधील वर्चस्व त्यांना नष्ट करायचे होते. म्हणून इंग्रजांनी अलीनगरचा तह धुडकावून २३ मार्च १७५७ रोजी फ्रेंचांचे चंद्रनगर हे ठाणे काबीज केले आणि सिराजउद्दौला विरूद्ध एक कारस्थान रचले. या कारस्थानाचा मुख्य सूत्रधार कलकत्ता कौन्सिलचा एक सभासद व सेनानी रॉबर्ट क्लाइव्ह होता. त्याने सिराजउद्दौलाचा सरसेनापती मीर जाफर यास बंगालचा नबाब बनविण्याचे अभिवचन दिले. त्याबद्दल त्याच्याकडून काही रक्कम स्वतःस व काही कंपनीस घेण्याचे ठरले. शिवाय राय दुर्लभराम व मीर मादन या दुसऱ्या सेनापतींनाही फितूर करण्याचा प्रयत्न झाला. सोबतच कंपनीने सिराजकडे तीन मागण्या केल्या :
(१) फ्रेंच हे आमचे शत्रू आहेत, त्यांचा निःपात करण्यास मदत करावी.
(२) फ्रेंचांच्या वखारी बंद कराव्यात आणि
(३) फ्रेंच सेनापती झां लॉ व त्याचे कासिमबझार येथील सैनिक आमच्या ताब्यात द्यावेत.
सिराजला फ्रेंचांच्या बाबतीत कोणतेच निश्चित धोरण ठरविता येईना आणि इंग्रजांना तो अखेरपर्यंत संदिग्ध उत्तरे देत राहिला. तेव्हा दोन्हींकडून युद्धाची तयारी होऊ लागली. सिराजला कटाची कल्पना होती पण ऐनवेळी आपले लोक दगा देतील यावर त्याचा विश्वास नव्हता. काही दिवस सरसेनापति पदावरून दूर केलेल्या मीर जाफरलाच पुन्हा सर्व सैन्याचे नेतृत्व त्याने दिले. दोन्ही सैन्यांची गाठ प्लासीजवळ उत्तरेस पडली. इंग्रजांच्या बाजूने ३,००० सैनिक व आठ तोफा होत्या आणि नेतृत्व क्लाइव्हकडे होते. शिवाय सर आयर कुट सारखे काही चांगले लढवय्ये होते, तर सिराजउद्दौलाकडे ६०,००० सैन्य, ५३ मोठ्या तोफा आणि सेंट फ्रेअसच्या हाताखाली फ्रेंचांचा तोफखाना होता. सैन्याने नेतृत्व मीर जाफरकडे होते. क्लाइव्हने १९ जून रोजी काटवाचा किल्ला घेऊन मुर्शिदाबादकडे कूच केली पुढे लष्करी मंडळाचा निर्णय धुडकावून २१ जून रोजीच तो पूर आलेली भागीरथी पार करून प्लासीकडे गेला. २२ जून रोजी तो आपल्या सैन्यासह प्लासीजवळच्या आंबराईत तळ ठोकून होता. दुसरे दिवशी युद्धास प्रारंभ झाला. मीर मादन हा केवळ एकच निष्ठावान सेनापती सिराजच्या बाजूने विश्वासाने लढला पण तो मारला गेला. मीर जाफर लढत नाही, याची खात्री झाल्यावर क्लाइव्हच्या सर्व सैन्याने चढाई केली. सकाळी सुरू झालेली ही चकमक कशीबशी दुपारपर्यंत संपली. आपले सैन्य फितूर झालेले पाहून सिराजउद्दौला रणांगणांतून पळून गेला. त्याला पकडून ठार करण्यात आले. इंग्रजांचे फक्त ६५ सैनिक मारले गेले. क्लाइव्हचे नेतृत्व व डावपेच यांमुळे या लढाईत यश मिळाले.
विजयी इंग्रजांनी मीर जाफरला घेऊन मुर्शिदाबाद ही सिराजची राजधानी जिंकली आणि मीर जाफरला नबाब केले. क्लाइव्हने स्वतःस बक्षीस म्हणून मोठी रक्कम घेतली आणि काही आपल्या सहकाऱ्यांना दिली. या विजयामुळे पुढे क्लाइव्हला काही उच्च पदे-बंगालचे गव्हर्नरपद व सरदारकी-मिळाली. त्यामुळे नवाबाचा खजिना रिकामा झाला आणि तो पूर्णतः ईस्ट इंडिया कंपनीवर अवलंबून राहिला. त्यामुळे साहजिकच इंग्रज बंगालचे अप्रत्यक्षरीत्या राज्यकर्ते बनले.
प्लासी च्या युद्धाचे परिणाम
मीर जाफर ला कंपनीने बंगाल चा नवाब घोषित केले.त्या बदल्यात त्याने कंपनीला खूप पैसा दिला सोबतच कंपनीला अनेक सवलती दिल्या. प्लासी च्या युद्धाने बंगाल च्या नवाब पदावर आलेला मीर जाफर हा ब्रिटिशांच्या हाताची कठपुतली झाला. त्याच्या कडे स्वतःचे असे कोणतेच असे अधिकार नव्हते.
प्लासीच्या युद्धाने बंगालच्या राजकारणावर ब्रिटीशांचे नियंत्रण प्रस्थापित केले.
आर्थिक दृष्टीकोनातून इंग्रजांनी बंगालचे शोषण करण्यास सुरवात केली.
या युद्धापासून प्रेरणा घेऊन क्लाइव्हने पुढे बंगालमध्ये इंग्रजी सत्ता स्थापन केली.
बंगालमधून मिळालेल्या पैशाच्या जोरावर ब्रिटीशांनी दक्षिणेस फ्रेंचांवर विजय मिळविला.