भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक होते. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे आघाडीचे नेते व भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक होते. मोहनदास करमचंद गांधी हे गोपाळ कृष्ण गोखले यांचे शिष्य समजले जातात.
1885 ते 1905 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर चा पहिला कालखंड होता. तो मवाळमतवादी कालखंड म्हणून ओळखला जातो. या काळातील मवाळ मतवादी गटाचे अग्रणी नेते म्हणून गोपाळकृष्ण गोखले हे ओळखले जातात.
जन्म : 9 मे 1866
मृत्यू : 19 फेब्रुवारी, 1915
चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सुधारणा
संघटना : भारत सेवक समाज, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, डेक्कन एज्युकेशन सोसायटी
वडील : कृष्ण महादेव गोखले
आई : सत्यभामाबाई कृष्ण गोखले
सार्वजनिक जीवनात प्रवेश : 1884 मध्ये बी.ए. (गणित) पदवी घेऊन जानेवारी 1885 मध्ये त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारली. पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्यत्व, फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्यापन, 1895 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर फेलो म्हणून नियुक्ती असा प्रवास सुरू असतानाच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या माध्यमातून त्यांचा सार्वजनिक जीवनात प्रवेश झाला.
राजकीय प्रवास : बाळ गंगाधर टिळक आणि त्यांचा राजकीय प्रवास एकाच व्यासपीठावरून सुरू झाला. लोकमान्यांना जहालवादी राजकारण मान्य होते तर गोखलेंनी मवाळवादाचा मार्ग स्वीकारला. त्यांनी लोकशिक्षण, अस्पृश्यता/जातिनिर्मूलन, स्त्रीशिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य यांच्याशी संबंधित समाजकार्य केले. तत्कालीन इंग्रजी शासकांना समजेल अशा प्रकारे त्यांनी समाज सुधारणा मांडल्या आणि त्या मान्य करून घेतल्या.
कॉंग्रेसशी संबंध : इ.स. 1889 मध्ये कॉंग्रेसच्या व्यासपीठावर केलेल्या पहिल्या भाषणापासून त्यांचा कॉंग्रेसशी संबंध प्रस्थापित झाला. आयुष्याच्या अखेरीपर्यंत ते कॉंग्रेसशी एकनिष्ठ राहिले. कॉंग्रेसचे ते राष्ट्रीय पातळीवरील नेते म्हणून गणले जात. 1905 सालच्या डिसेंबरमध्ये बनारस येथे भरलेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. कॉंग्रेसचे कार्य त्यांनी भारतात व इंग्लंडमध्येही केले.
कायदेमंडळावर निवड : इ.स. 1902 साली त्यांची निवड मध्यवर्ती कायदेमंडळावर झाली, आणि ते नामदार झाले. या निवडीचा त्यांनी पूर्णपणे उपयोग केला आणि विविध समस्यांना तसेच प्रश्नांना वाचा मिळवून दिली.
भारत सेवक समाजाची स्थापना : भारताच्या सेवेसाठी तरुण त्यागी, निष्ठावान कार्यकर्ते घडवण्याच्या उद्देशाने 13 जून, 1905 रोजी पुणे या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली या माध्यमातून त्यांनी लोकांना सामाजिक सुधारणा व राजकीय शिक्षण देखील मिळावे हा उद्देश कायम ठेवला.
सार्वजनिक सभेच्या माध्यमातून कार्य : गोपाळ कृष्ण गोखले यांनी सार्वजनिक सभेचे सचिव म्हणूनही त्यांनी काही काळ कार्य केले. शेतकऱ्यांचे कर्ज, दुष्काळ व सावकारांचा त्रास आदी विषयांचा सखोल अभ्यास करून सरकारकडे निवेदने पाठवणे, त्याबाबत पाठपुरावा करणे-अशा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांविषयक कार्यांत त्यांनी शिस्त निर्माण केली. त्यामुळे त्यांच्या निवेदनांना सर्वत्र मान्यता मिळाली.
मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा : त्यांच्यातील क्षमतेची दखल घेऊन तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांनी नामदारांना 1909 सालच्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करण्यास सांगितले. त्यासाठी ते इंग्लंड येथे वास्तव्य करून होते. त्या दरम्यान त्यांनी तेथील पार्लमेंटच्या सदस्यांना भेटून भारतातील समस्या आणि प्रश्न त्यांच्या कानी घातले आणि त्याकारणी त्यांचा पाठिंबा मिळविण्यात यशस्वी झाले.
गोपाळ कृष्ण गोखले यांनी भूषविलेली महत्वाची पद :
मुंबई प्रांताच्या विधिमंडळाचे सभासदत्व,
1902 पासून केंद्रीय कायदेमंडळाचे सभासदत्व
प्रभाव : न्यायमूर्ती रानडे यांच्या आर्थिक व राजकीय विचारांचा गोखले यांच्यावर विशेष प्रभाव होता. ते न्यायमूर्ती रानडे यांना आपल्या गुरुस्थानी मानत;
महात्मा गोखले / धर्मात्मा गोखले : गोखले यांच्या अंगी असलेल्या शुचिता, नैतिकता, तत्त्वनिष्ठता, सौजन्यशीलता व नि:स्वार्थी सेवावृत्ती आदी गुणांनी प्रभावित होऊन महात्मा गांधीजी त्यांना (गोखले यांना) गुरुस्थानी मानत असत. गांधीजी त्यांना ‘महात्मा गोखले / धर्मात्मा गोखले’ म्हणत.
लेखन : गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलेल्या ’सुधारक’ च्या इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी नामदार गोखले यांनी काही काळ सांभाळली. सार्वजनिक सभा, राष्ट्रसभा समाचार या वृत्तपत्रांतूनही त्यांनी लेखन केले. वृत्तपत्रातील लिखाणाद्वारे ते समाजसुधारणांचा सतत पाठपुरावा करत.
गोपाळ कृष्ण गोखले यांचे 'अंकगणित' हे पुस्तक शालेय अभ्यासक्रमात असे. हे पुस्तक अत्यंत पद्धतशीरपणे लिहिलेले होते. ज्यांनी गोखल्यांच्या अंकगणितातली गणिते सोडवली त्याला कुठलेही गणित अवघड वाटणार नाही असी मान्यता होती.
सन्मान :
नामदार गोखले यांच्या स्मरणार्थ पुणे शहरात Gokhale Institute Of Politics and Economics नावाची संस्था स्थापन करण्यात आली आहे.
आसामी इतिहासकार डॉ. सूर्यकुमार भुयां यांनी गोखले यांच्या निधनानंतर आसामी भाषेत 1916-17 या काळात लिहिलेल्या गोखल्यांच्या पहिल्या चरित्राचे मराठी भाषांतर 94 वर्षांनी म्हणजे 2011 साली मराठीत आले. हे भाषांतर विद्या शर्मा यांनी केले आहे.