सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी न्या. मिश्रा, विश्वनाथन यांना शपथ
शपथ घेतलेल्यांपैकी न्या. विश्वनाथन हे ११ ऑगस्ट २०३० ते २५ मे २०३१ या काळात भारताचे सरन्यायाधीश होतील.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नुकतीच सर्वोच्च न्यायालयाच्या दोन नवीन न्यायाधीशांना शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या सभागृहात आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. प्रशांत कुमार मिश्रा आणि ज्येष्ठ वकील कल्पती वेंकटरामण विश्वनाथन यांना शपथ देण्यात आली. यामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या ३४ झाली आहे. न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. एम आर शहा हे निवृत्त झाल्यामुळे ही संख्या ३२ झाली होती.
कशी झाली निवड ?
सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील न्यायवृंदाने १६ मे रोजी या दोन नावांची केंद्राकडे शिफारस केली होती.
केंद्र सरकारने दोन दिवसांत त्याला मंजुरी दिली आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तसे आदेश काढले.
न्या. विश्वनाथन
शपथ घेतलेल्यांपैकी न्या. विश्वनाथन हे ११ ऑगस्ट २०३० ते २५ मे २०३१ या काळात भारताचे सरन्यायाधीश होतील.
वकील म्हणून काम करताना बारमधून थेट सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक होऊन सरन्यायाधीश होण्याचा मान मिळवणारे न्या. के व्ही विश्वनाथन हे केवळ चौथे न्यायाधीश असणार आहेत.
त्यांच्यापूर्वी न्या. एस एम सिक्री आणि न्या. यू यू लळित या दोघांनीच हा मान मिळवला आहे.
न्या. पी एस नरसिंह २०२८ मध्ये सरन्यायाधीश होतील, तेही बारमधून थेट सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झाले आहेत.
न्या. प्रशांत कुमार मिश्रा
न्या. मिश्रा हे २००९ पासून २०२१ पर्यंत छत्तीसगड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.
१३ ऑक्टोबर २०२१ मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
त्यांनी उच्च न्यायालयात १३ वर्षे न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे.
संपूर्ण भारतात ज्येष्ठत्वामध्ये त्यांचा क्रमांक २१ वा आहे.