दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आठव्या चित्त्याचा मृत्यू झाला

MPSC TECH
0

 


दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आठव्या चित्त्याचा मृत्यू झाला

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात १४ जुलै रोजी  सूरज नावाच्या चित्त्याचा मृत्यू झाला. अवघ्या आठ दिवसांत झालेला हा दुसरा मृत्यू आहे. देशातून नामशेष झालेले चित्ते काही महिन्यांपूर्वी आफ्रिकेतून भारतात आणण्यात आले होते. मात्र, या चित्त्यांपैकी आठ चित्ते गेल्या चार महिन्यांत मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान, या चित्त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गळ्यात लावण्यात आलेल्या कॉलर आयडीमुळे या चित्त्यांचा मृत्यू होत असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे आफ्रिकेतील तज्ज्ञांनी अभ्यास करून तसा दावा केला आहे.

मृत्युच्या काही दिवसापूर्वी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या चित्त्याच्या मानेजवळ माश्या घोंघावताना दिसल्या होत्या. या अधिकाऱ्यांनी चित्त्याकडे जाण्याचा प्रयत्न केला होता; मात्र चित्त्याने तेथून पळ काढला. या घटनेनंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पालपूर येथील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर वन्यजीव विभागाचे वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र, चित्त्याचे नेमके ठिकाण शोधल्यानंतर त्या जागेवर चित्ता मृतावस्थेत आढळला.

याआधी तेजस नावाच्या चित्त्याचा मृत्यू

मृतावस्थेत आढळलेला सूरज नावाचा चित्ता फेब्रुवारी माहिन्यात दक्षिण आफ्रिकेतून मध्य प्रदेशमधील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आला होता. या चित्त्यासह आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांच्या मृत्यूंचा आकडा आठवर पोहोचला आहे. याआधी तेजस नावाचा नर चित्ता मृतावस्थेत आढळला होता. या चित्त्याच्याही मान आणि पाठीवर जखमा आढळल्या होत्या.

काही वन्यजीव तज्ज्ञांच्या मते- चित्त्यांना त्यांच्या मानेवर लावण्यात आलेले रेडिओ आयडी अडचणीचे ठरत आहेत. कारण- दमट हवामानामुळे या रेडिओ कॉलरच्या खाली चित्त्यांना जखम, जीवाणूंचे संक्रमण, सेप्टिसिमिया नावाचा आजार होत आहे. दक्षिण आफ्रिकेतील वन्यजीव तज्ज्ञांनीही कॉलर आयडीमुळे चित्त्यांचा मृत्यू होत आहे, असे निरीक्षण नोंदवले आहे.

चित्त्यांच्या मानांवर लावलेले सॅटेलाईट कॉलर्स काय आहेत?

दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणलेल्या चित्त्यांच्या मानांवर सॅटेलाईट कॉलर आयडी लावण्यात आले आहेत. या चित्त्यांची नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी या कॉलर आयडीची मदत होते. या कॉलर आयडीमुळे चित्त्याचे नेमके ठिकाण समजू शकते. तसेच चित्त्याचा प्रवास, त्याची दिनचर्या, त्यांच्या प्रकृतीवरही नजर ठेवता येते. मोबाईलमध्ये जसे जीपीएस असते, अगदी तशाच पद्धतीचे जीपीएस या कॉलर आयडीमध्ये आहे. या जीपीएसच्या मदतीने उपग्रह चित्त्याचे नेमके ठिकाण अचूक पद्धतीने सांगू शकतो. प्राण्यांच्या दिवसभरातील दिनचर्या आणि हालचालींमुळे कॉलर आयडी खराब होऊ नयेत म्हणून त्यांची विशेष पद्धतीने निर्मिती करण्यात येते.

कॉलर आयडीचा फायदा काय?

विशेष म्हणजे कॉलर आयडीमुळे प्राण्यांच्या प्रकृतीवरही लक्ष ठेवता येते. कॉलर आयडी प्राण्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देत असते. त्यामुळे एखाद्या प्राण्यावर उपचार करण्याची गरज आहे का? हे जाणून घेण्यास मदत होते. कुनो राष्ट्रीय उद्यानात अनेक तरस आणि बिबटे आहेत. हे प्राणी दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांवर हल्ला करण्याची शक्यता असते. त्यामुळे तरस आणि बिबट्यांवर नजर ठेवण्यासाठीही या कॉलर आयडीची मदत होते.

कॉलर आयडीमुळे चित्त्यांच्या जीवाला धोका?

दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया विद्यापीठातील एका सहायक प्राध्यापकाने चित्त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला असावा, याबाबत अधिक माहिती दिली आहे. सूरज व तेजस या दोन्ही चित्त्यांचा मृत्यू अन्य प्राण्यांमुळे झालेला नसावा. या चित्त्यांचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओनुसार या दोन्ही चित्त्यांच्या मानेवर जखम होती. त्यामुळे त्यांचा सेप्टिसिमिया (जीवाणूंमुळे रक्तात झालेली विषबाधा) या आजारामुळे मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कॉलर आयडीमुळे चित्त्यांच्या मानेवर जखम झाली असावी. त्यानंतर या जखमांवर माश्या बसत असल्यामुळे जीवाणूंचा संसर्ग झाला असावा. परिणामी सेप्टिसिमियामुळे या चित्त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

जखमेवर माश्या बसून संसर्ग?

दमट वातावरणामुळे कॉलर आयडीखाली पाणी साचले असावे. त्यामुळे चित्त्यांची कॉलर आयडीखालची त्वचा कायम ओलीच राहत असावी. परिणामी चित्त्यांना त्वचारोग झाला असावा. अशा ठिकाणी माश्या बसून जीवाणूंचा संसर्ग होतो. या माशा जखमेच्या जागेवर अंडी घालतात. त्यानंतर कालांतराने चित्त्याला संसर्ग झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कॉलर आयडीमुळे चित्त्यांच्या मानेवर जखम?

मानेवर झालेली जखम चित्त्याला साफ करता येत नाही. त्यामुळे ही जखम शरीरभर पसरू शकते. या जखमेवर माश्या जमा झाल्यामुळे त्यांना मियासिस हा आजारही होऊ शकतो. त्वचा कोरडी असल्यास हा आजार होण्याचा धोका नसतो. मात्र कॉलर आयडीखाली पाणी साचून राहिल्यामुळे चित्त्यांना हा आजार होऊ शकतो.

तेजस चित्त्याच्या मृत्यूचे कारण काय होते?

११ जुलै रोजी तेजस चित्त्याचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन अहवालानुसार या चित्त्याच्या वेगवेगळ्या अवयवांनी काम करणे बंद केले होते. तसेच सेप्टीसिमियामुळे चित्त्याचा शरीरातील रक्तप्रवाह अचानकपणे थांबला होता. या चित्त्याच्या शरीरावर माश्यांमुळे जखमा झाल्याचे फोटोंमधून स्पष्ट झाले होते. या चित्त्याच्या मानेवर जखमा होत्या. तसेच या चित्त्याचे हृदय, फुप्फुस, मूत्रपिंडातही बिघाड असल्याचे आढळले होते. ही लक्षणे सेप्टिसिमिया आजाराशी सुसंगत आहेत.

कॉलर आयडी चित्त्यांच्या मृत्यूचे कारण ठरतेय?

कॉलर आयडी चित्त्यांच्या मृत्यूचे कारण ठरत आहे का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. याआधीही अनेक प्राण्यांच्या गळ्यात कॉलर आयडी लावण्यात आलेले आहेत. सध्या भारतात असे २० वाघ आहेत. कॉलर आयडीमुळे खरेच प्राण्यांचा मृत्यू होत असेल, तर २० वाघांवरील सर्व कॉलर आयडी काढून टाकावे लागतील.

भारतातील चित्ता प्रकल्प काय आहे?

१९६० साली भारतातून चित्ते नामशेष झाले होते. त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासठी नुकतेच  २० चित्ते भारतात आणले होते. त्यातील साधारण पाच चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. तर, एका मादी चित्त्याने जन्म दिलेल्या तीन चित्त्यांचा उष्णता, कुपोषण यांमुळे मृत्यू झालेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)