पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार
‘द ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ या फ्रान्समधील सर्वोच्च पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गौरविण्यात आले आहे. नागरी आणि लष्करी असे या पुरस्काराचे स्वरूप असून जगातील लोकप्रिय राष्ट्रीय सन्मानापैकी हा एक पुरस्कार
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी (दि. 13 जुलै) सायंकाळी (भारतात शुक्रवारी सकाळी) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले. ‘द ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ हा फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त करणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.
राष्ट्रसेवेत योगदान देणाऱ्या फ्रेंच नागरिकांना हा पुरस्कार देण्यात येत असतो. तसेच फ्रान्सशी सहकार्य साधणाऱ्या परदेशी नागरिकांना आणि फ्रान्सच्या निमंत्रणावर आलेल्या उच्चपदस्थ मान्यवरांना सदर पुरस्काराने कधी कधी गौरविण्यात येते.
‘लीजन ऑफ ऑनर’ म्हणजे काय?
‘लीजन ऑफ ऑनर’ हा फ्रान्सचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार आहे. नागरी आणि लष्करी असे त्याचे दुहेरी स्वरूप आहे. जगभरातील पुरस्कारांपैकी मानाचा पुरस्कार म्हणून याकडे पाहिले जाते. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर सत्तेवर आलेल्या नेपोलियन बोनापार्ट यांनी 1802 साली या पुरस्काराची मुहूर्तमेढ रोवली होती. दोन शतकांपासून फ्रान्सच्या विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या फ्रेंच नागरिकांना या पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. ज्या फ्रेंच नागरिकांना पुरस्कार देण्यात येणार आहे, त्यांच्या नावावर कोणतेही फौजदारी गुन्हे दाखल असू नयेत अशी एक अट आहे. पुरस्कार मिऴणाऱ्या व्यक्तीने देशसेवेत उत्कृष्ट कौशल्य दाखवलेले असावे. या पुरस्काराला पात्र ठरण्यासाठी संबंधित व्यक्तीने किमान 20 वर्ष विशिष्ट क्षेत्रात योगदान दिलेले असावे.
‘पितृभूमीसाठी फ्रेंच आणि सन्मान’ असे या पुरस्काराचे घोषवाक्य असल्याचे सांगितले जाते. वैयक्तिक गुण, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले काम आणि जनतेच्या भल्यासाठी दिलेले योगदान या तीन तत्वांवर आधारित पुरस्कारार्थीची निवड केली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख याचेही सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. लष्कर, क्रीडा, संगीत आणि स्वयंसेवक म्हणून ज्यांनी देशाचे नाव उज्ज्वल केले आहे, अशा मान्यवरांचा पुरस्कारासाठी विचार केला जातो.
‘लीजन ऑफ ऑनर’च्या अधिकृत संकेतस्थळानुसार या पुरस्काराने आतापर्यंत 79 हजार लोकांना गौरविण्यात आलेले आहे.
या पुरस्काराचा अर्थ काय?
या पुरस्कारासोबत भौतिक किंवा आर्थिक लाभ दिले जात नाहीत. या पुरस्कारासाठी कुणालाही अर्ज करता येत नाही किंवा मागणी करता येत नाही. फ्रेंच सरकार स्वतःहून पुरस्कार्थींची निवड करत असते. या पुरस्काराचे सन्मानचिन्ह आकर्षक असून लाल रंगाच्या रिबिनमध्ये जडलेले आहे. पाच सशस्त्र माल्टीज तारका (Maltese asterisk) असलेल्या स्मृतीचिन्हाला ओक आणि लॉरेल वनस्पतीच्या पानांनी वेढलेले आहे. अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार हा पुरस्कार फ्रान्सचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून ओळखले जाते. “जग आपले संदर्भ हरवत असताना, ‘लीजन ऑफ ऑनर’ मजबूत राहतो. हे सर्वांना एकत्रित आणणारे प्रतीक आहे. फ्रेंच समाजात हे प्रतीक खोलवर रुजलेले आहे. हा पुरस्कार प्राप्त करणे हे फ्रेंच नागरिकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयासाठी अभिमानास्पद आणि नागरी सेवेचे सर्वोत्तम उदाहरण मानले जाते.
परदेशी नागरिकाला हा पुरस्कार कधी दिला जातो?
‘लीजन ऑफ ऑनर’च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, ज्या परदेशी नागरिकांनी फ्रान्सला सेवा (सांस्कृतिक किंवा आर्थिक) दिली असेल किंवा फ्रान्सने संरक्षित केलेले मुद्दे जसे की, “मानवाधिकार, माध्यमांचे स्वातंत्र्य आणि मानवतावादी कृती” यांना समर्थन दिलेल्या मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात येते.
त्याचबरोबर मुत्सद्देगिरीचा पाठपुरावा आणि फ्रान्सच्या धोरणांना पाठिंबा देणारे प्रतिनिधी जेव्हा फ्रान्सच्या विशेष दौऱ्यावर येतात, तेव्हा त्यांना ‘लीजन ऑफ ऑनर’ पुरस्काराने गौरविण्याचा एक प्रघात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत कोणकोणते आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले?
‘लीजन ऑफ ऑनर’ या पुरस्काराला पाच पदव्या (उत्तरोत्तर) जोडलेल्या आहेत. तीन रँक्स जसे की, शेवेलियर (Knight), अधिकारी (Officer) आणि कमांडर (Commander) आणि दोन उपाध्या जसे की, ग्रँड ऑफिसर (Grand Officer) आणि ग्रँड क्रॉस (Grand Cross) आहेत. भारतात ज्याप्रमाणे ‘भारत रत्न’ या पुरस्काराचा दर्जा आहे, त्याप्रमाणे फ्रान्समध्ये ‘लीजन ऑफ ऑनर’ हा पुरस्कार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत 14 विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. नुकतेच त्यांना इजिप्तने ‘ऑर्डर ऑफ द नाइल’ या पुरस्काराने गौरविले होते.