चालू घडमोडी २4 /11/23

MPSC TECH
0

 अफगाणिस्तानकडून भारतातील दूतावास कायमस्वरूपी बंद

नवी दिल्लीतील अफगाण दूतावास कायमचा बंद करण्यात आल्याने आता भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध आता अधिकृतपणे संपुष्टात आले आहेत. नवी दिल्लीतील आपले राजनैतिक मिशन बंद करण्याबाबत अधिकृत विधान जारी करताना, अफगाण दूतावासाने म्हटले की, भारत सरकारच्या सततच्या आव्हानांमुळे दूतावास आजपासून कायमस्वरूपी बंद करण्यात येत आहे. ३० सप्टेंबरपासून कामकाज बंद केल्यानंतर दूतावासाने हा निर्णय घेतला. भारत आणि अफगाणिस्तान मिशनला सामान्यपणे कार्य करण्यास अनुमती देण्यासाठी भारत सरकारचा दृष्टीकोन अनुकूलपणे बदलेल या आशेने हे पाऊल उचलण्यात आले.

इस्लामविरोधक ग्रीट विल्डर्स नेदरलँडचे पंतप्रधान होणार

नेदरलँड संसदेच्या निवडणुकीत उजव्या विचारांचे आणि इस्लामविरोधी नेते ग्रीट विल्डर्स यांच्या फ्रीडम फॉर पार्टीला ३५ जागांवर विजय मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवला आहे. या अंदाजानुसार गीर्ट वाइल्डर्स नेदरलँडचे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. भारतातील भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी पैंगबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधान प्रकरणात ग्रीट यांनी शर्मांचे उघड समर्थन केले होते.

गीर्ट यांच्या विजयाची शक्यता असली तरी त्यांना सत्तेत बसण्यासाठी इतर पक्षांची मदत द्यावी लागणार आहे. १५० जागांच्या संसदेत सत्ता स्थापन करण्यासाठी ७६ हा बहुमताचा आकडा आहे. नेदरलँडमध्ये यापूर्वी मार्क रुट यांचे आघाडीचे सरकार होते. हे सरकार जुलै महिन्यात कोसळले. त्यानंतर देशात निवडणुकात जाहीर झाल्या. मार्क यांच्याकडे गेली १३ वर्षे सत्ता होती. त्यांच्या पक्षाला २३ जागांवर विजय मिळणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. नेदरलँडमध्ये एक्झीट पोलचा निकाल हा अचुक असतो. त्यामुळे ग्रीट विल्डर्स यांनी पंतप्रधान होण्याची आता औपचारिकता बाकी आहे. ग्रीट विल्डर्स यांनी नेदरलँडमध्ये कुराणवर बंदी घालण्याचे आणि निर्वासितांवर निर्बंध लादण्याचे आश्वासन दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीशांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन

सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला न्यायाधीश एम. फातिमा बीवी यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. आपल्या दीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीत न्यायमूर्ती बीवी यांनी देशभरातील महिलांसाठी आदर्श घालून दिला. बीवी यांचा जन्म १९२७ साली केरळमधील पंडालम येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण पथनामथिट्टा येथील शाळेत झाले. त्यांनी तिरुअनंतपुरमच्या युनिव्हर्सिटी महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी घेतली. त्यांच्या वडिलांनी त्यांना कायद्याचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिले. १९५० मध्ये बार कौन्सिलच्या परीक्षेत त्यांनी अव्वल स्थान पटकावले. यावेळी त्या बार कौन्सिल सुवर्णपदक मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. त्यांनी केरळमध्ये वकील म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. १९७४ मध्ये जिल्हा आणि सत्र न्यायाधीश बनल्या. १९८३ मध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त झाल्या. त्यानंतर १९८९ मध्ये सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला बनून त्यांनी नवा इतिहास रचला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश, वरीष्ठ न्यायव्यवस्थेतील पहिल्या मुस्लिम महिला, आशियाई देशातल्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायमूर्ती असे अनेक बहुमान त्यांच्या नावावर लागले. १९९३ मध्ये निवृत्त झाल्यानंतर, त्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्या आणि नंतर तामिळनाडूच्या राज्यपाल म्हणून काम केले. राजीव गांधी हत्या प्रकरणातील चार दोषींनी दाखल केलेले दयेचे अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी तामिळनाडूच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला

आयकर विभाग ३ वर्षे जुन्या प्रकरणांत कोणालाही नोटीस बजावू शकत नाही

आयकर विभाग तीन वर्षे जुन्या असलेल्या आणि ५० लाखांपेक्षा कमी रकमेच्या आयकर प्रकरणाच्या फायली पुन्हा उघडू शकत नाही.त्यासंबंधी कुणालाही नोटीस बजावू शकत नाही, असा एक महत्त्वपूर्ण निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशभरातील कोट्यवधी करदात्यांना दिलासा मिळाला आहे.

ज्या प्रकरणांमध्ये कथित लपविलेले उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे,अशा प्रकरणांमध्ये ३ वर्षांनंतरही पुनर्मूल्यांकन आदेश जारी केला जाऊ शकत.अशा प्रकरणांमध्ये प्राप्तिकर विभागाला १० वर्षांपर्यंतचा कालावधी आहे,ज्यामध्ये ते पुनर्मूल्यांकन आदेश जारी करू शकतात. दिल्ली उच्च न्यायालयातील एका महत्त्वाच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती राजीव शकधर आणि न्यायमूर्ती गिरीश कठपालिया यांच्या खंडपीठाने सांगितले की, मूल्यांकन वर्ष संपल्यानंतर तीन वर्षांनी ‘सामान्य प्रकरणांमध्ये’ नोटीस जारी करता येत नाही.न्यायालयाने सांगितले की केवळ काही विशेष प्रकरणांमध्ये ३ वर्षानंतरही पुनर्मूल्यांकनाची नोटीस जारी केली जाऊ शकते. ही प्रकरणे अशी आहेत ज्यात एकतर लपविलेल्या उत्पन्नाची रक्कम ५० लाखांपेक्षा जास्त आहे किंवा आयकर चोरी किंवा फसवणूकीचे प्रकरण खूप गंभीर आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने आयकर कायद्याच्या कलम १४८ अंतर्गत याचिकाकर्त्याला बजावलेल्या नोटीसची वैधता ठरवायची होती. या अनुषंगाने न्यायालयाने ही महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. कलम १४८ च्या जुन्या प्रणालीनुसार,आयकर अधिकारी ६ वर्षांपर्यंतची प्रकरणे उघडू शकतात.तसेच १० वर्षे जुनी प्रकरणे देखील उघडली जाऊ शकतात. परंतु यासाठी करदात्याचे वार्षिक उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असावे.

शीतल महाजन माऊंट एव्हरेस्टवर उडी मारणारी जगातील पहिली महिला

स्कायडायव्हिंग क्षेत्रात वेगवेगळे विक्रम करणाऱ्या पुण्यातील पद्मश्री शीतल महाजन-राणे यांनी रिलायन्स फाऊंडेशनच्या सहकार्याने जगातील सर्वाेच्च शिखर असलेल्या नेपाळमधील माऊंट एव्हरेस्टसमोर २१,५०० फुट उंचीवरुन हेलिकाॅप्टरमधून स्कायडायव्हिंग उडी घेत विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.त्यामुळे जगातील तीन ध्रुवांवर स्कायडायव्ह करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत.

पद्मश्री शीतल महाजन यांनी यापूर्वीही विश्वविक्रम केले आहेत. आपल्या नव्या विक्रमाबाबत त्या म्हणाल्या की,माऊंट एव्हरेस्टसमाेर पॅराशूट उडी मारण्याचे स्वप्न मी २००७ मध्ये प्रथम पाहिले.ते प्रत्यक्षात उतरल्याचा आनंद आहे.मी माऊंट एव्हरेस्टसमोर २१,५०० फुटांवरून माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम उडी मारली आणि १७,४४४ फुट उंचीवरील काला पत्थरवर उत्तरले.अशा प्रकारे मी सर्वोच्च उंचीचे स्कायडायव्हिंग पूर्ण केले. सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास हा विक्रम त्यांनी केला.

आर्क्टिकमध्ये दोन महिन्यांची रात्र सुरू

अमेरिकेतील सर्वात उत्तरेकडील शहर उटकियाविकमध्ये आता पुढील काही दिवस रात्रच असणार आहे. हे शहर अलास्कामध्ये आहे. नुकताच इथे यावर्षीचा शेवटचा सूर्यास्त झाला. आर्क्टिक म्हणजेच उत्तर ध्रुवाच्या परिसरात आता दोन महिन्यांची दीर्घ रात्र सुरू झाली आहे. आता २३ जानेवारी २०२४ रोजी इथे सूर्योदय होणार आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी १ वाजून ९ मिनिटांनी तेथील लोकांना सूर्यदर्शन घडेल व हे दर्शन काही तासांचे असेल. त्यानंतर प्रत्येक नव्या दिवशी सूर्यप्रकाश वाढत जाईल. उटकियाविकला ‘बॅरो’ या नावाने ओळखले जात होते. मात्र सुमारे एक दशकापूर्वी या शहराचे नाव बदलून ते पारंपरिक अलास्काच्या नावानुसर ठेवण्यात आले. आर्क्टिक वर्तुळात असल्याने या शहरात दरवर्षी ६६ दिवस रात्र असते. शहरात पूर्णपणे अंधार नसतो, संध्याकाळच्या वेळेसारखी स्थिती असते. पृथ्वीच्या अक्षातील झुकलेल्या स्थितीमुळे असे घडते. अमेरिकेच्या हवामान विभागाने म्हटले आहे की, ज्यावेळी सूर्याचे केंद्र क्षितिजापासून ६ अंश खाली जाते त्यावेळी अशा दीर्घ रात्री सुरू होतात.

‘ब्रिक्स’ राष्ट्रांच्या गटात सामील होण्यासाठी पाकिस्तानचा अर्ज

आर्थिक संकटाचा सामना करत असलेला पाकिस्तान आता पुढील वर्षी ब्रिक्स संघटनेचे सदस्यत्व मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे.तसा पाकिस्तानने रितसर अर्जही केला आहे. त्यासाठी पाकिस्तानने रशियाची मदत मागितली आहे विकसनशील देशांची संघटना असलेल्या ब्रिक्सच्या वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आता त्यात सामील होण्यासाठी अर्ज केला आहे.रशियाच्या ‘टास’ या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.रशियामधील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी अर्ज भरण्यासोबतच ब्रिक्समध्ये सदस्यत्व मिळवण्यासाठी रशियाची मदत मागितली आहे. पाकिस्तानने २०२४ मध्ये ब्रिक्स संघटनेचे सदस्यत्व मिळविण्यासाठी रशियाकडून मदत मिळण्याची आशा व्यक्त केली आहे.यावर्षी ब्रिक्समधील सदस्यांची संख्या वाढली आहे. ब्राझील,रशिया,भारत,चीन आणि दक्षिण आफ्रिका हे संस्थापक सदस्य असलेल्या ब्रिक्स आघाडीने या वर्षी आपल्या सदस्यांची संख्या ११ पर्यंत वाढवण्याची घोषणा केली.अर्जेंटिना, इजिप्त,इथिओपिया,इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा समूहाचे नवीन सदस्य म्हणून समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.आतापर्यंत पाकिस्तानने ब्रिक्सच्या विस्ताराकडे लक्ष दिले नव्हते.पण आता बदलत्या परिस्थितीत पाकिस्तान ब्रिक्समध्ये सहभागी होण्यासाठी रशियाच्या मदतीने प्रयत्न करत आहे.

आता शाळेत शिकविले जाणार ‘रामायण’ आणि ‘महाभारत ‘

आता शाळकरी मुलांना लहान वयातच ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ शिकवले जाणार आहे. कारण ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ सारख्या महाकाव्यांचा सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये समावेश करण्याची आणि शाळेतील प्रत्येक वर्गाच्या भिंतीवर राज्यघटनेची प्रस्तावना लिहिण्याची शिफारस राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात एनसीईआरटीच्या एका उच्चस्तरीय समितीने केली आहे.या समितीचे अध्यक्ष सी.आय.इसाक यांनीच याबाबतची माहिती दिली.

या समितीने अगोदरच सर्व शालेय अभ्यासक्रमांच्या पुस्तकांमध्ये इंडियाऐवजी ‘भारत’ असा उल्लेख करण्याची शिफारस केली होती.शालेय अभ्यासक्रमातील बदलासाठी एनसीईआरटीने सी.आय.इसाक यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे.गेल्यावर्षी स्थापन करण्यात आलेल्या सात सदस्यीय समितीने सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकासाठी अनेक शिफारशी केल्या आहेत. समितीने सामाजिक शास्त्राच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना ‘रामायण’ व ‘महाभारत’ शिकवण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली आहे.किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा स्वाभिमान,देशभक्ती शाळेत शिकवणार रामायण, महाभारत आणि राष्ट्राबद्दल अभिमान निर्माण होत असतो.त्यामुळे त्यांना हे महाकाव्य शिकवण्याची गरज असल्याचे इसाक यांनी म्हटले आहे. एनसीईआरटीची ही नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके पुढील शैक्षणिक सत्रापर्यंत तयार होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)