दक्षिण भारतातील स्थित्यंतरे

MPSC TECH
0

 



दक्षिण भारतातील स्थित्यंतरे : विंध्य पर्वतामुळे उत्तर व दक्षिण भारत अशी स्थूलमानाने भारताची प्रादेशिक विभागणी केली जाते. आर्यांचे आगमन आणि समाजव्यवस्थेची संस्कृतीची जडणघडण प्रामुख्याने उत्तरेतच झाली होती. तरीही आर्येतर द्रविड व आर्य यांच्या जीवनपद्धतीचे व संस्कृतीचे संमीलन दक्षिण भारतात घडून आले. चौल, चेरा (केरळ), पांड्य यांच्या राजवटीत उत्तरेतील जातिव्यवस्थेप्रमाणे तंतोतंत नसला तरी विविध सामाजिक वर्गांचा उदय झाला होता. विद्वान, ज्ञानी लोकांना समाजात, प्रशासनात व राज्यकारभारात महत्त्वाचे स्थान होते. शेती या मुख्य व्यवसायामुळे वेल्लेदार हा प्रभावशाली शेतकऱ्यांचा वर्ग होता. तसेच गरीब शेतकरी भूदासाप्रमाणे अस्तित्वात आला होता. निम्न वर्गातील स्त्रियांना शेतीवर भरपूर कामे करावी लागत, सैन्यातील अधिकारी, शिकारी, मेंढपाळ, कोळी, सोनार, लोहार, सुतार, विणकर यांचेही वर्ग अस्तित्वात आले होते. 'पुलायार' नावाचा हलकी-सलकी कामे करणाऱ्या वर्गाचे स्थान शूद्रासारखेच होते.

काळाच्या ओघात दक्षिण भारतातदेखील जातिव्यवस्था दृढमूल झाली, सामाजिक विषमता दृढमूल झाली. वैदिक पद्धतीने पौरोहित्य करणाऱ्या ब्राह्मणांचे महत्व बाढत गेले. सहाव्या शतकानंतर जैन व बौद्ध धर्माच्या विरोधात शैव व वैष्णव पंथांचा तमिळ राज्यात प्रभाव वाढला. लिंगायत हा पंथही विकसित झाला, लोकभाषेतून या पंथाच्या संतांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. यामुळे उदारमतवादी हिंदू धर्म अधिक विशाल झाला. तसेच भारतीय संस्कृती अधिक व्यापक झाली. सर्वसामान्यांना प्रभावित करून त्यांच्या सामाजिक व वैयक्तिक जीवनावर प्रभाव पाडणारे धार्मिक साहित्य लिहिले गेले, मंदिरे उभारली गेली, धार्मिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जाऊ लागले, या राजवटीत तमिळ भाषा व साहित्य याचीही वाढ झाली. पांड, चेरा, चोल यांच्या काळातील समाजरचना, इतिहास, आर्थिक जीवन, सांस्कृतिक वाढ, कृषिव्यवस्था, विवाहसंस्था, कुटुंबव्यवस्था, धार्मिक जीवन इत्यादींबाबतची महत्त्वाची माहिती या साहित्यातून मिळते. आर्यांच्या वैदिक ऋचा याप्रमाणे तमिळ भाषेतील संगम साहित्य याचे याबाबतीतील योगदान महत्त्वाचे आहे. दक्षिणेत सातवाहनांच्या काळात राजकीय घडामोडीबरोबर सांस्कृतिक जीवनात विकास झाला. भारतीय समाजात जैन, बौद्ध धर्माचा प्रभाव वाढत असता वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन या काळात झाले. असे होत असताना इतर धर्मातील चांगल्या बाबीदेखील या वैदिक धर्मात घेतल्या गेल्या. भारतीय समाजाचे सहिष्णुता हे वैशिष्ट्च या काळात स्पष्ट झाले. भारतीय समाज हा बहुभाषिकाप्रमाणे बहुधर्मीय बनला. सातवाहनांच्या काळात काटेकोरपणे जातिव्यवस्थेच्या निबंधांचे पालन करणारे सामाजिक संघटन अस्तित्वात आले. विविध कला, स्थापत्य कला, चित्रकला, नृत्यकला, नाट्य, साहित्य वगैरेत झालेला विकास तत्कालीन समाजाच्या सांस्कृतिक विकासाच्या आर्थिक समृद्धीचे चिन्हच होय.

गुप्ताच्या राजवटीत मात्र उत्तर व दक्षिण भारतात एकसंघ बलशाली अशी साम्राज्याची निर्मिती झाली. विशाल अशा साम्राज्याचा कारभार समर्थपणे सांभाळू शकेल असे परिवर्तन प्रशासनव्यवस्थेत घडून आले, केंद्रापासून ते ग्रामापर्यंतची प्रशासनव्यवस्था समर्थपणे उभी राहिली, त्यामुळे परकीयांच्या आक्रमणात देखील भारतीय समाजाची संस्कृती, समाजरचना तिच्या स्वत्वासह टिकून राहिली. या काळात चातुर्वर्ण्य व्यवस्था चांगलीच रुळली. पुढे शूद्रांचे स्थान अतिशय निम्न झाले. सामाजिक विषमता देखील लक्षणीय अशी वाढली. स्त्रियांच्यावर अनेक बंधने येऊन त्यांचा दर्जा अधिकच निम्न झाला, जाती अंतर्गत विवाह काटेकोर झाला. हुंडयाची चाल सुरू झाली. हर्षवर्धनांच्या काळात तर सती जाण्याची पद्धत होती असे दिसून येते. बालविवाहाची प्रथा घाढीस लागली. विधवा पुनर्विवाहास बंदी होती. ब्राह्मणाचे समाजातील वाढते महत्त्व पाहूनच ह्यू-एन-त्संग या चिनी प्रवाशाने भारताचे 'ब्राह्मण देश' असे वर्णन केले आहे. शूद्रांच्या अनेक जाती निर्माण झाल्या, त्याचप्रमाणे इतर जातीत देखील वाढते व्यवसाय, प्रादेशिक भिन्नत्व यामुळे अनेक उपजाती निर्माण झाल्या.

बहुभाषिकता : भारतीय समाजाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बहुभाषिकता. प्रारंभापासून संस्कृत भाषेचे प्राचल्य होतेच पण प्राचीन काळात संस्कृतपासून अनेक बोलीभाषा निर्माण झाल्या. प्राकृत भाषा म्हणून पाली, अर्धमागधी, जैन महाराष्ट्री, जैन शौरसेनी वगैरे अनेक भाषा विकसित झाल्या. प्राचीन कालखंडाच्या अखेरीस सिंधी, बंगाली, मराठी, गुजराथी, पंजाबी, राजस्थानी, असामिया वगैरे भाषा विकसित झाल्या. त्याचप्रमाणे दक्षिणेत तमिळ, मल्याळम, कन्नड, तेलगू इत्यादी आर्येतर भाषा विकसित झाल्या. पण त्यावर देखील संस्कृतचा प्रभाव लक्षणीय असाच आहे. अशा प्रकारे प्राचीन काळाच्या अखेरीस भारतीय समाज व संस्कृतीचे एक लक्षणीय रसायन तयार झाले, यावरच भारतीय समाज उभा राहिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)