सत्यशोधक समाज :
पार्श्वभूमी : पेशवाईच्या उत्तरार्धामधील ब्राह्मणी वर्चस्वाचा काळ. या काळात, ब्राह्मणी राज्यात जातिभेदाची तीव्र अंमलबजावणी, बाह्मणेतर जातींना दडपण्याची राज्यकर्त्यांची प्रवृत्ती, शूद्राति-शूद्रांची बेफाट पिळवणूक, कायद्याच्या अंमलबजावणीतील ढळढळीत पक्षपात, बेसुमार भ्रष्टाचार व लाचलूचपत अशी बेबंदशाही व अनागोंदी होती. साहजिकच त्या काळी महाराष्ट्रातील ग्रामीण व नागरी सामाजिक जीवनात ब्राम्हणांचे धार्मिक व प्रशासकीय क्षेत्रांत पूर्ण वर्चस्व होते. परंपरागत हिंदू धर्माच्या चौकटीच्या पकडीत सर्व समाज गुरफटला होता. त्याचा प्रवर्तक व समर्थक वर्ग विशेषेकरून ब्राह्मण वर्ग होता. ह्या चौकटीविरूद्ध बंड करणारी प्रवृत्ती, सत्यशोधक समाजाच्या रूपाने जागृत झाली आणि मानसिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी म. जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या रूपाने धगधगणाऱ्या बंडाचे निशाण हाती घेतले. धर्माचे मनुजवैरी गुंतवळ आणि ते जपणारे समाजघटक यांच्या अनिष्ट प्रवृत्तींविरूद्ध, जवळजवळ सर्व आघाडयावर त्यांनी युद्ध पुकारले. शूद्र, अतिशूद्र, यांच्या वतीने उच्च वर्णियांविरूध्द लढा पुकारणारे व त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार करणारे ज्योतिबा हे महाराष्ट्राचे पहिले समाज सुधारक होते. ख्रिस्ती धर्मातील समतेचे तत्व त्यांना आवडत होते तसेच मिशनर्यांच्या समाजसेवेबदल त्यांना आदर वाटत होता. पण ज्योतिबांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला नाही. जातिभेद व अस्पृश्यता निवारण करण्यासाठी त्यांनी आपली वाणी व लेखणी झिजवली. एवढेच नव्हे तर महारवाडयातील मुलांना शिकवून आपल्या घरातील हौद अस्पृष्यांसाठी खुला करुन आपल्या सेवाभावी वृत्तीवरचा आदर्श समाजासमोर उभा केला.
स्थापना : 24 सप्टेंबर 1873
संस्थापक : महात्मा ज्योतिबा फुले, पुणे
उद्देश :
1) सामाजिक विषमता व दलितांची दु:खे नाहीशी करणे
2) समाजातील भटभिक्षुकांच्या व उच्च वर्णियांच्या जुलूमांचा प्रतिकार करणे,
3) अज्ञानी बहुजन समाजाला ज्ञानी करणे
4) मानवधर्माचे व ईश्र्वरभक्तीचे सत्य स्वरूप बहुजन समाजासमोर ठेवणे.
सत्यशोधक समाजाची तत्व :
स्वातंत्र्य, समता व बंधुत्व यांच्या पायावर अवघ्या मनुष्यजातीचे एक कुटुंब निर्माण करणे, हेच मनुष्यतत्त्वाचे सर्वोच्च ध्येय होय.
सर्व मानव, स्त्री किंवा पुरूष यांचे हक्क सारखे आहेत.
मानव किंवा कोणताही मानवसमुदाय यांना दुसऱ्या मानवावर वा समुदायावर स्वामित्व गाजविण्याचा, जबरदस्ती करण्याचा सर्वाधिकार नाही.
राजकीय व धार्मिक मतांमुळे कोणतीही व्यक्ती उच्च वा नीच मानून तिचा छळ करणे, म्हणजे सत्याचा द्रोह करणे होय.
प्रत्येकाला स्वमताचा प्रसार करण्याचा हक्क व अधिकार आहे.
सर्वांना ऐहिक जीवन उपभोगण्याचा सारखाच अधिकार आहे.
शेती, कलाकौशल्य, मजुरी आदी कामे माणसास हीनपणा आणीत नसून त्यांच्यायोगे त्याची थोरवीच सिद्ध होते.
सृष्टीच्या कार्यकारणभावाचा अर्थ ध्यानी घेऊन त्या सृष्टीचा किंवा निसर्गशक्तीचा मनुष्याच्या गरजा भागविण्यासाठी उपयोग करणे, हा मनुष्याचा मूलभूत अधिकार व कर्तव्य होय.
या विश्र्वात जगण्याकरिता आणि उपभोगाकरिता वस्तू उत्पन्न करणे किंवा मिळविणे, हे माणसाचे पहिले कर्तव्य आहे. त्याकरिता परस्परांना साहाय्य करणे, हा मानवाचा श्रेष्ठ धर्म आहे.
भजन, नामस्मरण, जपजाप्य, प्रार्थना, भक्ती या गोष्टींची ईश्वराला गरज नाही, कारण तो सर्व विश्वाचा स्वामी आहे. त्याला माणसाच्या स्तुतीची, भक्तीची मुळीच गरज नाही.