सत्यशोधक समाज भाग 2 (कार्य, अधिवेशन)

MPSC TECH
0

 


सत्यशोधक समाजाचे कार्य :

साप्ताहिक सभा : ज्या गावी सत्यशोधक समाजाच्या शाखा सुरु करण्यात आल्या होत्या त्या गावात दर आठवड्यातून एकदा सभा घेतल्या जात असत. त्यामध्ये कनिष्ठ जातीच्या लोकांत शिक्षणाचा प्रसार घडवून आणणे, सर्व प्रकारचे धार्मिक विधी भटभिक्षकांच्या पौरोहित्याशिवाय पार पाडणे, बहुजन समाजातील सामान्य लोकांना ज्योतिष, भूतपिशाच्च, जादूटोणा या सारख्या गोष्टींच्या भितीपासून मुक्त करणे इत्यादी बाबींना चालना देण्याविषयी चर्चा होत असे.

शिक्षणावर भर : सत्यशोधक समाजाचा शिक्षणावर अधिक भर दिला होता. म. फुले यांनी दलितांना, स्त्रियांना, कष्टकऱ्यांना त्यांच्या दैन्यावस्थेतून बाहेर पडण्यासाठी लोकशिक्षणाचा उपक्रम प्राधान्याने हाती घेतला. शिक्षण सर्वांना सहजलभ्य व्हावे आणि सर्वांनी शिक्षण घ्यावे म्हणून प्रयत्न केला. अज्ञानग्रस्त शूद्रातिशूद्रांच्या शाळांबरोबरच त्यांनी मुलींसाठीही शाळा काढल्या. त्यासाठी सावित्रीबाईंनी पुढाकार घेऊन अध्यापनही केले. ज्ञानवृद्घिकारक उपायांना बळकटी देण्यासाठी त्यांनी गरीब  व होतकरू विदयार्थ्यांना विदयावेतने व हुशार विदयार्थ्यांना बक्षिसे ठेवली. निबंधलेखन व वक्तृत्वस्पर्धा यांना उत्तेजन दिले. म. फुले यांनी हंटर कमिशनला दिलेल्या निवेदनात (१८८२) सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह धरला

वसतिगृह :  महात्मा फुले यांचे  एक सहकारी कृ. पां. भालेकर यांनी वसतिगृह स्थापून परगावच्या गरीब विदयार्थ्यांची राहण्याची-जेवण्याची व्यवस्था केली.

विवाह : सत्यशोधक समाजाने ब्राम्हण-पुरोहिताशिवाय विवाह लावण्याचा उपक्रम सुरु केला. काही सत्यशोधक कार्यकर्त्यांनी आपल्या मुलामुलींचे आणि नातेवाईकांचे विवाह ब्राह्मण-पुरोहिताशिवाय लावून दिले. ही त्या काळातील अत्यंत क्रांतीकारक अशी घटना होती.

बालाश्रम : सन १८७७ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला असताना; दुष्काळ पीडितांच्या मुलांची सोय करण्यासाठी सत्यशोधक समाजाच्या वतीने एक बालाश्रम उघडला होता.

जामीनदारा विरुद्ध  चळवळ : पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्या शेतकऱ्यांनी सावकार व जमीनदार यांच्याकडून होत असलेली जुलूम जबरदस्ती व पिळवणूक या विरुद्ध चळवळ सुरु केली. शेतकऱ्यांच्या या चळवळीचे नेतृत्त्व महात्मा फुले यांनी केले होते.

मिल हॅड असोसिएशन सोसायटी : सत्यशोधक समाजाचे खंदे पुरस्कर्ते नारायण लोखंडे यांनी मा. फुले व सत्यशोधक समाजाच्या प्रेरणेने मुंबईच्या गिरणी कामगारांची मिल हॅड असोसिएशन सोसायटीनावाची संघटना स्थापन करून कामगारांचे प्रश्न सरकारच्या निदर्शनास आणून दिले. फॅक्टरी आयोगापुढे कामगारांची बाजू मांडली. तसेच लहान शेतकऱ्यांना जंगल खात्याच्या अधिकाऱ्यांकडून होणारा उपद्रव दूर केला. 

हे ही वाचा : सत्यशोधक समाज भाग 1 (स्थापना, संस्थापक, उद्देश,तत्व)  

जनजागृती आणि प्रसार : जातिभेदखंडन करणारे तुकाराम तात्या पडवळ यांचे जातिभेद विवेकसार, परमहंस सभेचे दादोबा पांडुरंगलिखित धर्मदर्शक आणि म. फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्म ह्या गंथांचा सत्यशोधक चळवळीने मार्गदर्शनपर उपयोग केला. तसेच अनिष्ट अंधश्रद्धामूलक परंपरा, चालीरीती, रूढी यांचे समूळ उच्चटन करण्याचा प्रचार केला. १८७९ मध्ये पुण्यातील एका थिएटरमध्ये त्यांनी स्त्रियांच्या निबंधवाचनाचा समारंभ घडवून आणला. शेतकऱ्यांच्या दुःस्थितीबद्दल व पिळवणुकीबद्दल त्यांनी बारामती तालुक्यात चिंचोली गावात शेतकऱ्यांची सभा भरवून (१८८०) शेतसारा, कर्ज, जंगलत्रास, सक्तीचे शिक्षण वगैरेंविषयी ठराव संमत केले. एवढेच नव्हे, तर भालेकर यांनी ते, विदर्भ व मध्य प्रदेशात कंत्राटी कामानिमित्त काही महिने गेले असता, तेथे सत्यशोधक समाजाचे प्रचारकार्य केले. महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांतून समाजाची केंद्रे निर्माण झाली आणि जनजागृतीच्या उपकमाला काही अंशी यश लाभले.

अधिवेशन : सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनांची सुरूवात १९११ पासून झाली. १९११ पासून २००७ पर्यंत सत्यशोधक समाजाची एकूण ३५ अधिवेशने संपन्न झाली.

पहिले अधिवेशन १७ एप्रिल १९११ रोजी पुणे येथे स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावरू यांच्या अध्यक्षतेने पार पडले. त्याच्या स्वागताध्यक्षपदी गणपतराव बिरमल होते. तर पस्तीसावे अधिवेशन २२ डिसेंबर २००७ रोजी गेवराई (जिल्हा बीड, मराठवाडा) येथे डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. मराठवाडा सार्वजनिक सभेचे अध्यक्ष पद्माकरराव मुळे यांनी स्वागताध्यक्षपद भूषविले होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)