विशेष लेख : मणिपूर हिंसाचार

MPSC TECH
0

 



गेल्या 2 महिन्या पासून पेटलेल्या जातीय दंगली मुळे मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराने शेकडो हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि हजारो इमारती जाळण्यात आल्या. हा हिंसाचार दोन स्थानिक वांशिक समुदायांमध्ये, मेईटेई आणि कुकी यांच्यामध्ये झाला. हिंसाचाराची सुरुवात मे 3 रोजी झाली जेव्हा कुकी लोकांनी मैतेई लोकांना त्यांच्या जमिनीवरून हटवण्याचा प्रयत्न केला. यामुळे मैतेई लोकांचा राग झाला आणि त्यांनी कुकी लोकांवर हल्ला केला. हिंसाचार त्यानंतर राज्याच्या इतर भागांमध्ये पसरला आणि शेवटी केंद्र सरकारला सैन्य पाठवावे लागले. हिंसाचार थांबवण्यासाठी केंद्र सरकारने मणिपूरमध्ये संचारबंदी घातली आणि आणीबाणी लागू केली. हिंसाचारामुळे मणिपूरमध्ये मोठा नुकसान झाला आणि राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली. मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या हालचालींचे निमित्त झाले आणि मणिपूरमध्ये हिंसाचाराचा वणवा पेटला.

मणिपूर हे ईशान्य भारतातले अतिशय सुपीक, हिरवेगार आणि तीन दशलक्ष लोकसंख्या असलेले एक सुंदर राज्य. मात्र, दोन महिन्यांपासून या राज्यात अभूतपूर्व असा हिंसाचार पेटला आहे. मैतेई व कुकी या दोन समुदायांमध्ये दीर्घ काळ चाललेल्या संघर्षाने टोक गाठले आहे. मणिपूर गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर आहे, असे म्हणण्यापर्यंत मजल गेली आहे. मध्यंतरी जून महिन्यात एका निवृत्त सैन्य अधिकाऱ्याने ट्वीट करीत म्हटले होते, “मणिपूर राज्य आता राज्य (stateless) राहिलेले नाही. लिबिया, लेबनान, नायजेरिया, सीरिया या देशांप्रमाणेच मणिपूरमध्ये कोणाचेही जीवन आणि मालमत्ता कधीही नष्ट होऊ शकते.

दरम्यान, विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली असून, भाजपाचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांना हटविण्याची मागणी केली आहे. राज्यात भाजपाची सत्ता असून हिंसाचार थांबविण्यात सत्ताधारी अपयशी ठरल्याचे वारंवार सांगितले जात आहे. मणिपूरमध्ये सध्या जे काही चालले आहे, तो सर्वांत वाईट इतिहास म्हणून गणला जाईल. हिंसाचार सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत अनेक घरे आगीत खाक झाली, लोकांना जिवंत जाळण्यात आले, त्यांची हाल हाल करून हत्या करण्यात आली. आधुनिक काळात मणिपूरने या प्रकारचा हिंसाचार आतापर्यंत पाहिला नव्हता.

मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या हालचालींचे निमित्त झाले आणि मणिपूरमध्ये हिंसाचाराचा वणवा पेटला मात्र या हिंसाचाराची बिजे गेल्या काही वर्षांपासून पेरली गेली. ती कशी  हे पाहायला हवे.

मैतेई आरक्षण प्रकरण काय आहे?

मणिपूरमध्ये 34 अनुसूचित जमाती आहेत. त्यातील बहुतांश नागा आणि कुकी समुदायांतील आहेत. राज्यात बहुसंख्येने म्हणजे सुमारे 64 टक्के लोकसंख्या असलेल्या मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा हवा आहे. ही मागणी तशी जुनीच. पण, उच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयामुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. मैतेईंच्या मागणीबाबत चार आठवड्यांत उचित निर्णय घ्यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने 19 एप्रिल रोजी राज्य सरकारला दिले होते. त्यावर कार्यवाही होण्याआधीच ‘ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन ऑफ मणिपूर’ या संघटनेने मोर्चा काढला. त्यास हिंसक वळण लागले.

मैतेई आणि कुकींचे म्हणणे काय?

सन 1949 मध्ये मणिपूर संस्थान भारतात विलीन होण्याआधी आपल्याला अनुसूचित जमातीचा दर्जा होता. मात्र, विलिनीकरणानंतर तो संपुष्टात आला, असे मैतेईंचे म्हणणे आहे. कोणत्याही घटनात्मक संरक्षणाअभावी मैतेई समाजाची पीछेहाट होत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. म्यानमार आणि बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बेकायदा स्थलांतराचा फटका आपल्याला बसत असल्याचेही मैतेई समाजाचे म्हणणे आहे. मात्र, मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यास कुकीसह अन्य आदिवासी समुदायांचा विरोध आहे. राज्यात बहुसंख्येने असलेल्या मैतेई समाजाचे राज्याच्या विधानसभेत 60 पैकी 40 लोकप्रतिनिधी आहेत. दुसरे म्हणजे, बहुसंख्येने हिंदू असलेल्या मैतेईतील अनुसूचित जाती आणि ओबीसींना आधीच आरक्षण लागू आहे. त्यामुळे मैतेईंना अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या हालचाली म्हणजे राज्यात त्यांचे पूर्ण वर्चस्व निर्माण करण्याची तजवीज असल्याचा कुकींचा आरोप आहे.

मुख्यमंत्री बिरेन सिंह लक्ष्य का?

मणिपूरमधील हिंसाचार हा दोन समुदायांतील गैरसमजामुळे झाल्याचा दावा मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी केला आहे. मात्र, या परिस्थितीवरून बिरेन सिंह हेच टीकेचे धनी ठरले आहेत. ते आदिवासीविरोधी धोरणे राबवत असल्याचा आरोप आहे. इम्फाळमधील अनेक दशके जुनी चर्च पाडण्याबरोबरच बहुतांश आदिवासी वस्त्यांच्या जमिनी राखीव वनजमिनी जाहीर करून बिरेन सिंह यांनी आदिवासींना लक्ष्य केल्याचा आरोप आहे. बिरेन सिंह यांचे सरकार आदिवासींना त्यांच्या हक्कापासून डावलण्यासाठी त्यांच्यावर निर्वासित असल्याचा शिक्का मारत असल्याचा आरोप आहे. गेल्या मार्च महिन्यात बिरेन सरकारने कुकी-झोमी गटांबरोबरील शांतता करार मोडित काढला. त्याबाबतही या समुदायांत नाराजी होती. बिरेन सिंह यांच्या कार्यपद्धतीवर सत्ताधारी भाजपच्याच काही आमदारांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे. सध्याचा हिंसाचार रोखण्यातही राज्य सरकार कमी पडल्याचे या आमदारांचे म्हणणे आहे.

मणिपूरमध्ये महिलांची निर्वस्त्र धिंड;

मणिपूरमध्ये 4 मे रोजी घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 3 मे रोजी मणिपूरमध्ये दोन समुदायांतील हिंसाचाराला सुरुवात झाली, तेव्हापासून अनेक वेळा महिलांना लक्ष्य करण्यात आले आहे.

नुकताच मणिपूरमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे; ज्यामध्ये कुकी समुदायाच्या दोन महिलांची विवस्त्र करून धिंड काढल्याचे आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. 18 मे रोजी खांगपोकी जिल्ह्यात पोलिसांनी शून्य एफआयआर (शून्य एफआयआर म्हणजे ज्या ठिकाणी घटना घडली, ते सोडून दुसरीकडे एफआयआर दाखल करणे) दाखल केला. पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार व हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, या अमानवी गुन्ह्याला दोन महिने उलटूनही आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.

ज्या दोन महिलांवर अत्याचार करून, त्यांचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला, त्या महिला कुकी-झोमी समुदायाच्या असल्याचे सांगण्यात येते. खांगपोकी या डोंगराळ जिल्ह्यात या समुदायाचे प्राबल्य आहे. दोन महिलांपैकी एकीचे वय 20; तर दुसरीचे वय 40 असल्याचे कळते आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ अत्यंत विदारक परिस्थिती विशद करणारा असून, या घटनेविरोधात देशभरातून संताप व्यक्त होत आहे. पुरुषांचा जमाव या महिलांना बळजबरीने शेतात नेत असताना त्यांच्या शरीराची विटंबना करताना दिसत आहे.

 याआधीही महिलांविरोधात झालेले अत्याचार

मणिपूरमध्ये 4 मे रोजीची निषेधार्ह घटना ही काही पहिलीच घटना नाही. त्याआधी आणि नंतरही महिलांना लक्ष्य केले गेले आहे. मागच्या शनिवारी (15 जुलै) पूर्व इम्फाळ जिल्ह्यातील सावोमबंग परिसरात एका महिलेची गोळी झाडून हत्या करण्यात आली. मृत महिलेचा चेहरा विकृत करून तिला मारण्यात आले. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मरिंग नागा समाजातील 50 वर्षीय महिलेच्या चेहऱ्यावर गोळी झाडण्यात आली होती. पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी कारवाई करीत नऊ लोकांना ताब्यात घेतले; ज्यामध्ये पाच महिलांचा समावेश होता.

6 जुलै रोजी इम्फाळच्या पश्चिम जिल्ह्यात एका अज्ञात शस्त्रधारी आरोपीने शाळेबाहेर एका महिलेवर गोळी झाडली. पोलिसांनी सांगितले की, ती काही कामानिमित्त शाळेजवळ जात होती. पण तिचा आणि त्या शाळेचा काही संबंध नव्हता. दोन महिन्यांपूर्वी डोंगराळ भागात वास्तव्य करणारा कुकी हा वांशिक गट आणि मैदानी प्रदेशात राहणारा मैतेई समुदाय यांच्यात हिंसक वाद निर्माण झाला. हिंसाचार उफाळल्यानंतर अनेक भागांत महिलांवर अत्याचार केले गेले.

मैतेई-कुकी संघर्ष काय आहे?

मणिपूरमध्ये मैतेई समाजाची लोकसंख्या 60 टक्के असून, हा समाज मुख्यत्वे खोऱ्यात राहतो. कुकी, नागा आदी आदिवासींची लोकसंख्या सुमारे 40 टक्के असून, त्यांची बहुतांश वस्ती डोंगराळ भागात आहे. मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा हवा आहे. मैतेईंच्या मागणीबाबत चार आठवड्यांत उचित निर्णय घ्यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने 19 एप्रिल रोजी राज्य सरकारला दिले होते. त्यावर कार्यवाही होण्याआधीच ‘ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन ऑफ मणिपूर’ या संघटनेने 3 मे रोजी मोर्चा काढला आणि राज्यात हिंसाचाराचा आगडोंब उसळला. आरक्षण ही मैतेई-कुकी संघर्षासाठी नवी ठिणगी ठरली. मणिपूरला हिंसाचाराचा इतिहास आहे. बहुसंख्येने हिंदू असलेले मैतेई, प्रामुख्याने ख्रिस्ती असलेल्या कुकी, नागा या समुदायांमधील संघर्ष जुना आहे. 1917 ते 1919 या कालावधीत कुकींनी नागांवर हल्ले केले होते. अलीकडे मैतेई आणि कुकी यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याचे दिसते.

कुकी आमदारांची मागणी काय?

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राज्यातील हिंसाचार नीट हाताळला नाही, असा आरोप करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी कुकी आमदारांनी केली आहे. त्यात सत्ताधारी भाजप आमदारांची संख्या अधिक आहे. भाजप प्रदेश सचिव पोकाम होकीप यांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे. मणिपूरचे तत्कालीन मुख्यमंत्री ओक्राम बिबोई सिंह यांनी 2015 मध्ये आदिवासींचे आंदोलन नीट हाताळले नाही, असा आरोप त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले एन. बिरेन सिंह यांनी केला होता. त्यानंतर भाजपवासी झालेल्या बिरेन सिंह यांच्यावर याच मुद्द्यावर टीकेची झोड उठली आहे. बिरेन सिंह यांच्या गच्छंतीसाठी काही आमदारांसह सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवर असलेल्या कुकी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

 

हिंसाचारात जीवित आणि वित्तहानी किती?

मणिपूरमध्ये महिनाभर सुरू राहिलेल्या हिंसाचारात 98 जणांचा मृत्यू झाला, तर 300 जण जखमी झाले. मृतांमध्ये सर्वाधिक म्हणजे 65 कुकी समाजातील नागरिकांचा समावेश आहे. 25 मैतेईही हिंसाचारात मृत्युमुखी पडले आहेत. उर्वरित मृतांची ओळख पटलेली नाही. मृतांची ही सरकारी आकडेवारी असून, प्रत्यक्षात मृतांचा आकडा शंभरहून अधिक असल्याचे मानले जाते. राज्यात महिनाभरात जाळपोळीच्या 4,014 घटनांची नोंद झाली. तसेच मैतेईंची 1988 घरे, तर कुकींची 1425 घरे उद्ध्वस्त झाली आहेत, अशी आकडेवारी सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने माध्यमांनी दिली आहे. हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी 3,734 गुन्हे नोंदवले आहेत.

अमित शहांच्या दौऱ्याचे फलित काय?

हिंसाचार सुरू झाल्यानंतर जवळपास 25 दिवसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूर दौरा केल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. त्याची दखल घेत त्यांनी चार दिवस मणिपूरमध्ये ठाण मांडले. त्यांनी संक्रमण शिबिराला भेट दिली. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, महिला संघटनांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून हिंसाचारप्रकरणी निष्पक्षपणे कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मैतेईंच्या आक्रमकतेला खतपाणी घालून मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह हे कुकी समाजाला लक्ष्य करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ते दूर करण्यासाठी शहा यांनी कुकी समाजाला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. आपल्या दौऱ्याच्या चार दिवसांत शहा यांनी सरकारची संपूर्ण सूत्रे हाती घेतल्याचे दिसत होते. वांशिक हिंसाचाराची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्याची घोषणा, राज्यातील सर्व क्षेत्रांतील मान्यवरांची शांतता समिती नेमणे, हिंसाचाराची सहा प्रकरणे सीबीआयकडे सोपवणे, राज्यातील सुरक्षा दलांतील समन्वयासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक कुलदीप सिंग यांची नियुक्ती करणे अशा काही उपाययोजना शहा यांनी जाहीर केल्या आहेत. मात्र, या प्रामुख्याने तातडीच्या उपाययोजना आहेत.

कुकी महिलांकडून मैतेई लोकांचे संरक्षण; हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये मानवी साखळी

मणिपूरमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचारादरम्यान, बहुसंख्याक मैतेई समुदायाच्या लोकांचे आदिवासी जमावापासून संरक्षण करून त्यांना काही अंतरावर असलेल्या लष्करी वाहनांमधून जाण्यासाठी मदत करण्याकरिता कुकी महिलांनी चुराचांदपूरमध्ये मानवी साखळी तयार केली.

या महिलांनी, हिंसाचारग्रस्त भागातून स्थलांतरित करण्यात येत असलेल्या मैतेई लोकांना जमावाला कुठलीही हानी पोहोचवू दिली नाही.

महिलांनी रस्त्यावर साखळी तयार केली आणि मैतेई लोकांना हिंसाचारग्रस्त भागातून हलवण्यात येत असताना जमावाला पुढे जाऊ दिले नाही किंवा कुठल्याही प्रकारची नासधूस करू दिली नाही,

मणिपूरमध्ये ‘नीट’ परीक्षा लांबणीवर

वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) मणिपूरमध्ये तेथील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती पाहता पुढे ढकलण्यात आली असल्याचे राष्ट्रीय चाचणी यंत्रणेने (एनटीए) जाहीर केले. ज्या उमेदवारांचे परीक्षा केंद्र मणिपूरमध्ये होते, त्यांच्यासाठी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे एनटीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मणिपूरमधील सध्याची परिस्थिती विचारात घ्यावी आणि ही परीक्षा पुढे ढकलावी, असे पत्र केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांनी शनिवारी एनटीएला लिहिले होते.

कुकी आणि मैतेई हे समाज नेमके कोण आहेत ?

कुकी कोण आहेत?

कुकी हा ईशान्य भारतातील मणिपूर, मिझोराम, मेघालय, आसाम, त्रिपुरा आणि नागालँड या राज्यांमध्ये राहणारा वांशिक गट आहे. कुकी हा समाज भारतातील तसेच बांगलादेश आणि म्यानमार मधील अनेक डोंगराळ जमातींपैकी एक जमात आहे. ईशान्य भारतात अरुणाचल प्रदेश वगळता इतर सर्व राज्यांमध्ये ते स्थायिक झाले आहेत. कुकी हे मुख्यत: टेकड्यांवर राहतात, चुराचंदपूर हा त्यांचा मुख्य गड आहे तसेच मणिपूरच्या चंदेल, कांगपोकपी, तेंगनौपाल आणि सेनापती जिल्ह्यांमध्येही त्यांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. कुकी हा समाज वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. यामध्ये लुशाई, डार्लॉन्ग्स, रोखुम्स आणि चिन (बर्मा बोर्डरवर) इत्यादींचा समावेश होतो. ते स्वतःला हरे-ईमस म्हणायचे. असे असले तर ‘कुकी’ हे या समाजासाठी सामान्यनाव म्हणून स्वीकारले गेले आहे. असे मानले जाते की कुकी समाज हा मूळचा ‘मिझो हिल्स’ (पूर्वीचे लुशाई) येथील आहे. हा मिझोरामच्या दक्षिण-पूर्व भागातील एक पर्वतीय प्रदेश आहे. या व्यतिरिक्त, असा दावा केला जातो की ईशान्य भारतातील कुकी जमातींमध्ये 20 पेक्षाही अधिक उप-जमाती आहेत.

कुकींच्या धार्मिक परंपरा

कुकींमध्ये विविध धार्मिक परंपरा आहेत. ते ऐतिहासिकदृष्ट्या अ‍ॅनिमिझम संकल्पनेवर विश्वास ठेवतात. ते त्यांच्या देवांना संतुष्ट करण्यासाठी पशुबळी देतात, पूर्वजांची पूजा आणि सण यांसारखे विधी देखील यात समाविष्ट आहेत. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीस ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रवेशाने अनेक कुकींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, विशेषत: प्रोटेस्टंट धर्मात त्यांनी प्रवेश केला. आज बहुतांशी कुकी हे मुख्यतः ख्रिश्चन धर्माचे पालन करतात. 2011 च्या जनगणनेनुसार मणिपूरमध्ये कुकींची लोकसंख्या आठ लाखांच्या आसपास आहे.

पूर्वी ते डोंगरमाथ्यावर राहत होते आणि झुम शेतीद्वारे तसेच वेगवेगळ्या फळांची उत्पादने घेऊन आपला उदरनिर्वाह चालवत असत. सध्या ते सपाट जमिनीवर मशागत आणि पाळीव पशुधन यांद्वारे उदरनिर्वाह चालवतात. भाषिकदृष्ट्या त्यांची बोलीभाषा ही तिबेटी वंशाच्या कुकी-चिन भाषिक कुटुंबाशी संबंधित आहे. कुकींची अनेक कुळे आणि उपकुळे आहेत. कुकींना संगीत आणि नृत्याची आवड आहे. ते झुम शेतात, बागेत कष्ट करतात आणि सामुदायिक नृत्य आणि संगीताचा आनंद घेतात. सामान्यत: ते त्यांच्या समाजाच्या बाहेर लग्न जुळवत नाहीत. त्यांचे स्वतःचे परंपरागत कायदे आणि ग्राम परिषद आहेत. लाल (LAL) हा शब्द त्यांच्यातील ग्रामप्रमुखपद दर्शविण्यासाठी आहे. गावप्रमुख सामान्यतः विवाह आणि घटस्फोट यासह सर्व प्रकारचे सामाजिक आणि धार्मिक विवाद पाहतो. सध्या कुकी हे इतर जमातींच्या तुलनेत सामाजिक व आर्थिकदृष्ट्या प्रगत आहेत.

कुकीलॅण्ड” ची मागणी

कुकी आणि मैतेई यांच्यातील तणावग्रस्त परिस्थितीमुळे राज्याच्या 10 कुकी-झोमी आमदारांनी “संविधानाखाली स्वतंत्र प्रशासन” अशी मागणी केली, “आमचे लोक यापुढे मणिपूर अंतर्गत अस्तित्वात राहू शकत नाहीत… [आणि] मैतेई सोबत जगणे … पुन्हा मृत्यूसारखेच आहे”… असा आरोप करण्यात आला आहे.कुकिलॅण्ड” ची मागणी 1980 च्या उत्तरार्धापासून करण्यात येत आहे, किंबहुना 2012 मध्ये, ज्या वेळेस वेगळ्या तेलंगणा राज्याची मागणी मान्यतेच्या प्रक्रियेत होती, त्या वेळेस कुकी राज्य मागणी समिती (KSDC) नावाच्या संघटनेने कुकीलॅण्डसाठी आंदोलनाची घोषणा केली होती. केएसडीसीने यापूर्वीही स्वतंत्र कुकीलॅण्ड मागणीसाठी अधूनमधून संप आणि आर्थिक बंद पुकारले होते, महामार्ग रोखले होते आणि व्यापारी माल मणिपूरमध्ये येण्यापासून अटकाव केला होता. मणिपूरच्या 22,000 चौरस किमी क्षेत्रफळाच्या 60% पेक्षा जास्त जागेची, “कुकी आणि कुकीलॅण्ड” साठी KSDC ने मागणी केली आहे. “कुकीलँड” च्या संकल्पनेत कुकी-बहुल चुराचंदपूर जिल्हा, कुकी आणि नागा लोकसंख्येचे मिश्रण असलेले चंदेल आणि अगदी नागाबहुल तामेंगलाँग आणि उखरुलचे काही भाग समाविष्ट आहेत.

मैतेई कोण आहेत?

मैतेई , ज्याला मिताई किंवा मैथियीदेखील म्हणतात, किंबहुना त्यांना मणिपुरीदेखील म्हटले जाते. मैतेई हा ईशान्य भारतातील मणिपूर राज्यातील प्रबळ वांशिक गट आहे. मैतेई मुख्यतः आजच्या मणिपूरच्या इम्फाळ खोऱ्यात राहतात, त्या शिवाय मोठ्या प्रमाणात आसाम, त्रिपुरा, नागालँड, मेघालय आणि मिझोराम या इतर भारतीय राज्यांमध्ये स्थायिक झालेले आहेत. भारतीय जनगणनेच्या 2011 च्या अहवालानुसार मणिपूरच्या लोकसंख्येच्या सुमारे 53 टक्के लोकसंख्या मैतेई वंशीय गटाची आहेत. मैतेई समाज मेइटी भाषा बोली म्हणून वापरतात, ही भाषा मणिपुरी भाषा म्हणूनही ओळखली जाते आणि ही भाषा भाषाशास्त्रानुसार तिबेटो-बर्मन भाषेच्या उप-कुटुंबात येते. भारताच्या मान्यताप्राप्त अधिकृत भाषांपैकी एक म्हणून ती 1992 साली भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.

मैतेई समाजाच्या धार्मिक परंपरा

2011 च्या जनगणनेनुसार, मैतेई समाज फक्त दोन धर्मांचे मोठ्या प्रमाणात पालन करतात, बहुतेक मैतेई हिंदू धर्माचे पालन करतात. सुमारे 16 टक्के मैतेई पारंपारिकपणे ‘सनमाही’ देवाच्या नावावर असलेल्या सनमाही धर्मावर विश्वास ठेवतात. सुमारे 8 टक्के मैतेई इस्लामचे पालन करतात. हिंदू रीतिरिवाजांचे पालन करणारे मैतेई आसपासच्या डोंगरी जमातींपासून सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न आहेत. हिंदू धर्म स्वीकारण्यापूर्वी त्यांनी मांस खाणे, गुरेढोरे बळी देणे आणि शिकार करणे सामान्य होते, परंतु आता ते मांस वर्ज्य मानतात (पण मासे खातात), मद्यपान करत नाहीत, गाईचा आदर करतात. कृष्णाच्या विशेष भक्तीसह हिंदू देवतांच्या पूजा करता परंतु पारंपारिकरित्या चालत आलेल्या देवतांच्या आणि आत्म्यांच्या उपासनेला मात्र ते विसरलेले नाहीत. बागायती शेती, भातशेती हा त्यांच्या अर्थव्यवस्थेचा आधार आहे. ते उत्सुक घोडेपालक आहेत आणि पोलो हा त्यांना सर्वात आवडता खेळ आहे. फील्ड हॉकी, बोटींच्या शर्यती, नाटय़प्रदर्शन आणि मणिपुरी शैलीतील नृत्य हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते.

गेल्या काही दिवसांत मात्र हे दोन्ही समाज एकमेकांच्या विरोधात मणिपूरमध्ये उभे ठाकले असून त्यामुळे युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे महिलांची विवस्त्र धिंड काढणे यासारखे मानवतेला काळीमा फासणारे प्रकारही याचाच भाग झाले आहेतहे दुर्दैवाचेच.

मिझोरममध्ये मणिपूरच्या झळा

मणिपूरमध्ये दोन कुकी-झोमी महिलांवरील लैंगिक अत्याचारांची चित्रफीत उजेडात आल्यावर देशभरात संतापाची लाट उसळलेली असून त्यामुळे मिझोरममध्ये राहणाऱ्या मैतेई समाजाच्या नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. अनेकांनी मिझोरम सोडण्यास सुरुवात केली असून मणिपूर सरकारने त्यांना आपल्या राज्यात आणण्यासाठी विमानांची व्यवस्था करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे आता मणिपूरमधील हिंसाचाराचे परिणाम शेजारी राज्यांवरही दिसू लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिझोरममधील मिझो समुदायाचे मणिपूरच्या कुकी-झोमी समाजाशी वांशिक संबंध असून त्यांचे मणिपूरमधील घडामोडींवर बारीक लक्ष आहे. वास्तविक 3 मे रोजी हिंसाचार सुरू झाल्यापासून आतापर्यंत मणिपूरमधील 12,584 कुकी-झोमी लोकांनी मिझोरममध्ये आश्रय घेतला असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मिझोरममधील मैतेईंच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. त्यात मिझोरममधील ‘पीएएमआरए’ (पूर्वाश्रमीची दहशतवादी संघटना- मिझो नॅशनल फ्रंट) या संघटनेने ‘मैतेईंनी आपल्या सुरक्षिततेसाठी मिझोरम सोडावे,’ असा इशारा देणारे मिझो भाषेतील निवेदन नुकतेच  प्रसारित केल्याने तणावात भर पडली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)