फुटबॉलचा नवा सौदागर.. सौदी अरेबिया
अरबस्तानातील काही श्रीमंत देश खेळांच्या स्पर्धा भरवून नवी सांस्कृतिक ओळख निर्माण करणे आणि त्याद्वारे प्रतिमासंवर्धन करणे या उद्योगात गुंतलेले आहेत. यातून मोठाल्या क्रीडा स्पर्धाचे यशस्वी आयोजन करून प्रगत राष्ट्रांना या क्षेत्रातील सक्षम पर्याय निर्माण करण्यात हे देश यशस्वी होऊ लागले आहेत. सौदी अरेबियाने युरोपातील फुटबॉलपटूंविषयी आरंभलेला सौदे प्रयोग यापेक्षा थोडा निराळा आणि सखोल आहे. त्या देशाचे युवराज आणि वास्तवातील सत्ताधीश मोहम्मद बिन सलमान यांनी तेलापलीकडच्या उत्पन्नस्रोतांवर लक्ष केंद्रित केले आहे. यातूनच सौदी अरेबियाला एकीकडे टुरिस्ट हब म्हणून विकसित करताना, दुसरीकडे युरोपबाहेरील प्रमुख व्यावसायिक फुटबॉल केंद्र म्हणून नावारूपाला आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
फुटबॉल प्रोजेक्टला निधी साह्य
फुटबॉल प्रोजेक्टला निधी साह्य थेट सौदी सॉव्हरिन फंडाकडून (पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड – पीआयएफ), म्हणजे सरकारी खजिन्यातून होत आहे. सौदी प्रो लीग किंवा एसपीएलमध्ये खेळणाऱ्या 18 संघांपैकी चार प्रमुख संघांचे 75 टक्के भागभांडवल पीआयएफने खरीदले आहे. हे चार क्लब म्हणजे अल हिलाल, अल नासर, अल अहली आणि अल इत्तिहाद.
सध्या केवळ अधिकाधिक खेळाडू लीगमध्ये आणणे इतकेच त्यांचे माफक उद्दिष्ट आहे. पुढील पाच वर्षांमध्ये जवळपास 100 सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू एसपीएलमध्ये खेळतील, अशी सौदी फुटबॉल व्यवस्थेची महत्त्वाकांक्षा आहे. 2030 मधील विश्वचषक स्पर्धेच्या संयुक्त यजमानपदासाठी सौदी अरेबिया, ग्रीस आणि इजिप्त स्पर्धेत आहेत. या तिघांना संयुक्त यजमानपद मिळालेच, तरी त्यांतील महत्त्वाचे सामने आपल्याकडे खेचून आणण्याचा सौदी अरेबियाचा प्रयत्न राहील. त्या दृष्टीने बहुतेक मोठय़ा शहरांमध्ये फुटबॉल सुविधा, यूथ अॅकॅडमींच्या उभारणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. युरोपातून सौदी अरेबियात खेळण्यास आलेले फुटबॉलपटू या लीगचे आनंददूत (चिअरलीडर्स) ठरले पाहिजेत, या दर्जाच्या सुविधा पुरवण्याचा कटाक्ष तेथे पाळला जातो.