गुगलचे ‘एआय’ वृत्तलेखनही करणार; वृत्तपत्रांना दाखविले प्रात्यक्षिक.
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘एआय’ची सध्या सर्व क्षेत्रात चर्चा आहे. ग्राहकोपयोगी सेवा, उद्योग, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रात ‘एआय’च्या वापराच्या चाचण्या झाल्या आहेत. प्रसारमाध्यमांच्या वृत्तविभागातही ‘एआय’ची चाचपणी झाली आहे. आता गुगल कंपनीने त्यांचे नवे ‘एआय’आधारित तंत्रज्ञान ‘जेनेसिस’ सादर केले आहे. याद्वारे वृत्तलेखन करता येणे शक्य होणार आहे.गेल्या महिन्यात ‘द न्यूयॉर्क टाइम्स’, ‘एनबीसी न्यूज’ आणि ‘गिझमोडो’ या संकेतस्थळाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला होता. गुगलनेही या नव्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ ‘द वॉशिंग्टन पोस्ट’, ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ची मूळ कंपनी ‘न्यूज कॉर्पोरेशन’ला नुकतेच दाखविल्याची माहिती या प्रक्रियेशी संबंधित तीन व्यक्तींनी दिल्याचे ‘वृत्त ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने दिले आहे.
‘जेनेसिस’ या नावाने हे तंत्रज्ञान ओळखले जाते. ते माहिती घेऊ शकते, चालू घडामोडींचे तपशील देऊ शकते आणि बातम्याही तयार करेल,
‘जेनेसिस’ हे पत्रकारांसाठी वैयक्तिक सहाय्यक म्हणून काम करू शकते आणि त्यांना इतर काम करण्यास मोकळा वेळ मिळू शकेल.यामुळे वृत्तविभागाची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढेल, असा विश्वास गुगलला वाटत आहे. बातम्या तयार करताना येणाऱ्या अडचणी दूर करणारे जबाबदार तंत्रज्ञान म्हणून गुगल त्याच्याकडे पाहत आहे.
प्रात्यक्षिक पाहिलेल्या काही अधिकाऱ्यांच्या पसंतीस गुगलचे हे तंत्रज्ञान उतरले नाही, ‘हे अस्वस्थ करणारे तंत्रज्ञान आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
गुगलच्या या नव्या तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. जर या तंत्रज्ञानाकडून सत्य माहिती खात्रीलायकपणे मिळू शकत असेल, तर पत्रकार त्याचा वापर करू शकतात. पण बारकावे आणि सांस्कृतिक सामंजस्याची गरज असलेल्या विषयांत पत्रकार आणि वृत्तसंस्थांनी याचा गैरवापर केल्यास तर केवळ या तंत्रज्ञानानच नाही तर त्याचा वापर करणाऱ्या वृत्तसंस्थांच्याही विश्वासार्हतेला तडा जाऊ शकतो.’’