जपानच्या मून मिशन अंतर्गत चंद्राकडं झेपावलेलं मून स्नायपर यानानं अखेर चंद्रावर पाऊल ठेवलं आहे. जपानसाठी ही ऐतिहासिक कामगिरी ठरली असून यामुळं चंद्रावर पाऊल ठेवणारा जपान हा जगातील पाचवा देश ठरला आहे. जपानची स्पेस एजन्सी JAXAनं हे यानं प्रक्षेपित केलं होतं. पिन पॉईंट तंत्रज्ञानाद्वारे जपाननं ही मोहिम फत्ते केली आहे.
अमेरिका, सोव्हिएत युनियन, चीन आणि भारत ही एकमेव राष्ट्रे आहेत ज्यांनी आतापर्यंत ही कामगिरी केली आहे. त्यात आता जपानचा देखील समावेश झाला आहे. चंद्र विषुववृत्ताच्या अगदी दक्षिणेला असलेल्या एका विवराच्या उतारावर 'पिनपॉइंट तंत्रज्ञान' वापरून 'मून स्निपर' हे यान उतरलं आहे.
या कामगिरीबद्दल सांगताना JAXAच्या SLIM प्रकल्पाचे व्यवस्थापक शिनिचिरो सकाई म्हणाले, "इतर कोणत्याही राष्ट्रानं हे साध्य केलेलं नाही. जपानकडे हे पॉइंट पॉइंट तंत्रज्ञानामुळं हे शक्य झालं आहे. यामुळं आम्हाला आर्टेमिस सारख्या आगामी आंतरराष्ट्रीय मोहिमांमध्ये मोठा फायदा होणार आहे"
पिन पॉईंट तंत्रज्ञानाचा फायदा काय?
या पिनपॉईंट तंत्रज्ञानाचा वापर जपाननं दोन लघुग्रहांवर यशस्वीरित्या प्रोब उतरवण्यासाठी यापूर्वी केला होता. JAXAनं या तंत्रज्ञानाचा फायदा सांगताना म्हटलं की, या पिन पॉईंट उच्च-सुस्पष्टता तंत्रज्ञानामुळं भविष्यात चंद्रावरील डोंगराळ भाग तसेच ध्रुवांवरील ऑक्सिजन, इंधन आणि पाण्याचा संभाव्य स्रोत शोधण्यात मदत होणार आहे. यापूर्वी जपानच्या दोन चांद्रमोहिमा अपयशी ठरल्या होत्या.
यानासोबत काय असणार?
चंद्रावर उतरलेल्या लँडरसोबत दोन मिनी-प्रोब तैनात असतील. मायक्रोवेव्ह ओव्हनसारखे मोठे हॉपिंग वाहन आणि बेसबॉलच्या आकाराचे चाक असलेलं रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे घेणार आहे. यासाठी काम करणारे रोबोट दिग्गज तंत्रज्ञान कंपनी सोनी ग्रुप, टॉयमेकर टॉमी आणि अनेक जपानी विद्यापीठांनी संयुक्तपणे विकसित केले आहेत.
अमेरिकेच्या मदतीनं देणार चीनच्या सामर्थ्याला आव्हान
चीनच्या लष्करी आणि तांत्रिक सामर्थ्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेसोबत भागीदारी करून जपान अवकाशात मोठी भूमिका बजावू पाहत आहे. जपानमध्ये अनेक खाजगी क्षेत्रातील स्पेस स्टार्टअप आहेत आणि नासाच्या आर्टेमिस कार्यक्रमाचा भाग म्हणून चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याचं जपानचं उद्दिष्ट आहे.
भारतासोबत चंद्रावर जाण्याची जपानची योजना
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, भारताच्या चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऐतिहासिक पाऊल ठेवलं. यामुळं अंतराळात पोहोचणारा एक प्रमुख देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे. यामुळं जपान आता सन 2025 मध्ये भारतासोबत संयुक्त मानवरहित चंद्र ध्रुवावर जाण्याची योजना आखत आहे.
MPSC Study, Current Affairs, MPSC Notes MPSC , JAPAN Moon Sniper
